Mastreal cup (1)

मासिक पाळीसाठी निरोगी मेनस्ट्रअल कप!

दर महिन्याला नियमितपणे मासिक पाळीचं येणं स्त्रीशरीरासाठी जितकं आवश्यक, तितकंच त्या चार-पाच दिवसांत प्रत्येकीनं शरीराच्या स्वच्छतेकडे काटेकोरपणे लक्ष देणंही गरजेचं आहे. पूर्वी स्त्रिया कापडाच्या घड्या वापरत, अगदी अजूनही वापरतात. प्रमाण कमी झालं असलं, तरी ज्यांच्यापर्यंत सॅनिटरी नॅपकिन्स अजून पोहोचलेले नाहीत किंवा पोहोचूनही ते विकत घेणं परवडत नाही अशा मैत्रिणी आजही कापडाच्या घड्या वापरतात. या पद्धतीत स्वच्छतेकडे बिलकूल दुर्लक्ष करुन चालत नाही, हे खरं असलं तरी घड्यांचे घरच्याघरी निर्जंतुकीकरण करुन त्या पुन्हा वापरता येतात. योग्य काळजी घेतल्यास शरीराला कुठलेही साईड्स इफेक्टस होत नाहीत वर पर्यावरणासाठी देखील पूर्ण सुरक्षित असतात.

सध्याच्या हायजेनिक सवयींत युज ऍण्ड थ्रो(केअरफुली) कॅटेगिरीत मोडणारे सॅनिटरी नॅपकिन्स जास्त सोयीचे वाटतात, पण यांच्या अतिरिक्त वापरामुळे कॅन्सरचा धोका संभवतो, तसेच त्यांचे विघटन व्हायला शेकडो वर्ष लागतात. हे पॅड्स कच-यात टाकतानाही खरंतर धुवून, ती कागदात गुंडाळून मग कच-याच्या डब्यात टाकावी. गुंडाळलेल्या कागदावर लाल स्केचपेनने गोलाकार खूण करणेही आवश्यक आहे. जेणेकरुन, प्रकारानुसार पुढे कच-याचे वर्गीकरण करणे सोप्पे जाते. कच-यांच्या ठिकाणी काम करणा-या कर्मचा-यांच्या आरोग्यासाठी हे सुरक्षित असते. पण, हे सगळे ढिगभर नियम पाळत कोण? त्या दिवसांत उद्भवणारे दुखणे सहन करताना मारामार होते, त्यात ह्या नियमांना डावललं जाणं साहजिक आहे.

वरील दोन्ही पद्धतींवर मात करणारा, स्वच्छ, स्वस्त व तितकाच सोयीस्करसा मार्ग मानवाने सुमारे १०० वर्षांपूर्वीच शोधून काढलाय, मात्र भारतात अजूनही न रुळलेला असा मेनस्ट्रअल कप! मेडिकल ग्रेड सिलेकॉन पासून बनलेला, साधारण २ इंचापर्यंत वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असणारा हा कप शरीरयष्टीनुसार निवडावा लागतो.

याच्या वापराची पुढील पद्धत काळजीपूर्वक वाचा, कप वापरण्यापूर्वी व वापरुन झाल्यावर ८ ते १० मिनिटे पाण्यात उकळवून निर्जंतूक करावा. हा कप इंग्रजी ‘यु’ आकारात दुमडून योनीमार्गात व्यवस्थित बसवावा. तो हळूच फिरवल्यास आतमध्ये उघडतो व हवेच्या दाबामुळे नीट बसतो आणि स्त्राव त्यामध्ये जमू लागतो. कपासोबत कापडाचा पॅड वापरला तरी तो इतकी खराब होत नाही. काही तासानंतर अलगद चिमटीत पकडून हा कप सहज काढता येतो. शरीराच्या सर्वांत नाजूक भागात मेनस्ट्रअल कपचा असा वापर करणे, जोखमीचे वाटले तरी तो बिलकुल दुखत-खुपत नाही. त्वचेला देखील इजा करीत नाही.

फक्त अट एकच, कप वापरण्याची पद्धत प्रथम नीट समजून घ्यावी. यु ट्युबवरील व्हिडीओद्वारे याबाबत आणखी सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकेल. कित्येक योगा शिक्षिका, क्रिडाक्षेत्रातील स्त्रिया मेनस्ट्रअल कप वापरतात, कारण सॅनिटरी नॅपकिन्समुळे पुरळ येते, त्वचा सोलपटते. पण ह्या कपमुळे ५ ते ६ तासांची हमखास निश्चिंती मिळते, अगदी कुठल्याही अडचणीशिवाय कप लावल्यानंतरही आपण धावू शकतो, पोहू शकतो, व्यायाम प्रकारही सहज करु शकतो.

साधारण ७०० त १००० रुपयांपर्यंत हे कप बाजारात उपलब्ध आहेत. ऑनलाईनही मागवू शकता. ग्राहकांची मागणी वाढल्यावर ही किंमतही कमी होईल. एकदा कप विकत घेतल्यावर ८ ते १० वर्ष वापरता येतो. नॅपकिन्सपुढे हा खर्च फारच किरकोळ आहे. कारण, हल्ली पॅड्स महाग होत चाल्लेत, त्यामानाने त्यांची गुणवत्ता खालावत चालली आहे. यावर उपाय म्हणून, उत्तम आरोग्य व स्वच्छ पर्यावरण असा दुहेरी फायदा साधणारा मेनस्टॅअल कप बेस्टच आहे.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares