halikumku banner

‘या’ वस्तू ठरतील हळदी कुंकवाचे वाण!

हळदीकुंकू सोहळ्याची आखणी तुमच्याही घरी सुरु असेल ना? वाण म्हणून यंदा कुठली वस्तू निवडावी? सगळ्यांकडे सगळंच असतं हल्ली, मग काय दयावं मैत्रिणींना? या विचारात बाजार, शॉपिंग सेंटर, मॉल धुंदाळून झाले असतील, तरी अजूनही तुमच्याहाती काही लागले नसेल, तर हा लेख तुमच्याचसाठी आहे. आज वाण म्हणून लुटाव्यात अशा काही कल्पक युक्त्या पाहणार आहोत.

झी मराठी जागृतीने गेल्यावर्षी झाडाचे रोप, पुस्तकं किंवा कापडी पिशवी, वाण म्हणून लुटण्याचे आवाहन मैत्रिणींना केले होते आणि आनंदाची बाब म्हणजे झी मराठी जागृतीच्या मैत्रिणींनी यास  भरभरून प्रतिसाद दिला. झाडाची रोपे, कापडी पिशव्या विकत घेतल्यावर त्याचे फोटोज आम्हाला मेसेज केले, कमेन्ट बॉक्समध्ये शेअर केले, पाहून छान वाटलं. प्लॅस्टिकची भांडी, डबे, चमचे असे निसर्गाची हानी करणा-या निरुपयोगी वस्तू वाटण्यापेक्षा पर्यावरणदायी वाण लुटणे केव्हाही उत्तमच, पण यंदा वाण म्हणून आणखी अनोखी संकल्पना घेऊन आलोय. पाहा कशी वाटतेय.

परिसरात अंध, अपंग, गतिमंद शाळांतील मुलांनी तयार केलेल्या किंवा कारागृहातील व्यक्तिंनी बनवलेल्या वस्तू वाण म्हणून लुटाव्यात. बड्या दुकानांतून वस्तू विकत घेण्यापेक्षा, अशा हॅण्डमेड वस्तू विकत घ्याव्यात.

तसेच, तुम्हा मैत्रिणींचा भिशी ग्रुप, सोसायटीचा ग्रुप वा एखादा वॉट्सऍप ग्रुप असेलच. सगळ्याजणी एकत्र येऊन पुढील उपक्रम तडीस नेऊ शकता. तुम्ही प्रत्येकीनी २०-२५ जणींच्या हिशाबाने जितके पैसे वाण विकत घेण्यासाठी, म्हणून बाजूला काढले असतील तितके सगळे एकत्र करा.

तुमच्या घरापासून कमी-दूर अंतरावर अंगणवाडी, दगडी शाळा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम असेल? यापैकी एखादे ठिकाण निवडा. त्याला सहज भेट द्या. तिथे कुठल्या वस्तूंची गरज आहे, याचा अंदाज घ्या. जसं, अगंणवाडी किंवा छोट्या शाळांना तेथील मुलांना शैक्षणिक साहित्याची आवश्यकता असते. तेव्हा पाटी, पेन्सिल, पुस्तक, दप्तर, खडू, चित्रकलेचे कागद किंवा रंगपेट्या देता येतील. आश्रमाला पुस्तकांचा, करमणुकीच्या साधनांचा पुरवठा करता येईल.

मकरसंक्रातीच्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी तुमचे महिलामंडळ जमले, की प्रथम एकमेकीला हळदी कुंकू व तिळगूळ द्या, मग ठरवल्याप्रमाणे विकत घेतलेल्या वस्तू व तिळगूळ घेऊन शाळा, आश्रम जे ठिकाण तुम्ही निवडले तिथे पोहचा. त्यांच्यावरील संक्रात थोड्या फार प्रमाणात का होईना, पण दूर लोटण्यात आपण खारीचा वाटा उचलल्याचे समाधान नक्की मिळेल.

वरील दोन्ही संकल्पनांहून निराळा उपक्रम म्हणजे, परिसरातील मोकळ्या जागी झाडे लावावीत. मकरसंक्रातीनिमित्त लावलेली झाडे वर्षभर भरभरुन आशिर्वाद देतील. वाण लुटून मैत्रिणींपर्यंतच स्तिमित होणारा आनंद, आता चौफेर उधळला जाईल. हे लक्षात आलंय का तुमच्या?

More Articles
Designed and Developed by SocioSquares