yoga traner (1)

योगा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी!

भारतीय संस्कृतीनं जगाला दिलेलं योगशास्त्राचं वरदान आरोग्यासाठी संजीवनीसमान गुणकारी ठरतंय. निरोगी स्वास्थ्यासाठी योगाचा मार्ग अवलंबणा-यांची संख्या वेगाने वाढतेय. त्याचे महत्त्व आता फक्त जागतिक योग दिनापुरतेच मर्यादित राहिलेले नाही, तर सर्ववयोगटातील मंडळी उत्साहाने हे शास्त्र आत्मसात करु पाहातायत. हेच योगाचे वाढते प्रस्त आपल्यासमोर खुले करतेय करिअरच्या नव्या वाटा!

शरीराच्या आंतर्बाह्य स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व तुम्ही जाणून असाल किंवा योगा तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला असेल, तर या शास्त्राविषयीची हीच आवड व ओढ करिअरमध्ये रुपांतरित होऊ शकते, अगदी वयाच्या चाळीसीनंतही अर्थार्जनाचा पर्याय म्हणून योगाकडे पहाता येईल.

चिकित्सिक वृत्तीने योगशास्त्राचा खोलवर अभ्यास करुन, त्याचे साग्रसंगीत प्रशिक्षण घेता येते. यामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण, डिप्लोमा, तसेच कमी कालावधी घेणारे विविध कोर्सेसही उपलब्ध आहेत. योग आर्ट, योग थेरपीसारखे परिपूर्ण कोर्स करत योग एक्सपर्ट, नॅचरोपाथीच्या दिशेने करिअरला आकार देता येईल.

या ज्ञानाच्या जोरावर रोजगाराचे भरपूर पर्याय दिसू लागतील. जसं की, विविघ क्षेत्रांमध्ये योग प्रशिक्षकाची गरज आहे. जसे, शाळा, कॉलेज, ऑफिसेसमध्ये योगासाठी काही वेळ राखीव ठेवण्याचा नवा पायंडा पडलाय. विद्यार्थी, कर्मचा-यांचा दिनक्रम बहुतांशवेळा तणावाखालीच जातो. त्यांचे मानसिक-शारीरिक स्वाथ्य निरोगी रहावे या उद्देशाने, त्यांच्याकडून योग प्रकार करुन घेतले जातात. अशा संस्थांमध्ये योग प्रशिक्षकाची भूमिका पार पाडता येईल.

तसेच, दिवसागणिक विस्तारत चाललेले सौंदर्य क्षेत्रातही योगा तन्ज्ञांसाठी सुवर्णसंधी आहेत. ब्युटी सलून, हेल्थ स्पा, हेल्थ क्लब, जीम, उपचार केंद्रे तसेच नवनवी आरोग्य दालनांत गुणी योग प्रशिक्षकांची नितांत गरज असते. यापलिकडे, योगाकडे स्वत:चा व्यवसाय उभारण्याच्या दृष्टीने पहात असाल, तर तेही शक्य आहे. उद्योजक, व्यापारी, सिनेतारका असे बडे असामी त्यांच्या व्यस्त दिनक्रमामुळे खाजगी योग प्रशिक्षक नियुक्त करणे पसंत करतात. जागेची अडचण नसल्यास अगदी घरच्याघरी स्वत:चे क्लासेसही सुरु करु शकता. फार भांडवलाचीही आवश्यकता नाही.

बिघडलेली जीवनपद्धती काही दशके मागे जात पुन्हा पुर्ववत करणं तर अशक्य आहे. नव्या जीवनशैलीत इतके पक्के जखडले गेलोत, की आता सुवर्णमध्य साधण्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा आरोग्याचे योग्य संतुलन राखण्यासाठी योगाच्या साथीने स्वत:चे आरोग्य जपायला हवेच. सोबत त्याच ज्ञानाचा उपयोग करुन रोजगाराचे दालन खुले होत असल्यास, त्याचाही गांभीर्याने विचार करायला हवा.

कळवा आजचा करिअर लेख तुम्हाला कसा वाटला ते! आधित तुमच्या मनातील करिअर क्षेत्रांविषयी देखील आवर्जून सांगा. आम्ही वाट पाहतोय तुमच्या प्रतिक्रियांची!

More Articles
Designed and Developed by SocioSquares