Indian Spices (1)

मसाल्याच्या झणझणीत त-हा!

पदार्थ रुचकर होण्यामागे सुगरणींची स्वयंपाकातली काही गुपितं दडलेली असतात. नानात-हेचे जिन्नस नेमक्या प्रमाणात वापरुन केलेल्या खमंग प्रयोगांचा फडशा पाडताना पदार्थातील चवींचा उलगडा होतो आणि आचा-यानंतर पाककृतीतील मसल्यांना मनमुराद दाद मिळते. पदार्थानुसार वापरले जाणारे वेगवेगळे मसाले बाजारात रेडीमेट मिळतात, तरी आजही बरीच हौशी मंडळी घरी मसाले बनवणे पसंत करतात. असे केल्याने, आपल्या आवडीनुसार तिखटाचे, गरम मसाल्यांचे प्रमाण राखता येते.

अशाच, खवय्यांसाठी देत आहोत मसाल्यांच्या रेसिपीज

१. गोडा मसाला –

साहित्य- १/२ किलो धणे, १/४ किलो सुके खोबरे, १/४ किलो तेल, ५० ग्रॅ.खसखस, ५० ग्रॅ.हळकुंडे, प्रत्येकी २० ग्रॅ. लवंग, दालचिनी, शहाजिरे, काळेमिरी, तमालपत्र, वेलदोडे, दगडफूल, खडा हिंग, प्रत्येकी १० ग्रॅ. जायपत्री, बदामफूल, १०० ग्रॅ, जिरे.

पाककृती – सुके खोबरे किसून नीट भाजून घ्यावे. तीळ कोरडेच भाजून घ्यावेत. बाकीचे सर्व जिन्नस थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्यावेत. गार झाल्यावर त्यांची बारीक पूड करावी. तयार मसाला चाळून घट्ट झाकण्याच्या बारणीत भरावा.

 

२. गरम मसाला –

साहित्य – १/४ किलो काळे मिरी, १०० ग्रॅ. खसखस, ५० ग्रॅ. दालचिनी, ५० ग्रॅ. लवंग, १०० ग्रॅ. बडिशेप, प्रत्येकी ५ हिरवे व मसाला वेलदोडे, २ ग्रॅ. दगडफूल, अर्धे जायफळ, २ ते ३ बदामफुले.

पाककृती – वरील सर्व जिन्नस वेगवेगळे व कोरडे भाजून घ्यावे. पूड करुन, तयार मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरावा.

 

३. कोल्हापुरी मसाला –

साहित्य – १ वाटी सुक्या लाल मिरच्या, १/२ वाटी सुके खोबरे किसून, १ चमचा जिरे, १ चमचा धणे, २ चमचे पांढरे तीळ, १ छोटा चमचा मेथीदाणे, १ छोटा चमचा मोहरी, १ छोटा चमचा काळीमिरे, १ छोटा चमचा तेल, १ छोटा चमचा लवंग, २ तमालपत्रे, १/२ छोटा चमचा जायफल पूड, २ चमचे लाल तिखट

पाककृती – लाल तिखट व जायफळ पूड वगळून बाकीचे जिन्नस एकत्र करावेत. त्यांना १/२ चमचा तेल चोळावे. मध्यम आचेवर सर्व जिन्नस नीट भाजून घ्यावेत. जास्त काळपट होऊ देऊ नयेत. भाजलेले मसाले थंड झाले की मिक्सरमध्ये त्यांची बारीक पूड करुन घ्यावी. आता, त्यामध्ये लाल तिखट व जायफळ पूड मिसळावी. तयार मसाला हवाबंद डब्यात भरुन ठेवावा.

 

४. कच्चा मसाला –

साहित्य – १/२ वाटी धणे , १/४ वाटी जिरे, ५ ग्रॅ, शहाजिरे, ५ ग्रॅ. लवंग, १ छोटा तुकडा दालचिनी

पाककृती – सर्व जिन्नस न भाजता, कच्चेच मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यावेत. मसालेभात व खिचडीत हा कच्चा मसाला वापरावा.

 

५. पिझ्झा मसाला –

साहित्य – १/४ चमचा सुंठपूड, १ चमचा मीठ, १ चमचा सैंधव मीठ, १ चमचा गुलाबकळी, २ चमचे सुकी लाल मिरची पूड, १ चमचा थाइम, ४ चमचे ओरेगॅनो, ४ बेझील लीव्ज, १ चमचा लसूण पावडर, १/२ चमचा लिंबाची पावडर

पाककृती – सर्व जिन्नस नीट एकजीव करुन घ्यावेत व तयार पिझ्झा मसाला हवाबंद डब्यात भरुन ठेवावा.

विकतच्या मसाल्यांची ठोकळेबाज चव थोडी बाजूला सारुन, घरी तयार केलेल्या मसाल्यांचा पाककृतींत समावेश करण्यात तुमचाच फायदा आहे. तयार झालेल्या चविष्ट पदार्थाचं पूर्ण श्रेय तुम्हालाच मिळेल,  “विकतचा मसाला वापरला, म्हणून पदार्थ चांगला झाला”, असं म्हणायला जागा उरणार नाही. तेव्हा, घरगुती तेच इष्ट व उत्तम!

 

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares