mama banner

मामाचा गाव आणि पत्र दोन्ही हरवलं…

धुरांच्या रेषा हवेत सोडणा-या आगगाडीतून पळती झाडे पहात, मामाचा गाव गाढण्याची ओढ लावते, ती उन्हाळी सुट्टी! वार्षिक परिक्षा संपताच बोचक्यांची बांधाबाध करायची आणि मामाचा गाव वा आजोळ गाठायचं, हे दृश्य सध्या दुर्मिळ झालंय; पण मागच्या पिढीच्या मनात मामाचा गाव आजही वास करुन आहे. शेणानं सारवलेलं घर, चुलीवरचं जेवण, कै-या, चिंचा, फणसांची चव घेण्यासोबत थेट झाडावर चढून पिकल्या आंब्याचा फडसा पाडायचा, लोणची, वाळवणीच्या पदार्थांत आजीला मदत करायची, तर दुसरीकडे विटीदांडू, लगोरी, डबा ऐसपैस सारखे खेळ ऊन्हात करपून जाईस्तोवर खेळायचे. अहा…! अक्षरश: सोनेरी दिवस! आजही जी मंडळी मे महिन्याच्या सुट्टीत अशाप्रकारे आपल्या गावी जातात, ती सुदैवीच म्हणायची. पण अशा व्यक्तिंचं प्रमाण कमी झालंय, हेही तितकच खरं.

पोटापाण्यासाठी शहराकडे आलेली तरुणाई गावाकडे शेतीवाडीचं पहाणा-या आईवडीलांना सुट्टीत भेटायला जात असे. पुढे घरची इतर मंडळीही जन्मभूमीसोडून तरण्याताठ्या मुलांसोबत कर्मभूमीत स्थायिक झाली आणि अधूनमधून गावाकडे जाणं देखील कमी कमी होत जाऊन, बंदच झालं. आता, आजी आजोबांकडून गोष्टींमधून नातवंडांपर्यंत ‘गावाकडची धम्माल’ पोहोचते.

कुटुंब लहान झाली, विभक्त झाली, या संक्रमणात मामाचा गाव आणि छोट्यांभोवती फेर धरणारं मामाचं पत्रसुद्धा हरवलं. गाव असणा-यांपेक्षा, “आम्हाला गाव नाही” म्हणणारे वाढले. मे महिन्यात फिरायला निघणारी कुटुंब, आता सेकंड होमवर मुक्काम ठोकतात किंवा नवं शहर, नवा देश फिरून येतात. हे आनंदादायी आहेच. पण, गावाकडची मज्जा काही औरच होती. गावी कित्येकदा गेलो, तरी कधी तोच तोचपणा आला नाही, की एकाच ठिकाणी भेट द्यायचा कंटाळा आला नाही. तोच गाव, तोच रस्ता, तेच घर, तिच झाडझुडपं, शेतीवाडी, तिथली माणसं कित्येकदा भेटली, तरी पुढीलवेळी नव्यानं भेटायची व तितकीच हक्कानं वागायची.

आत्ताच्या व्हॅकेशनमध्ये मौज असेल, पण त्यात काळ्या मातीची गंमत नाही. नव्या ठिकाणी नव्या ओळखी होत असल्या, तरी येता जाता साद घालणारा रामरामचा राबता नाही त्यात! चावडीवरच्या गप्पा, बैलगाडीचं अप्रुप, वर्षाकाठी भेटणा-या दोस्तांचा दंगा, भजन, किर्तनानी आसमंतात भरुन राहणा-या भावगंधानी व्यापलेलं आजोळ आजही लख्ख आठवतं ना?

विकासाच्या वाटेवर चालत रहाणं शाश्वत आहे. प्रत्येक गावानं नवतंत्रज्ञानाशी जोडलं जाणं गरजेचं असलं, तरी राहून राहून वाटतं. आज अनेक सुखसोयी असल्या, तरी गावाकडची ती उन्हाळी सुट्टी कधीच गैरसोयीची वाटली नाही. वीज वा मनोरंजनाचे फारसे पर्याय नसलेल्या त्या दिवसांत भरपूर संवाद घडायचा तो माणसांशी, मुक्या निसर्गाशी. प्रगतीच्या विळख्यात सापडलो आणि काही वळणं चुकत गेली. गाव मागे राहीला. आपण फार पुढे निघून आलो. अशक्य असलं, तरी वेडी आशा आहे. पुन्हा एखाद्या आडवाटेवर ते मामाचा गाव लागायला हवं, कारण एकवार उराउरी भेट घ्यायचीय त्याची!

मैत्रिणींनो, आजच्या लेखावरील तुमचं मत जरुर कळवा. तसेच, ‘मामाचं गाव’ या विषयावरील तुमच्या आठवणी, बालपणीचे किस्से किंवा तुम्ही आजही गावाकडची मज्जा अनुभवत असाल, तर नव्याको-या प्रसंगांविषयी जरुर लिहा खालील comment box मध्ये! आम्ही वाट पाहतोय तुमच्या छान छान प्रतिक्रियांची!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares