kids yoga

छोट्यांसाठी योग वर्ग!

मोठ्यांना आरोग्याचे संतुलन साधण्यासाठी योग साधना जितकी उपयुक्त ठरते. तितकीच लहान मुलांनाही त्यांच्या परिपूर्ण शारीरिक व मानसिक वाढीसाठी नियमित योगासने करणे महत्त्वाचे आहे. कारण, प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. घरकाम असो किंवा नोकरी, व्यवसायाचे ठिकाण, काम हलके करणारी अनेक यंत्रे जोडीला आल्याने शरीराची फार हालचाल होत नाही. हीच कामाची बैठी पद्धत मुलींनीही अंगिकारली आहे. तेही शरीराची हालचाल करण्यास कंटाळतात. अभ्यासाव्यतिरिक्तचा इतर वेळही बसल्याजागी घालवतात. अर्थात मोबाईलवर किंवा तत्सम इतर बैठे खेळ खेळण्यात! यामुळे, शरीर स्थूल बनत जाते. लहानपणी जाणवले नाही, तरी वाढत्या वयानूसार एक एक आजार आपले डोके वर काढू लागतात. त्यांना वेळीच आवार घालायचा, तर योगासनांशी मैत्री करायलाच हवी. ज्याचे भरपूर फायदे पुढे आयुष्यभर जाणवतील.

साधारण वयाच्या सातव्या किंवा आठव्या वर्षापासून मुलांना योगासने करण्याची सवय लावल्यास उत्तम! यामुळे, स्वभावानं चंचल किंवा भरपूर मस्ती करणा-या मुलामुलींना एकाजागी शांत बसण्याची, मन एकाग्र करण्याची सवय लागते. तर स्वभावानं, बुज-या, घाबरट मुलांच्या मनातील आत्मविश्वास वाढीस लागून, त्यांच्यात उत्साह व ऊर्जेची पेरण होते. मुख्यत्वे, प्रथम सूर्यनमस्कार हा संपूर्ण व्यायाम प्रकार त्यांच्याकडून नियमित करुन घ्यावा. मग हळुहळू पुढे प्राणायम, भुजंगासन, ताडासन अशा योग प्रकारांशी त्यांची ओळख करुन द्यावी.

बाळवयात योगा करण्याचे भरपूर फायदे आहेत. जसे की, रोगप्रतिकारशक्ती वाढते. योग्य प्रमाणात भूक लागून शरीराची वाढू व्यवस्थित सुरु राहते. लहान मुलं देखील अभ्यासाच्या तणावाखाली असतात. त्यांच्या मनावरील ताण, नैराश्य दूर होऊन मन अभ्यास करणे सोप्पे जाईल. तसेच, लहान मुलं स्वत:च्या चिडचिड्या स्वभावावर नियंत्रण मिळवू शकतात.

लहान मुलांना योगासनाची रुची लागावी म्हणून, सुरुवातीला फक्त १० ते १५ मिनिटे आसने करावीत. हळुहळू ही वेळ वाढवत न्यावी. पहिल्याच दिवशी त्यांच्याकडून भरपूर वेळ योगासने करुन घेतल्यास ते कंटाळतील किंवा थकून जातील आणि योगासनांचा नाद कायमचा सोडून देतील. असे होणार नाही, याची काळजी पालकांनीच घ्यायची आहे.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares