matee (1)

वाचा, मुलतानी माती वापरण्याची योग्य पद्धत!

चेह-याचे रुपडे खुलविण्यात पटाईत असणा-या मुलतानी मातीचे सौंदर्यप्रसाधनात फार महत्त्वाचे स्थान आहे. बाजारात भरपूर त-हेची क्रिम्स उपलब्ध आहेत व दिवसागणिक आणखी नवनवीन क्रिम्सची त्यात भर पडते आहे. ती सारी त्वचेवर सकारात्मक प्रयोग करतीलच असे नाही. मात्र, मुलतानी मातीचे असे नाही. त्वचेचे वय किंवा पोत काहीही असो मुलतानी मातीचा वापर बिनदिक्कत करता येतो.

त्यामध्ये आणखी काही जिन्नस मिसळून घरच्याघरी गुणकारी फेसपॅक देखील बनवणे सोप्पे आहे. ही माती त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते. काळसर डाग, पिपल्स कमी होऊन पुळकुट्या येण्याचे प्रमाण कमी होते. मुलतानी मातीचा नियमित वापर करत राहिल्यास त्वेचेवरील मृत पेशी कमी होतात, तसेच ब्लॅक हेड्सच्या समस्येवरही आराम मिळतो. त्वचेचा पोत जाणून मुलतानी मातीचे ऋतूनुसार विविध फेसपॅक बनवता येतात. ज्यामुळे, त्वचेवरील टॅन कमी होऊन, त्वचा उजळते.

तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती केव्हाही उत्तम! गुलाबपाणी, तुळशीची पाने, चिमुटभर हळद मुलतानी मातीमध्ये मिसळून त्याचा लेप तयार करावा. तयार झालेले हेच फेसपॅक चेह-यावर लावावे, सुकू द्यावे नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. महिन्यातून दोन वेळा असा लेप लावल्या चेह-याची तेलकटी नियंत्रणात राहते.

कोरड्या त्वचेवर मुलतानी माती लावताना त्यात थोडी साय, थोडी बदामाची पूड व चिमूटभर चंदन पावडर मिसळावी. यामुळे, त्वचेची रुक्षता दूर होऊन, ती तजेलदार बनते. हिवाळ्यात कोरड्या त्वचेवर हा लेप लावताना सायीचे प्रमाण थोडे जास्त ठेवावे. जेणेकरुन हिवाळ्यातही त्वचेला तुकतुकीतपणा प्राप्त होईल.

तेलकटही नाही व कोरडीही नाही, अशा त्वचेसाठी मुलतानी माती वापरताना त्यात थोडे दूध, बदामाची पूड मिसळावी. बदाम व दूधामुळे त्वचेला स्निग्धता प्राप्त होते. तर, मुलतानी माती जास्तीची तेलकटी शोषून घेते, ज्यामुळे, त्वेचेचा समतोल साधला जातो.

हल्ली कामाचा ताण, जागरण, सतत कॉम्प्यूटर किंवा मोबाईलच्या स्क्रिनवर रोखलेली नजर, यामुळे सर्वांत जास्त थकवा डोळ्यांना जाणवतो. ज्यामुळे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. डोळे खोल गेल्यासारखे वाटू लागतात. यावर उपाय म्हणूनही मुलतानी मातीचा वापर करता येतो. तिच्यात थोडे गुलाबपाणी, दही व पुदीना मिसळून तयार केलेला लेप डोळ्यांभोवती लावावा, मात्र तो डोळ्यांत जाणार नाही याचीही खबरदारी घ्यावी. थोडावेळ सुकू द्यावा नंतर थंडपाण्याने चेहरा धुवावा.

कदाचित फक्त मुलतानी मातीचा स्वतंत्र्यपणे लेप लावून तुम्ही पाहिला असेल, यापुढे त्वचेचा पोत जाणून त्याप्रमाणे फेसपॅक तयार करता येईल. जो अधिक फायदेशीर ठरेल. प्रयोग करुन पाहा आणि कळवा तुमच्या प्रतिक्रिया. आम्ही वाट पाहतोय तुमच्या प्रतिक्रियांची!

More Articles
Designed and Developed by SocioSquares