play (1)

मुलांनी रोज थोडेतरी खेळावे, कारण….

सध्याची लहान मुलं आठवड्याचे सातही दिवस व्यस्त असतात. शाळा, ट्युशन्स, सततच्या स्पर्धा परिक्षा, सुट्टीच्या दिवशी छंदवर्ग, या सा-यात मुलांसोबत त्यांचे पालकही गढून जातात. दर संध्याकाळी मित्रांचा गोतावळा जमवून भरपूर खेळणारी, घामाघूम होऊन, मातीत बरबटून घरी परतणारी मुलं आता फारशी पाहायला मिळत नाहीत. जगभरातले बैठे आणि मैदानी खेळ घराच्या एका कोप-यात बसूनही खेळता येणं शक्य असल्यावर कशाला कोण घराबाहेर पडतयं?

आता मित्रांचा गोतावळा ऑनलाईन जमतो आणि मोबाईलवर गेम्स खेळण्यात कित्येक तास सहज घालवतो. यामध्ये शरीराला मिळणारा व्यायाम शून्य असल्यानं, लहान मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढते. आळस बळावतो. अशा मुलामुलींचे मन कायम कंटाळा व नैराश्याने ग्रासलेले असते, मग अभ्यास करण्यातही उत्साह वाटत नाही. अशी घरकोंबडी बनलेली लहान मुलं हळुहळू आत्मक्रेंदी होऊ लागतात. गर्दीत मिसळून चारचौघांत वावरण्यापेक्षा एकटं राहण्यात त्यांना अधिक मौज वाटते. पालकांच्या हट्टापायी कधी अचानक कुठल्या सोहळ्यानिमित्त अनोळखी व्यक्तिंमध्ये आलीच, तर बावरुन जातात. त्यांना आत्मविश्वासाने स्वत:ची ओळख करुन देणेही अवघड वाटते. धडपडून, रडून कणखर बनणा-या लहान मुलांपेक्षा शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या अशी मुलं कमकुवत असतात.

मोबाईल मधील गेम्स आव्हानात्मक असले, तरी प्रत्यक्ष हरण्याजिंकण्यातली मज्जा अनुभवण्यासाठी समोरासमोर लढत देणंच आवश्यक असतं, यामधूनच खिलाडूवृत्ती वाढीस लागते. इलेक्ट्रॉनिक गेम्समध्ये स्वत:ला पुन:पुन्हा आजमावण्याची संधी मिळत असल्याने, जिंकण्यातला आनंद आणि हरण्यातलं दु:ख दोन्हीही क्षणिक बनून जातं. या आभासी जीवनाच्या अगदी उलट परिस्थिती आपण दैनंदिन जीवनात जगत असतो. त्यामुळे, मिळालेल्या संधीचं पूर्ण प्रयत्नानिशी सोनं करण्याची शिकवण देतात, ते हेच सांघिकरित्या प्रत्यक्ष खेळले जाणारे बैठे किंवा मैदानी खेळ! जे लहानग्यांना नकळतपणे वास्तवाचं भान देतात. संधीचं मोल जाणण्यास प्रवृत्त करतात.

स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी अभ्यासानं, कलाकौशल्यांनी व्यापलेलं कडक वेळापत्रक जितकं गरजेचं आहे, तितकंच आवश्यक आहे दिवसभरातून किमान एक तास लहान मुलांनी मनसोक्त खेळणं, भरपूर घामाघून होणं आणि आज आम्हा मित्रांमध्ये कसा खेळ रंगला याच्या रंजक गोष्टी पालकांनी ऐकणं. यामुळे, पालक मुलांमधील संवाद तर वाढेल आणि त्यांच्यातील स्वभावगुण हेरुन वेळीच त्यांना योग्य वळण लावता यईल.

त्यांच्या दिनक्रमात हा खेळाचा तास पालकांनीच लिहायचायं. अभ्यासाच्या चिंतेला जरा बाजूला ठेवून, फक्त मनसोक्त खेळू द्या किंवा तुम्ही जर तुमच्या मुलांना शाळेतील विविध क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन देत असाल, तर अभिनंदन! तुम्ही जागृत पाकलांच्या गटात मोडताय. नियमित खेळल्याने त्यांचे शरीर सुदृढ होईलच, पण मानसिकदृष्ट्या देखील ते प्रगल्भ बनू लागतील.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares