haldi kumkum banner

‘या’ वस्तू ठरतील अचूक हळदी कुंकवाचे ‘वाण’!

मैत्रिणींची भेट घेण्या कारण का हवे! मनात आले की भेटावे, फोन करावा, तिच्याशी चॅट करावे आणि मैत्रिणीचे घर अगदीच हाकेच्या अंतरावर असेल, तर धावती भेट घ्यावी. इतके सोप्पे झाले असूनही संक्रांतीत हळदी कुंकवाच्या निमित्ताने मैत्रिणींना घरी बोलवण्याची हौस आजही टिकून आहे. कारण, विचारांचे रुप मॉडर्न असले, तरी मनामनात परंपरेची वीणही तितकीच घट्ट आहे. बरेच सण साजरे करण्याच्या पद्धतींत काळानुरुप बदल झालेत. तसे, हळदी कुंक सोहळ्यात ‘वाण’ म्हणून लुटण्याच्या वस्तू तेवढ्या बदलल्यात.

सुरवातीच्या वर्षांत चांदीची जोडवी, साखरेच्या पुड्या, फळे असे ठरलेले वाण देऊन झाल्यावर, “आता यावर्षी काय द्यावे?”, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात समस्त महिला मंडळ गर्क होते. मग, काचेचे – प्लॅस्टिकचे डबे, चमचे, वाट्या, ग्लास, शॅम्पू, पावडर, तेलाची बाटली अशा वस्तू वाण म्हणून लुटण्याचा सध्या ट्रेंड आहे. पण, तुम्ही काहितरी हटके करण्याचा विचारात असाल, तर खालील वस्तू वाण म्हणून निवडून तर पाहा, मैत्रिणींमध्ये तुमचे कौतुक झाले नाही, तरच नवल!!

  1. सुपारीच्या झाडापासून तयार केलेली लहान मोठी ताटे आणि वाट्यांचा इकोफ्रेंडली सेट देता येईल. ह्या वस्तू एकदा वापरुन झाल्यावर खासून पुसून स्वच्छ करुन, पुन्हा वापरता येतात आणि अगदी माफक दरात या बाजारात उपलब्ध आहेत.

 

  1. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे, हे आपणा सर्वांस ठाऊक असेलत. तेव्हा, खास पाणी पिण्यासाठी तांब्याचा पेला किंवा लहानही तांब्याची बाटली देणे नक्कीच उपयोगी ठरेल. फक्त थोडसं बजेट वाढेल!

 

  1. तुळशीचे रोप एक औषधी वाण, तसेच या रोपास धार्मिक महत्त्वही आहे. फुलझाड, कडीपत्ता, पुदिना या रोपांचाही विचार करता येईल.

 

  1. पुस्तक वेड्यांस मिळतील तितकी पुस्तके कमीच असतात. मात्र, सगळ्याच मैत्रिणींना काही पुस्तकं वाचायला आवडत नाही, पण स्वयंपाक घरात नवनवे प्रयोग करायला तर आवडतात. यासाठी, लहानशा रेसिपी बुक्स वाण म्हणून हमखास निवडता येतील.

 

  1. प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बहिष्कार टाकत कापडी पिशव्यांचा हट्ट धरायचा, तर स्वत:पासून सुरुवात करायला हवी ना! रंगीत संगीत कापडी किंवा ज्युटच्या पिशव्या तुमच्या मैत्रिणींना नक्की आवडतील. तुम्हाला शिवणकाम, पेटिंग, भरतकाम अशा कल्पकतेची आवड असेल, तर त्याचा कापडी पिशव्या सजवण्यासाठी उपयोग करता येईल.

 

  1. वाण म्हणून चिरलेल्या भाज्या देण्याची अंतरंगी धम्मालही करता येईल! मात्र भाजीचा प्रकार निवडताना बुहजनांच्या पसंतीची निवडली तर उत्तम!

 

या सा-या वस्तूंपलीकडचे समाजोपयोगी ‘वाण’ लुटण्याचा पर्यायही निवडू शकता. ज्याप्रमाणे, स्वत:जवळील कला गरजू महिलांना शिकवता येईल. स्वयंपाकातील हातखंड्या रेसिपीज्, गायन, नृत्य, कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याची तंत्रे, शिवणकाम, विणकाम किंवा स्वसंरक्षणाचे धडे दिल्यास त्यांना लघुउद्योग सुरु करण्याचा मार्ग मिळेल. हे वाण सोयीनुसार फक्त पाच महिलांना जरी देता आले, तरी त्याचे मोल त्याच्या शंभर पट भरेल हे नक्की!!

More Articles
Designed and Developed by SocioSquares