DOSA (2)

रेसिपी – मुगडाळीचा डोसा

निराळ्या चवीचा डोसा आता घरच्याघरी, तोही स्वादिष्ट व पौष्टिक. हा मूगडाळाचा डोसा ब्रेकफास्टसाठी उत्तम पर्याय आहेच, सोबत भिशी, बर्थडे पार्टीसारख्या छोटेखानी सोहळ्यांसाठीही टेस्टी पर्याय ठरेल.

साहित्य :–

१/२ वाटी हिरवी सालासहित मूगडाळ, २ टे.स्पू. तांदळाचे पीठ, कोथिंबीर, १ लहान कांदा, २ हिरव्या मिरच्या, तेल, मीठ.

पाककृती :–

सर्वप्रथम हिरव्या सालासकट मूगडाळ ४ ते ५ तास पाण्यात भिजत ठेवावी. त्यानंतर, त्यातील पाणी काढून टाकावे व मूग विलग करुन घ्यावेत. शक्य होतील तितकी साले काढून टाकावीत. काही राहीली तरी हरकत नाही, त्यांच्यामुळे डोस्याला छान हलकासा हिरवा रंग येतो.

हिरव्या मिरच्यांचे तुकडे, बारीक चिरलेला हिरवा कांदा, कोथिंबीर आणि मूगडाळ मिक्सरमध्ये पाण्याच्या सहाय्याने जाडसरसे वाटून घ्यावे. तयार मिश्रणात तांदळाचे पीठ, मीठ व १/२ टि.स्पू. तेल मिसळून चमच्यानेच मिश्रण ढवळून घ्यावे. आता, तव्यावर व्यवस्थित डोसा पसरवता येईल इतपत त्यात पाणी मिसळून पुन्हा एकदा मिश्रण चमच्याने नीट ढवळावे.

त्यानंतर, डोसा तव्याला चिटकू नये म्हणून, तापलेल्या तव्यावर हलकेच मिठाचे पाणी शिंपडून त्यावर डोसा पसरवावा. मस्त लालसर खरपूस रंगाचा होऊ द्यावा. प्रत्येक डोस्यानंतर तवा कापडाने स्वच्छ करावा व पुन्हा मीठाचे पाणी शिंपडावे. अशाप्रकारे, तयार झालेले कुरकुरीत गरमागरम मूगडाळीचे डोसे चटणीसोबत सर्व्ह करावेत.

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares