shravan sari (1)

महिलांना श्रावण आवडतो, कारण….

चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून वर्णिलेला श्रावण! बेधुंद पावसात श्रावणसरींचे आगमन झाले, की मन अगदी प्रफुल्लीत होतं. मनावरची मरगळ दूर करणा-या श्रावणाशी निगडीत या पाच गोष्टी तुमच्याही आवडीच्या आहेत का?

निसर्ग
‘श्रावण’ वर्णावा निसर्गाने, पावसाने हिरवे गर्द केलेले वातावरण, झाडापानांत फुलांनी उधळलेल्या रंगांसोबत, साहित्यिकांच्या नजरेतून श्रावणाच्या अनेक त-हा अनुभवताना, अप्रत्यक्षपणे सर्वत्र आनंदीआनंद जाणवू लागतो. निसर्ग सौंदर्याचा मोह हेच श्रावण प्रिय होण्याचे महत्त्वाचे कारण, ज्याला पुढील चार कारणांची जोड मिळते.

भक्तीरंग
देवाची उपासना कुठल्याही वयोगटापुरता मर्यादित नव्हती. आजही भजन–किर्तन अशा सामूहिक उपासनेत सर्व वयोगट मोठ्यासंख्येने सहभागी होतात. विविध व्रत, वैकल्यांची वर्षभर रेलचेल असली, तरी पूजा-पाठ, जप, पारायणे, सप्ताह यांसाठी श्रावण अधिक पवित्र मानला जातो. पूर्वापार चालत आलेल्या पद्धती महिलाही मनोभावे आपलाशा करतात.

उपवास
कामाचा व्याप सांभाळताना डाएट करायला सवड मिळत नाही. व्यायाम, योगा किंवा व्हिटॅमिन्सचा तक्ता, फायबर्स, कॉलेस्ट्रॉलची गणना रोजच्या धावपळीत कधी करणार? अशावेळी, श्रावण खाण्यावर थोडा संयम राखण्याची नामी संधी देतो. श्रावणी सोमवार किंवा सणवारामुळे येणारे उपवासाचे योग मैत्रिणींची डाएटची इच्छा पूर्ण करतात. श्रद्धा तर असतेच, पण काहीही अरबट चरबट खाण्याला लगाम देऊन, जरा पोटाला आराम मिळतो. आरोग्याकडे लक्ष दिल्याने तिलाही मनोमनी बरे वाटते.

शाकाहार
नॉनव्हेजला थोडा ब्रेक देऊन, फक्त शाकाहार घेण्याचा महिना म्हणजे ‘श्रावण’! या प्रथेमागे अनेक शास्त्रीय कारणे असतील, पण नॉनव्हेज पदार्थ बनविण्यातून थोडी विश्रांती मिळाल्याने गृहिणी नक्कीच सुखावतात. खाण्याचे वार, मच्छीचे वाढते भाव, किचनमधील झणझणीत चवींचा व्याप, जास्तीची स्वच्छता या कशाचीच काही दिवस चिंता नसते. भाजी, पोळी, वरण, भात किंवा नैवेद्यासाठी गोडाचे नवे प्रयोग करण्याची आयती संधी मिळते.

मंगळागौर
मैत्रिणींना भेटायला कुठलेही कारण लागत नाही, पण याच मैत्रिणी नटून थटून एकत्र जमल्या, की त्यांचा उत्साह पहाण्यासारखा असतो हे देखील तितकेच खरे! लग्नकार्य किंवा मुंज कुठल्याच कार्यक्रमाला श्रावणातल्या मंगळागौरीची सर नाही. पूजा, फुलांची आरास, रांगोळीची नक्षीदार वळणे, गाण्यांची रंगत व फेर धरणा-या मैत्रिणींचा उल्हास. या सा-यातून प्रत्येक ‘ती’ नकळतपणे थोडा वेळ स्वत:ला देते.

स्वच्छ व सात्विक वातावरण निर्माण करत, मनामनात निर्मळ आनंदाची पेरण करणारा श्रावण; तुमच्यासाठी कुठल्या कारणामुळे स्पेशल आहे? तुमचे उत्तर लिहा ब्लॉगखालील कमेन्ट्समध्ये! आम्ही उत्सुक आहोत तुमच्या मनातील श्रावण जाणून घेण्यासाठी….

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares