Working mother (1)

मातृत्व रजेनंतर कामावर रुजू होताना!

तान्ह्या बाळाला पूर्ण वेळ द्यायचा, की बाळाला घरी ठेवून कामावर जायचं. ह्या दोन पर्यायांपैकी ज्या नोकरी करुन बाळाकडे लक्ष देण्याचा पर्याय निवडतात, त्यांनी ‘आई’ व नोकरदार ‘स्त्री’ अशा दोन भूमिका वठवण्यासाठी प्रथम मानसिकदृष्ट्या बळ एकवटायला हवे. कारण, आई व मूल दोघांनाही दिवसभरातील आठ नऊ तास एकमेकांपासून दूर रहाणे अवघड जाते. पण गरजेपोटी ब-याच स्त्रियांना प्रसुतीनंतर लगेच काही महिन्यांत कामावर जावे लागते. अशा महिलांनी पुढील मुद्दे काळजीपूर्वक पडताळून पाहावेत.

नवं वेळापत्रक – ऑफिसला रुजू झाल्यानंतरच्या वेळापत्रकाचे काही दिवस आधीपासूनच अनुसरण करायला घ्यावे. घरच्याघरची ऑफिस वेळेनुसार कामे पार पाडावीत. जेणेकरुन तुम्हाला, घरातल्यांना व बाळाला बदलणा-या वेळापत्रकाची सवय होईल. सोबत, तुमच्या पंपिंगच्या वेळेकडेही लक्ष देत येईल.

सोयीचे मार्ग

बॉस किंवा एच.आर.शी सविस्तर बोलून तुम्ही कशाप्रकारे घर व नोकरी सांभाळणार आहात ते सांगा. कामाचा किती भार घेणे शक्य आहे, ऐनवेळी जास्तीचे काम करु शकाल की नाही, ब्रेक टाईम, सुट्टी याविषयी मनमोकळे बोला. तुमच्या मागण्या त्यांच्या अपेक्षा यांचा योग्य ताळमेळ साधायला हवा.

काळाजी

आजी आजोबा नातवंडांना व्यवस्थित सांभळतात. घरची व्यक्ती असल्यास अतिरिक्त काळजी वाटत नाही. पण, एखादी परकी व्यक्ती बाळाला सांभाळणार असेल, तर व्यक्तिला बाळाच्या दूधाच्या, जेवणाच्या वेळा नीट माहिती असतील याची खात्री करुन घ्यावी.

कामाचा ताळमेळ

सोबत काम करणा-या वरिष्ट तसेच, कनिष्टांसोबत वरचेवर बोलून कामाचा ओझरता आठावा घ्यायला हवा. तुमची कामाबाबतचा काटेकोरपणा, एकाग्रता त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी. पूर्णवेळ नोकरी करण्याचा निर्णय तुमचा असल्याने, काम नीट पार पडेल याची जबाबदारीही सर्वस्वी तुमच्यावरच असते. त्यामुळे, घरच्याविचारांमध्ये कामाकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही.

आरोग्य

घरी बाळाची काळजी घेणा-या व्यक्तिंशी फोनवरुन संपर्कात रहा, हे तुम्हाला वेगळे सांगायला नको. काळजीपोटी आई फोन करणारच, पण बाळाच्या काळजीत व कामाच्या गडबडीत स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. भरपूर फळे, आवश्यक तितका आहार घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने बैठे व्यायाम किंवा मॅक्रो व्यायाम करण्यावर भर द्या. जेणेकरुन स्नायू आखडणार नाहीत. तसेच, मुबलक पाणी प्यायला विसरु नका.

प्रसुतीनंतरही आईने शारीरिक आरोग्यासोबत स्वत:चे मानसिक आरोग्यही जपावे. यासाठी, कामाचा ताण न घेता आनंदी व प्रसन्न रहाणे, ही सर्वस्वी तुमचीच जबाबदारी असेल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares