lipstick (1)

योग्य लिपस्टिक निवडावी अशी….!

संपूर्ण मेकअप नाही केला, तरी फक्त हलकीशी लिपस्टिक आणि आयलायनरने चेहरा खुलून दिसतो. कार्यक्रम कुठलाही असो, घरगुती किंवा मोठ्ठाला पारंपारिक सोहळा, नाहितर मग वेस्टर्नमध्ये मोडणारी पार्टी असली तरी थोडा टचअप केल्याशिवाय तरुणी घराबाहेर पडतील तर शप्पथ! लिपस्टिक लावल्याशिवाय आजच्या मुली कॉलेजलाही हजेरी लावत नाहीत. सवय चांगली आहे, पण लिपस्टिकची निवड करणेही जमायला हवे. आजची माहिती लक्षपूर्वक वाचणा-या, स्वत:साठी योग्य लिपस्टिक निवडतीलच, सोबत मैत्रिणींनाही छान टिप्स देऊ शकतील.

उजळ त्वचा:

या रंगाची त्वचा असणा-या मुलींनी लाल, नारंगी, गुलाबी, आबोली, पीच रंगासोबत, गडद जांभळा रंगही बिनधास्त निवडावा. मॅट फिनिशिंग असणारी लिपस्टिकही शोभून दिसेल. गडद रंगाची लिपस्टिक वापरल्यावर डोळ्यांचा मेकअप थोडा फिकट करावा.

सावळी त्वचा:

त्वचा गहूवर्णीय असल्यास थोडे ब्राईट रंगांना प्राधान्य द्यावे. ज्याप्रमाणे, राईप ऑरेन्ज, कोरल किंवा फिकट गुलाबी शेड्स निवडाव्यात. डोळ्यांना गडद मेकअप केल्यास, ओठांसाठी फिकट रंगाची लिपस्टिकच निवडावी. जेणेकरुन मेकअप गॉडी न वाटता, चेह-याचे योग्य संतुलन राखले जाईल.

कृष्णवर्णी:

त्वचा अधिक सावळी असेल, तर ब्राऊन, बर्गंडी, कॉफी, ऑक्सब्लड, ब्रॉन्झ अशा रंगाच्या लिपस्टिकही हमखास शोभून दिसतील. मॅट किंवा ग्लॉसी कुठल्याही प्रकाराची लिपस्टिक निवडू शकता. कृष्ण त्वचेमुळे नवीन शेड्स वापरून पाहाताना कचरु नये. मर्यादित पर्यायांमध्ये अडकू नये.

लिपस्टिक निवडणे सोप्पे जावे, म्हणून त्वचेच्या रंगानुसार गट पाडले आहेत. पण या रंगांपलिकडेही विचार करु शकता. फक्त जी लिपस्टिक निवडाल, ती बिनदिक्कत लावावी आणि तितक्याच आत्मविश्वासाने कॅरी करावी.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares