celeb banner

लग्न तारकांचं, जणू आमच्याच घरचं!

लग्नकार्य घरोघरी होतात, विविध सांस्कृतिक, पारंपारिक रीतींच्या भक्कम पायावर उभी असलेली विवाह पद्धती प्रांतागणिक, धर्मानुरुप बदलते. अगदी जातीजातींतही निराळे सोपस्कार रुढ झालेत. पण काहीही म्हणा लग्नकार्य असणा-या घरातील उत्साहाला तोड नसतो. बच्चेकंपनीपासून वृद्धांपर्यंत सगळेच काही ना काही कामाची जबाबदारी उचलतात व कार्य सुखरुप पार पाडण्याच्या तयारीला लागतात. या कार्यात नात्यागोत्यात नसलेले स्नेही देखील कामाचा उपसा अंगावर घेण्याची तयारी दाखवतात, हे अधिक वाखण्याजोगे. तेव्हा, विवाहसोहळा कुणाचाही असो त्याचे वेद ओळखीतील प्रत्येकाला लागलेले असतात. मग, व-हाडी सातासमुद्रापार का असेनात, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तीही मंडळी क्षणाक्षणाला त्या मंगलकार्याच्या तयारीत आपला अप्रत्यक्ष सहभाग नोंदवतात.

ओळखीच्यांपलिकडे अनोळखी व्यक्तिंच्याही घरात डोकावण्याची जादुई शक्ती याच तंत्रज्ञानानं आपल्याला बहाल केलीय. मानवी स्वभावाला वर्षानुवर्ष चिकटलेलं चांभार चौकश्यांच, कट्ट्यावरच्या चहाड्यांचं गळू आता मॉर्डन रुप घेत ‘गॉसिप’ रुपानं प्रत्येकाच्या सवयीत भिनलयं आणि या गॉसिप विश्वाला सर्वांत जास्त खुराक देणारं मनोरंजन क्षेत्र व त्यातील नटनट्यांची लग्नकार्य नेटक-यांना महिनोनमहिने पुरेल इतकं अस्सल खाद्य देतायत.

वर्षानुवर्ष अभिनेत्यांच्या वैयक्तिक जीवनावर बारीक नजर ठेवून असणा-या त्यांच्या फॉलोवर्सच्या उत्साहाला उधाण येतं, ते याच सेलिब्रेटीच्या लग्नकार्यासमयी. नाही म्हटलं तरी त्यांच्यासोबत इतर सामान्यही सर्च करुन करुन या सोहळ्याचे अपडेट्स घेत असतात. पत्रिका, लग्नाचं ठिकाण, तिथली सजावट, त्यांचा पेहराव, जेवणातल्या मेनूपासून, ते हनिमूनिला हे जोडपं कुठे जातील इथपर्यंत सगळ्याच विषयावर गंभीर चर्चा रंगतात. अगदी स्वत:च्या घरचं कार्य असल्यासारख्या हक्कानं! रॉयल वेडींग्स फारच खाजगीत पार पडत असल्यानं उत्सवमूर्तींचे लूक पाहण्यासाठी सोशल मिडिआवर नजर लावून बसलेली मंडळी तुमच्याही घरात असतील ना?

साधारण अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नानंतर विवाहबंधनात अडकणा-या सेलिब्रेटी जोडप्यांची रांगच लागलीय. विरुष्का, दिपवीर, प्रियंका-निक व हल्लीच संपन्न झालेला ईशा अंबानीचा दिमाखदार विवाह सोहळा! प्रत्येक रसम पार पडल्यावर त्यांचे व्हायरल होणारे फोटोज, इतके ट्रोल होतात की या लग्नांना जागतिक कार्यक्रमाचे रुप येतं. आपला आवडता नट/नटी लग्न करतेय, म्हणून काही खूष होतात तर काही खंत. कित्येकजणी या अभिनेत्रींच्या वेडींग लूकवरुन स्वत:च्या लग्नाचा पेहराव निवडतात. आता घरातली सगळ्याच मंडळींना ‘सेलिब्रेटी लग्नं’ या विषयाची गोडी असेल तर ठिक. नाहितर या उत्सुकतेला तुच्छ लेखणा-यांपैकी तुम्ही असाल, तर पुढे महिनाभर घरात, मित्रांमध्ये गप्पांचा तोच विषय, टिव्ही, एफ.एम.वर त्यांच्याच लग्नाच्या चर्चा, बातम्यांमध्ये तेच, सोशल मिडीआच्या सगळ्या साईट्सवर त्यांच्याच लग्नाचे फोटो व मेम्स टाळून टाळून तुम्ही हैराण व्हाल, यात शंकाच नाही.

‘घरोघरी मॉर्डन शेगडी’ असल्यानं सेलिब्रेटीच्या लग्नात दूरचा व्हराडी बनून वावरणारा एक तरी सदस्य तुमच्याही घरात असेल, तो सदस्य तुम्हीच आहात…?? तर हा लेख प्रपंच तुमच्याचमुळे साद्य झालाय आणि तुम्ही त्यातले नसाल तर मात्र तुमचं काही खरं नाही. कारण, रांग मोठी आहे, आणखी बरेच सेलिब्रेटी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत व तुम्हाला त्याविषयीची चर्चा पुन:पुन्हा ऐकावी लागणार आहे. फोटोज् मेम्स सतत नजरेसमोर येणारत; तर शुभमंगल ‘सावधान’!

More Articles
Designed and Developed by SocioSquares