LAGN PRASHN (1)

लग्नझालेल्या ‘ती’ समोरील प्रश्न!

समाजातील साक्षरतेचा आकडा वाढतोय, पण हा सुशिक्षितपणा स्त्रियांना दिल्या जाणा-या वागणूकीत आजही पुर्णत उतरलेला दिसत नाही. शिकल्या सवरल्या घरातील व्यक्तिही जुन्या विचारांचा माग सोडण्यास तयार नसतात. ग्रामीण भागासोबत शहरातही नवरीमुलगी लग्नांनंतर अशा काही समस्यांशी आजही झगडतेय.

१. साडीचं नेसावी –
सध्याची सुटसुटीत फॅशनशैली जिन्स टॉप, कुर्ती पसंत करते. पारंपारिक पेहरावात मोडणारी साडी मोजक्या सोहळ्यांना नेसली जाते. मात्र, लग्नानंतर साडी नियमित घालण्याची सक्ती ज्या मुलींच्या वाट्याला येते. त्यांना मात्र ट्रेंडी फॅशनचा नाद सोडवा लागतो कायमचा!

२. डोक्यावरुन पदर हवाच –
साडी नेसायला हवी, सोबत डोक्यावरील पदरही पडता कामा नये. चेहरा झाकणारा घुंगट प्रकार सिनेमात पाहायला बरा वाटतो, पण प्रत्यक्षात अनुभवताना मुलीच्या नाकीनऊ येत असणार हे नक्की! शालीनतेचे प्रतिक असणार घुंगट आजही कित्येक महिलांच्या नशीबी येतोय व त्याही तो निमुटपणे स्विकारतायेत.

३. नोकरी सोडावी –
उच्चशिक्षण घेऊन पुरेशा पगाराची नोकरी धरुन, स्वाभिमानी जीवन जगणा-या कित्येक मुलींना लग्नानंतर नोकरी सोडावी लागते. पैशासाठी नाही, पण किमान समाधानासाठी कित्येक वर्षांच्या मेहनतीचे चीज व्हावे म्हणूनतरी नोकरी करण्याची मुभा त्यांना हवी असते. पूर्णवेळ गृहिणीची भूमिका बजावताना पैसे कमविण्याची ताकद असूनही, किरोकोळ खर्चासाठीही नव-याजवळ पैसे मागावे लागतात.

४. नातूच बरा-
स्त्री भ्रुण हत्येच्या बातम्या, दिवसेंदिवस कमी होणारी मुलींची संख्या पाहाता, नातावाची अपेक्षा असणारी कुटुंबे समाजात किती आहेत, ह्याची गणतीची नको! मुलगा मुलगी समानतेविषयी जनजागृती होतोय, तरी अनेक दुर्देवी मुलींच्या नशीबी नातवाचा हट्ट येतोय.

५. शेवटचा मान-
घरातील महत्त्वाच्या व्यवहारात स्त्रियांचे मत घेण्याची पद्धत दूरच, काहीजणी एकत्र पंगतीला बसणेही मुकतात. घरातील सर्वांचे जेवण झाल्यावर, मागाहून जेवायला बसणा-या अनेक स्त्रिया आजही घरोघरी दिसतील. प्रथम इतरांना जेवण वाढण्याची ही पद्धत काही स्त्रिया आनंदाने स्विकारतात, तर काहींना ही रीत मोडून एकत्रच जेवायला बसण्याचा आग्रहही धरला जात नाही, हे देखील खरे!

वडीलधा-या व्यक्तिंपुढे, संस्कारांच्या दडपणाखाली ‘ती’ देखील या विचारांना विरोध करत नाही. याउलट बेडरपणे आपली मत मांडणा-या मुलींचे मोडणारे संसार पाहाता, बाकीच्या स्वत:ची मते वैगरे बनवण्याच्या फंदात पडत नाहीत. पूर्वीपेक्षा सध्या स्त्रियांच्या सामाजिक, कौटुंबिक स्थितीतील बदल सकारात्मक असला, तरी खेड्या शहरातील भरपूर मैत्रिणी आजही विचारांच्या या दरीत कोलमडून पडतायेत!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares