MICROWAVE

मायक्रोव्हेवचा असा वापर केलायेत कधी?

किचनमधील कामे सोप्पी करणा-या अनेक उपकरणांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणारा मायक्रोव्हेव ओव्हन सुगरणींचा अगदी लाडका! अनेक वेळखाऊ रेसिपीजना कमीतकमी वेळात तयार करण्याची कसब त्याच्याजवळ आहे. पिझ्झा, केक किंवा इतर बेकरीच्या पदार्थांशिवाय हा ओव्हन बहुतांशवेळा फक्त जेवण गरम करण्यासाठी वापरला जातो. मात्र, खालील टिप्स वाचल्यानंतर तुमच्या घरचा ओव्हन फार काळ शांत बसणार नाही. रेसिपीजशिवाय इतर किचनमधील कामे उरकण्यात मदत करेल, पाहा तर वाचून!!

१. बारीक बारीक लसणाच्या पाकळ्या सोलताना देठा जवळील भाग नखांत रुपतो किंवा दिवसभर बोटांना उग्र वास येत रहातो. यावर उपाय म्हणून, लसणाचे बोंड २० सेकंद मायक्रोव्हेवमध्ये गरम केल्यास, पाकळ्यांवरील साले सहज निघतात.

२. लिंबू सरबत करण्याआधी ओव्हनमध्ये लिंबू १५ ते २० सेकंद गरम करुन घ्यावे. लिंबावरील आवरण हलकेसे गरम व्हायला हवे. असे केल्याने लिंबाचा रस व्यवस्थित व अधिक प्रमाणात मिळतो.

३. कांदा कापताना डोळ्यांतून येणारे पाणी थांबवण्यासाठी तुम्ही आजपर्यंत अनेक उपाय केले असतील, पण यापुढे कांदा कापण्याआधी तो सोलून, दोन्ही बाजूंचा देठाजवळील भाग कापून, मग ३० सेकंद मायक्रोव्हेवमध्ये हा कांदा गरम करुन घ्या; डोळ्यांना झोंबणार नाही.

४. मायक्रोव्हेव स्वच्छ करण्याचा घरगुती उपाय म्हणजे, बाऊलमध्ये थोडेसे पाणी घेऊन, दोन भागांत कापलेले लिंबू त्यामध्ये ठेवावे. असे बाऊल साधारण ५ मिनिटे गरम होऊ द्यावे. त्यानंतर सुक्या फडक्याच्या सहाय्याने आतील भाग नीट पुसून घ्यावा. महिन्यातून एकदा असे स्टीम क्लिनिंग केल्यास ओव्हन आतल्या बाजूने स्वच्छ रहातो.

५. एनव्हलपवरील स्टॅंम्पवर पाण्याचे काही थेंब टाकून ते एनव्हलप २० सेकंद मायक्रोव्हेवमध्ये गरम करावे, त्यावरील स्टॅंम्प सहज निघतो.

६. लाकडी कटिंग बोर्ड स्वच्छ करताना त्यावर लिंबू चोळावे व साधरण १ मिनिटं मायक्रोव्हेवमध्ये बोर्ड गरम करावा. त्यानंतर तो नीट धुवून घ्यावा, कटिंग बोर्ड अधिक स्वच्छ झालेला दिसेल.

७. वेळेप्रसंगी उपयोगी ठरणारा घरचा डॉक्टर, म्हणजेच औषधी वनस्पती! यांची सुरक्षितरित्या जपावी लागते. यासाठी अशा कुठल्याही वनस्पती प्रथम धुवून, नीट वाळवून नंतर पेपर टॉवेल किंवा प्लेटवर ठेवून साधारण ३० सेकंद दोन्ही बाजूंनी गरम करुन घ्यावे. असे केल्याने, औषधी वनस्पती जास्त काळ टिकून रहातात.

८. नरम झालेले वेफर्स पुन्हा कुरकुरीत करण्यासाठी ते १० ते १५ सेकंद पेपर टॉवेलमध्ये कुंडाळून मायक्रोव्हेवमध्ये गरम करावेत.

९. आद्ल्या दिवशी कडधान्य भिजत घालायला विसरलात, तरी तासाभरात भाजी तयार होईल. त्यासाठी प्रथम बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात कडधान्य व चिमूटभर खाण्याचा सोडा टाकावा. हे मिश्रण १० मिनिटे मायक्रोव्हेवमध्ये गरम करावे. नंतर ३० ते ४० मिनिटे कडधान्य तसेच भिजत ठेवावे. अशाप्रकारे, तासाभरात भाजीसाठी कडधान्ये तयार!

१०. किचनमधील स्पंजला येणारा कुबट वास, त्यात अडकलेल्या अन्नकणांमुळे आलेला चिकटपणा घालविण्यासाठी भांड्यांचा लिकवीड सोप त्यावर पसरावा. हा स्पंज २ मिनिटे मायक्रोव्हेवमध्ये गरम करावा व त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

काय मग? मायक्रोव्हेवला कामाला लावताय ना! किचनमधील लहानमोठी कामे ओव्हनच्या सहाय्याने किती सहज फत्ते करता येतात. तेव्हा, वरील १० उपयुक्त टिप्स नक्की लक्षात ठेवा आणि त्या आजमावून पाहा. तुमच्याजवळ अशा काही मायक्रोव्हेव स्पेशल किचन टिप्स असतील तर नक्की सांग व तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तेही लिहा खालील कमेन्टबॉक्समध्ये,

More Articles
Designed and Developed by SocioSquares