faat (2)

गुबगुबीत मुलांसमोरील समस्या!

टेक्नोलॉजीच्या मदतीने ‘कमीतकमी वेळात जास्तीत जास्त काम’ करण्याचा फॉर्मुला प्रत्येकाने स्विकारला. या शॉर्टकटच्या जमान्यातून खाद्यसंस्कृती तरी कशी सुटेल? पाश्चात्यांच्या खाद्यपरंपरेला नावं ठेवता ठेवता, ती आपल्याच जीवनाचा अविभाज्य भाग कधी बनली हे समजलेही नाही. भारतीय बैठक जाऊन डायनिंग टेबल आले, पाच बोटांनी घास उचलून मुखापर्यंत नेण्याचे काम काटे चमचे करु लागले, शाळा, क्लासेस, ऑफीस यासा-यांनी जेवणाच्या वेळाही बदलल्या. ‘इझी टू मेक’ किंवा ‘रेडी टू इट’ या नव्या खाऊमंत्रांनी प्रत्येक पिढीला भुलवले हे नक्की!

या सगळ्यात सर्वांत जास्त नुकसान होतेय, ते लहान मुलांचे! अवेळी खाणे, नेमके खाण्याचा हट्ट धरणे, पचनसंस्थेच्या बिघाडामुळे होणारे पोटाचे विकार आणि वाढणारा शरीराचा लठ्ठपणा, घरात आनुवंशिक जाडेपणा नसला, तरी मुलं वाढत्या वयात गुबगुबीत व जाड होऊ लागतात. यावर उपाय म्हणून, लहानपणापासून खाण्याबाबतचे काह नियम कटाक्षाने पाळायला हवे, प्रथम मोठ्यांनी मग घरातील लहानगेही आपसूकच त्याचे अनुकरण करतील.

  • ‘ताटातील सगळं संपवायचं!’ असं दटावण्यापेक्षा नावडत्या पदार्थाची ‘थोडी चव तर घेऊन बघ!’ असं म्हटल तर?
  • टिव्ही, कॉम्प्यूटर, मोबाईलच्या बैठ्या संस्कृतीतून थोडं बाहेर पडून निदान जेवताना, या यंत्राना दूर ठेवू.
  • पिझ्झा, बर्गर, चायनिय किंवा कुठल्याही हॉटेलच्या वा-या जास्त झाल्या, की घरचं जेवण निरस वाटू लागतं. यासाठी महिन्यातून फक्त १ ते २ वेळाच बाहेरचं खाणं झालं, तर आरोग्यही निरोगी राहिल.
  • पालेभाज्या खाण्यास नकारघंटा देणा-या छोट्यांसाठी भाज्यांच्याच निराळ्या रेसिपी करुन पाहाता येतील.
  • तासनतास टिव्ही बघत, वेफर्स, चिवड्यासारखे तेलकट पदार्थ खाल्ले जातात, टिव्ही किंवा कॉम्प्यूटरसमोर अशी तंद्री लागल्यावर आपण किती खातोय याचेही भान रहात नाही, आणि साचत जाणा-या फॅटमुळे जाडेपणा येतो. यावर उपाय म्हणजे व्यायाम व खेळ.
  • भरपूर खेळून, मातील माखून, घामाघून होऊन मुले घरी परतली की समजावं, आज त्यांचा छान व्यायाम झालेला आहे. शरीराची नियमित हालचाल होणे आवश्यक आहे. यासाठी स्पोर्ट क्लब, किंवा व्यायाम शाळेसारखे पर्यायही लाभदायी ठरतात.

वाढत्या वयात खूप भूक लागते, अशावेळी मुलं लठ्ठ होतात, म्हणून त्याला ‘कमी जेव, कमी खा’ असे सांगण्यापेक्षा, भूक आहे तितके खाऊ द्यावे, मात्र ते पौष्टिक असेल यावर लक्ष द्यायला हवे आणि सोबत तितकाच भरपूर व्यायाम झाला पाहिजे किंवा मैदानी खेळ खेळले पाहिजेत. तरच, शरीराचे योग्य संतुलन साधता येईल व लहान वयात लठ्ठपणाची समस्या उद्भवणार नाही.

More Articles
Designed and Developed by SocioSquares