study (1)

लग्नानंतरही शिक्षण पूर्ण करता येईल!

मानवाच्या जीवनातील मुलभूत गरजांपैकी एक म्हणजे ‘शिक्षण’! समस्त स्त्री जातीस शिक्षणाचा हक्क मिळवून देणा-या ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याने दिलेल्या लढ्यामुळे आज मुली विविध क्षेत्रांत अलौकिक प्रगती करीत आहेत. डॉक्टर, इंजिनिअर, पायलट, उद्योग विश्व, कला किंवा क्रिडा यापैकी क्षेत्र कुठलेही असो ‘ती’ सर्वत्र अग्रणी!

देशभरातील शहरांत, गावांमध्ये स्थापन झालेल्या शाळा, महाविद्यालये, वेगवेगळे कोर्सेस यांचा लाभ विद्यार्थिनी घेत असल्या, तरी काही जणींना आजही कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते. काही मुली घराचा भार उचलण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाला पूर्णविराम देत नोकरी करण्याचा पर्याय स्विकारतात आणि थोड्या शिक्षणामुळे नोकरीचे पर्यायही कमी उपलब्ध होतात. पुढे जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे लग्न, संसार, मुलं अशा प्रपंचानंतरही मनातील शिक्षण पूर्ण करण्याची दडलेली इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते!

दहावी, बारावी किंवा कुठलीही डिग्री तुम्ही मिळून शकता, यासाठी आवश्यक आहे ती तुमच्या मनातील शिकण्याची ओढ. शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सोयीनुसार डिस्टन्स एज्युकेशनच्या साहाय्याने शिक्षण पूर्ण करता येऊ शकते. दररोज कॉलेजला न जाता सोयीनुसार घरी अभ्यास करुन तुम्ही परीक्षा देऊ शकता. अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करायचे असेल किंवा एखादी नवीन डिग्री घेण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या महिला आता घरातील व्याप सांभाळून स्वत:च्या प्रगतीचा विचार नक्की करु शकतात. तुम्ही निवडलेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके महाविद्यालयाकडून दिली जातात, तसेच संबंधित विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजनसुद्धा केले जाते, जे विद्यार्थ्यांसाठी मोफत असते. अशाप्रकारे शिकण्यासाठी येणारा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यातील असल्याने सर्वांना या सुविधेचा लाभ घेणे सहज शक्य आहे.

वर्षानुवर्षे कुटुंबाचे व्यवस्थापन सांभाळलेस, तेव्हा आता स्वत:च्या आकांक्षांना लगाम लागू न देता, फक्त स्वानंदासाठी नवं काहीतरी शिकण्याची इच्छा मनात असेल; तर तिला नक्की पूर्णत्वास ने! घेतलेले शिक्षण कधीही वाया जात नाही, ते नेहमीच व्यक्तिमत्त्वाचा पाया भक्कम करते, तेव्हा ज्ञानरुपी उत्सवात तूही आनंदाने सहभाग घे!

More Articles
Designed and Developed by SocioSquares