holi banner

या उपायांनी धुळवडीचे रंग झटपट निघतील…

रंगांशी मनसोक्त खेळण्याची संधी देणा-या होळी सणाचं लहान थोर सां-यानाच विशेष आकर्षण वाटत आलंय. मात्र, ह्यालाही काही अपवाद आहेतच. त्वचेच्या काळजीपोटी रंगांपासून चार हात लांब राहणारे, धूळीच्या त्रासाने त्रस्त असणारे शक्यतो या सोहळ्याच्या वाट्याला जात नाहीत आणि याउलट वर्षभर धुळवडीची आतुरतेने वाट पाहणारे रंगांमध्ये बेदम न्हाऊन निघाल्याशिवाय रहात नाहीत व वापरलेले रंग त्वेचेवरुन सहज निघत नाहीत. दोन चारदा चोळून चेहरा, हात, पाय धुतले तरी पूर्णत: रंग जात नाहीत. उलट त्वचेवर पुरळ उठते, त्वचा जळजळते व अधिक कोरडी होते. अशा परिणामांना सामोरे जायचे नसेल, तर मुळात रंग निवडाताना ते नैसर्गिक असतील याची खातरजमा करुन घ्यावी. चांगल्या ब्रॅण्डचेच रंग विकत घ्यावेत आणि वापरलेले रंग त्वचेवरुन घालवण्यासाठी पुढील घरगुती उपाय आहेत की तयार! हे उपाय चेह-यासाठी उपयुक्त आहेतच, सोबत हातापायांची त्वचाही या उपयांनी स्वच्छ करता येते.

  • मूळ्याच्या रसात बेसन व दूध मिसळून त्याचा घट्टसर लेप तयार करावा. हा लेप त्वचेवर लावावा. लेप तसाच सुकू द्यावा व नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे, रंग निघतीलच पण त्वेचेचा कोरडेपणाही दूर होईल.
  • कच्च्या पपईच्या गरात थोडे दूध, बेसन व बदामाचे तेल मिसळून तयार झालेला जाडसर लेप त्वचेवर लावावा. साधारण २० ते २५ मिनिटांनी त्वचा स्वच्छ धुवावी.
  • बेसनमध्ये थोडा लिंबाचा रस व दूध मिसळून तयार केलेला लेप रंगलेल्या त्वचेवर लावावा. लेप सुकल्यानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करावी.
  • तसेच, केसांना व केसांखालील त्वचेस लागलेला रंगही साध्या शॅम्पू करण्याने ब-याचदा निघत नाही. अशावेळी. ५ टे.स्पू. नारळाच्या दूधात, ३ टे.स्पू, नारळाचे तेल मिसळून केसांना हलक्या हाताने मसाज करावा. साधारण तासभर हे मिश्रण केसांवर तसेच राहू द्यावे, त्यानंतर गरम पाणी व तुम्ही वापरत असलेल्या शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ धुवावेत. असे केल्याने, केसांत अडकलेले रंगांचे बारीक कण देखील निघून जातील व केस पूर्णत: स्वच्छ होतील.

गेल्या कित्येक वर्षांपासून पाणी न वापरता धुळवड खेळण्याचे आवाहन पर्यावरण स्नेही करत आहेत. तसेच, केमिकल मिश्रित रंगांऐवजी नैसर्गिक रंग वापरण्यावर भर देण्यास सांगितले जातेय. याचा सकारात्मक परिणाम हलका हलका दिसू लागलाय, हे तुम्हालाही जाणवत असेल ना? पाण्याचा अपव्यय टाळणा-यांची संख्या वाढतेय, पण रंग निवडीबाबत ढिसाळपणा करणारे आजही भरपूर आहेत. म्हणूनच, त्वचेवर लागलेल्या रंगांचा आणखी कुठल्याही केमिकल्सची संपर्क न येऊ देता, वरील घरगुती उपायांनीच त्वचा स्वच्छ करणे सोयीचे ठरेल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares