tilgul banner

रेसिपी – तिळगूळ

गुळाच्या पाकातले बोचरे तिळ घट्ट बांधताना हाताला बसणारे पाकाचे चटके अनुभवतो, तेव्हा खरा येऊ घातलेल्या मकरसंक्रातीचा हिवाळी गोडवा घरभर आणि मनभर झिरपू लागतो. चला तर तयारीला लागूया, कधी घेताय तिळगूळ करायला?

साहित्य

१/४ किलो चिकीचा गूळ, १/४ किलो तीळ(भाजलेले), १ चमचा तूप, ३ ते ४ चमचे दाण्याचा कूट, काजू, मनुका, भाजलेला सुक्या खोब-याचा किस

पाककृती

प्रथम गूळाचा पाक तयार करुन घ्यायचाय, एका कढईत गूळ घेऊन तो थोडा वितळल्यावर त्यात चमचाभर तूप घालावे. पाक ढवळत रहावा, म्हणजे गूळ कढईला चिकटणार नाही किंवा तो करपणार नाही.

गूळ संपूर्ण वितळल्यावर उकळी येईस्तोवर व्यवस्थित ढवळत रहावा. एका भांड्यात भाजून घेतलेले तीळ घेऊन, त्यात दाण्याचा कूट, काजूचे बारीक केलेले तुकडे, मनुका, किसलेले व भाजून घेतलेले सुके खोबरे व वेलची पावडर त्यात घालावी.

सर्व जिन्नस चमच्याच्या सहाय्यानेच एकजीव करुन घ्यावेत. आता तयार पाकात या सर्व जिन्नसांचे मिश्रण घालावे.

पाकाचा अंदाज घेत हळूहळू तिळाचे मिश्रण त्यात घालावे व पुन्हा मंद आचेवर पाक व सुके जिन्नस छान एकजीव करुन घेतल्यावर गरमागरम लाडू वळायला घ्यावेत.

हाताला मिश्रणाच्या चटक्यापासून वाचवण्यासाठी पाण्याचा हात घ्यावा किंवा अधूनमधून थोडे तूप हाताला चोळावे. म्हणजे, गूळाचे तीळाचे मिश्रण हाताला चिकटून रहाणार नाही.

लहान मोठ्या हव्या त्या आकाराचे लाडू वळून घ्यावे व गोड गोड बोलत, खवय्यांना सर्व्ह करावेत.

तुम्ही तयार केलेल्या तुळगूळाचे फोटोज आमच्यासोबत शेअर करायला विसरु नका. कमेन्टबॉक्समध्ये तुमच्या तिळगूळांची आम्ही वाट पाहतोय.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares