woman job banner

लग्नानंतरही शिक्षण, करिअर सुरु ठेवायचंय, तर जरुर वाचा!

पूर्ण दिवस संपतो घरकाम आणि मुलांच्या मागेपुढे करण्यात! यापैकी किती वेळ आपण स्वत:ला देतो? स्वकमाई हाती येत असली, की फार दडपण न घेता सहजतेने ती खर्चही करता येते. लहानसहान गोष्टींसाठी प्रत्येकवेळी नव-याकडे पैसे मागणं कित्येकींना बिलकूल पसंत नसतं. अशा मैत्रिणी मग लग्नानंतरही नोकरी किंवा घरगुतीउद्योग सुरु ठेवण्याचा निर्णय घेतात. यामागे आणखी निरनिराळी कारण असतात, एकट्या नव-याच्या पगारावर भार पडू नये, निदान स्वत:च्या गरजेच्या वस्तू विकत घेता याव्यात व सर्वांत महत्त्वाचं स्वाभिमानानं जगता यावं.

लग्नानंतर महिलांच्या करिअर आड येतं ते घर, संसार, सासरच्या मंडळींचा विरोध, नव-याचा नसलेला पाठींबा, मुलांचं करिअर घडविताना उडणारी तारांबळ! तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांमधून जाणवलं ह्याच समान अडचणीं कित्येक मैत्रिणींना प्रकर्षानं भेडसावत आहेत. म्हणूनच या विषयावर तुमच्याशी बोलायचं ठरवलं. कदाचित काही प्रश्न सुटतील, आपण प्रयत्न करणं का सोडा?

प्रथमत: घडायला हवा ‘संवाद’, आपला आपल्याच व्यक्तिंशी! माहेर, सासरची मंडळी, नवरा आणि अगदी मुल जाणती असतील तर त्यांच्याशीही, तुमच्या इच्छांविषयी तुम्ही बोलायला हवं. शांत, समंजसपणे मुद्देसूत आपलं म्हणणं मांडा. थांबलेलं करिअर, शिक्षण पुन्हा का सुरु करावसं वाटतंय ते सांगा. यामुळे तुम्हाला, तुमच्या घराला होणा-या आर्थिक, मानसिक फायद्यांविषयी बोला. तुम्ही आजही व्यस्त आहात घरकामात, पण स्वकामात व्यस्त राहण्याची मज्जा काही औरच असते. कारण, मनासारखं शिक्षण घेऊन, आवडत्या क्षेत्रात काम करुन, गाठीशी आलेले चार पैसेही लाख मोलाचे वाटतात.

तुमच्यावरील जबाबदारी थोडी थोडी वाटून घ्या. घरकामात, मुलांना द्यायच्या वेळात, नव-यालाही सामावून घ्या. ब-याच जणी बाहेरचे काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, या विचारात नव-याला कामं सांगताना चाचरतात आणि पुरुषसत्ताक परंपरेला सकस खतपाणी घालतात. अहो, तुम्ही बोलून तर पाहा. चिडून, रडून, मनाचा त्रागा करुन जितके प्रश्न सुटत नाहीत, तितके फक्त संवादातून सुटतात.

इतके होताच, दररोज दिवसभराची ‘टु डू लिस्ट’ करायला घ्या. घरकामापलिकडे मला आज स्वत:साठी काय करायचे आहे? ते यादीत लिहा. अभ्यास करायचा आहे, नोकरी शोधायची आगे, इंटरव्हूला जायचं आहे, की घरगुती उद्योग सुरु करण्याच्या तयारीला लागायच आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला अंगवळणी पाडावी लागेल. नवनव्या यांत्रिक साधनांशी मैत्री करणं. इंटरनेट तुम्ही वापरता, पण तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने त्याचा कसा वापर करुन घेता येईल ते बघायला हवं, शिकायला हवं. तरचं, तुमच्या क्षेत्रात जगभर घडणा-या घडामोडींची तुम्हाला माहिती मिळेल.

फक्त इतकंच पुरेसं नाही. स्वयंपाक करताना एखादा पदार्थ बनवण्यासाठी कुठले जिन्नस लागतील हे तुम्हाला ठाऊक असतं, त्याची रेसिपी माहिती असते, पण जेव्हा पदार्थ बनविण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही तो आत्मविश्वासाने बनवता. म्हणूनच तुमच्या हातची चव त्या पदार्थाला येते. तो चविष्ट बनतो असाच, इथेही आत्मविश्वास हवा. मी करु शकते आणि मी करणार. वयानं उशीर झालाही असेल, पण मन उत्साही आहे ना? स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी तुमचं मन सज्ज असेल, तर आजही तुम्हाला अशक्य काहीच नाही.

More Articles
Designed and Developed by SocioSquares