Children Saving Banner

तरच, लहानांना पैशाची किंमत कळेल…

आई बाबांचा लाडोबा असणा-या बच्चेकंपनीला न मागताच गरजेच्या वस्तू मिळतात, तर गरजेहून जास्तीच्या ते हट्टाने मिळवतात. जाहिरात, टि.व्ही., सिनेमांत आकर्षकरित्या पेश केलेल्या वस्तू पाहिल्या, की लहानांना त्या लगेच हव्या असतात. शाळेच्या दिवसांपासून स्वत:चा मोबाईल, आयपॉड, टॅब, ब्रॅण्डेड सायकल, घड्याळ, शूज, कपडे अशा मोठ मोठ्या मागण्या वर्षभर सुरु असतात.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबाला सततचा इतका खर्च परवडणारा नसतो. ‘नाही’ म्हटले, की रूसवा, फुगवा, चिडचिड अशी मुलांची आगपाखड सुरु होते. यावर उपाय एकच, एकदाची पदरमोड करुन आई बाबा मुलांचा हट्ट पुरा करतात. हे संकट मुलांच्या वाढत्या वयासोबत मोठ्ठाले रुप घेऊ लागते व थोपवून धरण्यापलिकडे जाते. आई वडीलांनी आपल्या वागणुकीतून पुढील काळजी घेतली, तर नकळत मुलांच्या मनावर पैसे बचतीची शिकवण कोरली जाईल.

१. “आई बाबांकडे पैसे असून, ते मला हवी असलेली वस्तू विकत घेत नाहीत.” लहान मुलांना असा गैरसमज होण्याची दाट शक्यता असते. म्हणून, त्यांच्यासमोर आर्थिक व्यवहारांविषयी बोलणे शक्यतो टाळावे किंवा त्यांच्यापर्यंत किमान चुकीची माहिती जाणार नाही याची काळजी घ्यावी. गरजेनुसार पैशाच्या वापरास प्राधान्य दिले जाते, हे बालवयाला समजत नाही.

२. तुमच्याकडून लहान मुलांनी पैसे घेतल्यास, खर्चानंतर त्याचा हिशोब देखील विचारावा. यामुळे अविश्वास नाही, तर पैसे खर्च करताना जबाबदारी बाळगण्याचे भान दिले जाते.

३. हट्टापुढे आईचा ‘नकार’, बाबांचा ‘होकार’ अशी भिन्न मते नसावीत. अशाने, मुले हट्ट पुरा करणा-याला झुकते माप देऊ लागतात. यासाठी, खर्चाबाबत आई व बाबांचे समान मत असायला हवे.

४. घरातील आर्थिक नियमांवर पालकांनी प्रथम ठाम रहावे. मुलांना पॉकीटमनी देत असाल, तर त्यात दिरंगाई न करता ठरल्या दिवशी द्यावा. यामुळे, मुलांना व्यवहार चोख ठेवण्याची सवय लागते.

५. टेक्नोलॉजीला थोडं बाजूला ठेवून, बोर्ड गेम्सना महत्त्व द्यावं. हसत खेळत संवादातून मुलांशी मैत्री करावी, विविध विषयांवर चर्चा करावी. आर्थिक विषयांनाही यामध्ये स्थान द्यावं.

६. घरात एखादी नवीन वस्तू खरेदी करताना, लहानांनाचेही मत घ्यावे. दुर्लक्ष न करता, त्यांच्या विचारांचा आदर करावा. अशा चर्चेतून, बजेट ठरवून वस्तू निवडण्याची कला त्यांनाही अवगत होईल.

७. तुमच्याकडून हिशोबात चूक झाली, तर तशी निखळ कबुली द्यावी. मुलांसमोर चूक मान्य करण्यात कमीपणा वाटून घेऊ नये. अशाने, व्यवहार्यतेपलिकडे एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती त्यांच्यात रुजवली जाईल.

अशाप्रकारे, अप्रत्यक्षरित्या लहान मुलांना पैशाची किंमत समजावता येईल. ज्यामुळे, खर्चावरुन ‘पाहिजे म्हणजे पाहिजे’ला ‘नाही म्हणजे नाही’ असे वाद पालक मुलांमध्ये रंगणार नाहीत. व्यवहारीक व भावनिक दोन्ही पातळीवर नात्यातील गोडवा टिकून राहील.

More Articles
Designed and Developed by SocioSquares