Small Business Banner

महिलांसाठी घरगुती व्यवसाय!

शाळेत असताना आवडत्या विषयाचा अभ्यास अगदी मन लावून केला जातो, मग मार्कही उत्तम मिळतात. लहान मुले पसंतीच्या विषयातून अभ्यासाचा आनंद घेतात त्याप्रमाणे, नोकरीतून कामाचा आनंद मिळवण्यासाठी आवडते क्षेत्र, करियर किंवा व्यवसायासाठी निवडायला हवे. म्हणूनच, तुमच्या छंदाला योग्य दिशा देऊन त्यामधून घरगुती व्यवसाय उभारण्याच्या दिशेने प्रयत्न केल्यास, कुठल्याही वयात स्वत:चा लहानसा व्यवसाय तुम्ही सहज सुरु करु शकता.

१. सुगरणींनो, तुमच्या कौशल्याचा अचूक वापर करुन कमी भांडवलात सुरु करता येईल, असा व्यवसाय म्हणजे चविष्ठ जेवणाचे डबे! पावलोपावली रेस्टॉरंटचे पर्याय उपलब्ध झाले, तरी घरगुती जेवणाची चव प्रत्येकाला प्रिय असते. कॉलेज किंवा नोकरीसाठी घरापासून दूर आलेली मंडळी स्वच्छता, बजेट व चव या मुख्य तीन अटींमध्ये बसणारा जेवणाचा डबा मिळविण्यासाठी शोधाशोध करीत असतात.
या संधीचाच योग्य उपयोग करुन तुम्ही तुमच्या परिसरात असा लघुव्यवसाय सुरु करु शकता. एका डब्याची ऑर्डर मिळाली, तरी या कामाला सुरुवात होऊ शकते. सोशल मिडीयाचा वापर करुन तुमच्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली, की हळुहळू डब्यांची ऑर्डर वाढेल. डबे पोहोचविण्यासाठी डबेवाल्यांचीही मदत घेता येईल. तुमच्या जेवणाची चवच तुमच्या या व्यवसायाचे भक्कम भांडवल असेल.

२. वर्षभर सणांची रेलचेल असते, सोबत लग्न, साखरपुडा, मुंज, वाढदिवस अशा एक ना अनेक सोहळ्यांच्या निमित्ताने परस्परांना भेटवस्तू देण्याचा ओघही सुरु असतो. भेटवस्तू आकर्षक दिसाव्यात यासाठी रंगीत कागदात किंवा चकचकीत प्लॅस्टिकमध्ये पॅक केल्या जातात. दुकानांत वस्तू गिफ्टरॅप करुन मिळतात, मात्र घाईघाईत केल्याने ते गिफ्टर्रपिंग दिसायला साधेसेच असते.
खरेतर गिफ्टपॅक करताना भरपूर कलाकुसर करणे शक्य आहे. दिसायला हे काम सोप्पे वाटले, तरी कल्पकतेने वेगवेगळ्या आकारात, कागदाला साजेशी रिबीन, कागदाची फुले, क्विलींगचा वापर करुन छोट्याशा गिफ्टलाही देखणे बनवता येते. मोहकतेने भेटवस्तू पॅक करण्याच्या कौशल्यात दडलाय एक घरगुती व्यवसाय! एखादे स्पेशल गिफ्ट किंवा पार्टीसाठी मोठ्या संख्येने आणलेली गिफ्ट्स आकर्षकरित्या पॅक करुन देण्याच्या कलेस बाजारात छान मागणी आहे. लहान-मोठ्या दुकानांशी करार करुन वस्तू गिफ्टरॅपिंगच्या ऑर्डर्सही घेता येतील.

३. तुम्हाला शिकवायला आवडत असेल, तर क्लास किंवा शिकवणी एक परफेक्ट पर्याय आहे. यासाठी प्रथम इयत्ता व माध्यम निवडवावे लागेल. संपूर्ण अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाचा स्पेशल क्लासही घेऊ शकता.
तुम्हाला एखादी परकीय भाषा अवगत असल्यास आणखी उत्तम, कारण जर्मन, फ्रेंच, चायनीज अशा परकीय भाषा शिकण्यास प्राधान्य देणा-यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेय. राहात्याघरी क्लास सुरु करु शकता किंवा एखाद्या क्लासशी टाय अप करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. तुमचे विद्यार्थी हेच तुमच्यामधील उत्तम शिक्षकाची जाहिरात करतील यात शंकाच नाही.

४. मुंबईत भरपूर ऑफीसेस आहेत आणि अनेक छोटी मोठी ऑफीसेस नव्याने या स्पर्धेत दाखल होतायेत. यांना लागणा-या स्टेशनरीचे प्रमाण प्रचंड असून बॅग, स्टॅपलर, पेपर पिन, नोटपॅड अशा वस्तूंना वर्षभर मागणी असते. मुख्यत्वे छपाईशी संलग्न असणा-या या व्यवसायाची सुरुवात किमान सेवा देण्यापासून करावी. बिझनेस कार्ड व ब्रोशरद्वारे तुम्ही देत असणा-या सेवांची माहिती विविध कंपन्यांना द्यावी, या क्षेत्रातील आणखी संधी प्रिंटींग व्यवसायात उपलब्ध आहेत.
अशाप्रकारे, घरगुती व्यवसायासाठी आवडीनुसार क्षेत्राची निवड करुन, आगामी काळात स्वत:चा उद्योग सुरु करण्याची इच्छा मनात असेल, तर भांडवल खरेदीसाठी लागणारे सेव्हिंग करण्यास आत्तापासूनच सुरुवात करायला हवी.

More Articles
Designed and Developed by SocioSquares