marathi-2

मराठीस हवंय अभिमानाचं खत पाणी!

व्यवहारिक जगात भक्कमपणे उभं रहायचं, तर हे क्षेत्र नीट समजून उमजून आत्मसात करावं लागतं. ज्याची सुरुवात होते शालेय वयापासून. मुलं जाणतं होताच पालकांना एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागायचा, तो म्हणजे पाल्यास मराठी, की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावे? हल्ली या प्रश्नावर फारसा विचार होत नाही. सरळसोट इंग्रजी माध्यमाला प्राधान्य दिले जाते. भविष्याचा विचार करण्यात गैर काय? त्यामुळे, पालकांचेही चुकत नाही. इंग्रजी भाषा पक्की व्हायलाच हवी. पण, सोबत मातृभाषाही अस्खलित यायला हवी, कारण ती भावनिक गरज आहे. मुलांचं स्वभाषेवरील प्रेम वयागणिक वृद्धिंगत व्हावं यासाठी पालकांच्या भूमिकेतून आपल्याला काय करता येईल, तेच आजच्या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. तुम्ही तयार आहात, अमृताहुनी गोड अशा मराठीचा गोडवा लहान मुलांच्या मनात रुजवण्यासाठी?

शाळा इंग्रजी माध्यमाची असल्याने, मुलांसोबत इंग्रजीतून संवाद साधण्याचा सल्ला शिक्षक देत असले, तरी अधूनमधून मराठीचाही वापर करावा. म्हणजे, मुलांची दोन्ही भाषेत समसमान प्रगती होण्यास मदत होईल.

बडबड गीते

पोयम्स पाठ करुन घेण्यासोबत उडत्या चालीची बडबड गीतेही लहान मुलांकडून पाठ करुन घ्यावीत. म्हणजे, त्यांची दोन भिन्न भाषांची एकाचवेळी ओळख होण्यास मदत होईल. घरातील वयस्कर व्यक्तिंना अशी भरपूर गीतं पाठ असायची. त्यामुळे, त्यांच्या तोंडून कानावर ही गाणी पडायची, हसत खेळत तोंडपाठही व्हायची.

छान छान गोष्टी

या नावाची कित्येक पुस्तकं आजही बाजारात हमखास मिळतात. बेड टाईम स्टोरीजसोबत, पंचतंत्र वा मराठीतून प्रचलित मिथ्य कथा सांगण्यावरही भर द्यावा. बालसाहित्याशी त्यांची ओळख करु द्यावी.

शाळेतील विषय

ब-याचदा शाळेत एखाद्या भाषेला पर्यायी भाषा निवडण्याची मुभा दिली जाते. अशावेळी, कठीण वाटणारी भाषाऐवजी सोप्पी भाषा मुलं निवडतात. मराठी अभ्यासक्रमात दहावीपर्यंत राहिली, तरच तिचे नीट आकलन होऊ शकते. स्वत:ची मातृभाषाच अभ्यासण्यास नकोशी वाटणं हे फार दुर्दैवी. पालकहो, तुम्ही स्वत:हून दररोद काही वेळी त्यांचा भाषेचा अभ्यास करुन घेतलात, तर मातृभाषेवर काट मारण्याची वेळ य़ेणार नाही. क्लासेस किंवा ट्युशन्सपलिकडे अवांतर वाचन, चर्चा, गप्पा गोष्टी होऊ द्यात की मराठीतून. यामुळे, त्यांच्याजवळील शब्दसंग्रह वाढेल आणि सविस्तर उत्तरे, पत्रलेखन, निंबधासारखे प्रश्न ते छान हाताळतील.

वृत्तपत्र/मासिकं

इंग्रजीचे वाचन व्हावे म्हणून घरी इंग्रजी वृत्तपत्र आणले जाते. त्यासोबत, मराठी वृत्तपत्र मात्र बंद करु नका. समान बातम्या, घडामोडी एकाचवेळी दोन्ही भाषेतून समजल्या, तर फायदाच आहे. यामुळे, भाषांतर कौशल्य सुधारले, तसेच शब्दकोडी सोडवल्याने भरपूर पर्याप्त शब्दांचा साठाही तयार होईल.

लहान मुलांना मराठीची गोडी लावताना, पालकहो तुम्हीही मराठीचा दैनंदिन जीवनात भरपूर वापर करा. कारण, मुलं तुमचं अनुकरण करत आहेत, हे विसरु नका.

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares