Blood Donation Banner

रक्तदान – ‘वाचवाल तर वाचाल’

आपण दिवसभरात जे काही खातो, पितो त्यावर आपल्या शरीराद्वारे त्या खाल्लेल्या अन्नावर प्रक्रिया होऊन रक्ताची निर्मिती होते. ही प्रक्रिया अखंड चालू असते. पण अनेकदा अपघात झाल्यावर त्यात अपघातात बराचसा रक्तस्त्राव झाल्याने, एखाद्या असाध्य किंवा दुर्धर आजारामुळे किंवा एखादी शस्त्रक्रिया करताना जर रक्ताची गरज भासली तर हे रक्त दुस-या व्यक्तीकडूनच घ्यावे लागते. त्यामुळे अशा वेळेस रक्तदानाची तीव्र निकड भासू शकते. म्हणूनच रक्तदानाला आजच्या जमान्यात सर्वश्रेष्ठ दान म्हणून संबोधण्यात येते.

आपत्तिजनक परिस्थिती कधी निर्माण होईल हे आपण सांगू शकत नाही. आजकाल ब-याच व्यक्ती हिमोफिलीया तसेच थैलसीमिया यांसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत आहेत. थैलसीमिया या आजारात त्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त हे दर तीन आठवडयांनी बदलावे लागते. तसेच ल्युकेमिया म्हणजेच रक्ताचा कॅन्सर या रोगात सुद्धा रुग्णाला रक्ताची अधूनमधून गरज भासते. त्यामुळे ज्या व्यक्ती सशक्त, सुदृढ़ आणि निरोगी आहेत त्यांनी एका ठराविक कालावधीनंतर रक्तदान करणे गरजेचे आहे. साधारण व्यक्तीच्या शरीरात दर 24 तासांनी नवीन रक्त तयार होत असते. निरोगी व्यक्तींद्वारे केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचविण्यासाठी केला जातो.

18 वर्षांवरील कोणीही व्यक्ती हा रक्तदान करू शकते. एक निरोगी व्यक्ती दर 3 महिन्यांच्या कालावधीनंतर रक्तदान करू शकते. फक्त त्या व्यक्तीचे वजन 45 किलो किंवा त्याहून जास्त असणं गरजेचं आहे. रक्तदान करताना किंवा केल्यावर साधारण व्यक्तीस कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. तसेच रक्तदानासाठी 5 ते 10 मिनिटांचा कालावधी लागतो. एक व्यक्ती एका वर्षातून कमीत कमी 3 वेळा रक्तदान करू शकते. महिला दर 4 महिन्यांनी रक्तदान करू शकतात. ज्या व्यक्ती क्षयरोग, हेपेटायटिस, डेंग्यू, मलेरिया, उच्च रक्तदाब, मधुमेह, एड्स या आजारांनी पीड़ित आहेत त्या रक्तदान करू शकत नाही. धूम्रपान करणा-या व्यक्तींनी रक्तदानाच्या 24 तास आधी धूम्रपान करू नये आणि 48 तास आधी मद्यपान करू नये.   गर्भावस्थेत तसेच बाळंतीण असणाऱ्या स्त्रिया रक्तदान करू शकत नाहीत. प्रसुतीनंतर 6 महिन्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने स्त्रिया रक्तदान करू शकतात. रक्तदानासाठी एका वेळी 350ml रक्त हे आपल्या शरीरातून घेतले जाते.

कुठल्याही मान्यताप्राप्त शिबिरांत किंवा स्वयंसेवी संस्थांमध्ये रक्तदान करण्यास काहीच हरकत नाही. पण आजकाल एक नवीन संकल्पना अस्तित्वात आली आहे. आजकाल सोशल मीडिया मार्फ़त असे अनेक समूह कार्यरत आहेत जे एखाद्या व्यक्तीला त्वरीत रक्तदात्याची सोय जागच्या जागी करून देतात.यालाच फ्रेश डोनर असंही म्हणतात. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील व्यक्तीला रक्ताची गरज असते तेव्हा तुम्ही या समूहांशी संपर्क साधला असल्यास गरजेप्रमाणे व्यक्ती थेट रक्तदाता म्हणून उपलब्ध होऊ शकतात. म्हणूनच फ्रेश डोनर हा प्रकार सर्वोत्तम आहे. कारण यामार्फ़त रुग्णास त्वरीत रक्त उपलब्ध होते. ज्यामुळे त्याचा जीव सुद्धा वाचतो. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी वेळच्या वेळी न चुकता अवश्य रक्तदान करा. आपल्या एका कृतीमुळे आपण अनेक जणांच्या कामी येऊ शकतो. तसेच नियमित रक्तदान केल्याने आपल्याही शरीरात सतत नवीन रक्त तयार होत असते. ज्यामुळे आपण सतत अधिकाधिक निरोगी राहतो. रक्तदानाने आज जर तुम्ही एखाद्याच आयुष्य वाचवलंत तर भविष्यात कोणीतरी तुमच्या कामी येईल. त्यामुळे रक्तदान करा कारण आज जर कोणाला वाचवाल तर भविष्यात स्वतः वाचाल…

More Articles
Designed and Developed by SocioSquares