sexual harrasment banner

लैगिंक छळास असे द्या चोख प्रत्युत्तर!

ब-याचशा महिलांना कामाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक छळाच्या समस्येबाबत कायदेशीर उत्तर मिळू शकते हे ठाऊक असते, पण ते उत्तर कसे मिळवावे याबाबत मात्र कित्येकजणी अनभिन्ज्ञ असतात. कुठल्याही महिलेस कधी या विकृतीस सामोरे जावे लागू नये. पण, दुर्दैवाने तशी परिस्थिती उद्भवलीच, तर मात्र खचून न जाता तिला त्या परिस्थितीला धिटाईने तोंड देता यावे म्हणूनच आजचा हा लेख प्रपंच!

म्हटले जाते महिलांना सहाव्या इंद्रियाच्या मदतीने पुरुषामे गैर भावनेने केलेला स्पर्श किंवा पुरुषाचे कुविचारी बोलणे लगेच जाणवते. तेव्हाच महिलांनी त्यांनी सतर्क व्हावे. पण, प्रत्येक स्त्रिच्या स्वभावात इतके टोकाचे फरक असतात, तिथे सहाव्या इंद्रियाच्या कामकाजातही असू शकतो ना! म्हणूनच, काही जणी चतुराईनं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतात, तर काही “जाऊ द्या, त्यात काय इतकं”, “आपण का वाईट साईट मनात आणा?” म्हणत दुर्लक्ष करतात.

तुम्ही पहिल्या वर्गात मोडत असाल, तर पुरुषांची वागणूक वाचणे इतर मैत्रिणींनाही शिकवा आणि दुस-या वर्गात मोडत असलात तरी घाबरु नका, पुढील माहिती तुम्हाला अशा विकृतीला सामोरे जाण्याचे बळ नक्की देईल.

कुठल्या प्रकारची वर्तणूक लैंगिक अत्याचारात समाविष्ट होते, हे प्रथम जाणून घ्यायला हवे. व्यक्तिच्या शरीराला, कपड्यांना स्पर्श करणे, तसेच कुरवाळणे, हात फिरवणे, थोपटणे, द्विअर्थी बोलणे, लैंगिक विनोद, लैंगिर जीवनाविषयी, शरीराविषयी प्रश्न विचारणे, बाढतीची, नोकरीची कबुली देत शारीरिक जवळीक साधणे, अश्लील किंवा असभ्य हातवारे करणे. अशा वागण्याचा लैंगिक अत्याचारात समावेश होतो. त्यामुळे, कुणी ऑफिस कर्मचारी तुमच्याशी लगट करु पाहत असेल, तर मग तो वरिष्ट असो किंवा कनिष्ट. गप्प न बसता पुढील प्रक्रियेद्वारे त्याची तक्रार नोंदवू शकता.

तक्रार कुठे नोंदवाल?

‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिंक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३’ ह्या कायद्या अंतर्गत सरकारी, निमसरकारी, संघटित, एककेट्या काम करणा-या (उदा. घरकाम, कचरा वेचणा-या) मानधन घेणा-या किंवा स्वइच्छेने विना वेतन काम करणा-या सर्व महिलांना या कायद्याची मदत घेता येते. ह्या कायद्याअंतर्गत प्रत्येक कार्यालयात एक तक्रार निवारण समिती स्थापलेली असते. ही समिती स्थापन करणे बंधनकारक आहे, ती स्थापन न केल्यास त्या कार्यालयास ५० हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे, प्रथम तुमच्या ऑफिसमधील अशा समितीची तुम्हाला माहिती हवी. त्याचा कार्यभाग पाहणा-या व्यक्ती तुम्हाला माहित हव्यात. तेव्हाच तुम्ही तक्रार नोंदवण्यासाठी योग्य व्यक्तिशी संपर्क साधू शकाल. ज्यामुळे, लिखित स्वरुपात तक्रार नोंदवता येईल.

प्रथम सामोपचाराने तक्रार मिटवण्यासाठी प्रयत्न करणे समितीला बंधनकारक असते. मात्र, त्यासाठी पिडीतेची परवानगी नसल्यास पुढील कारवाई करणेही समितीवर बंधनकारक असते.

समाज पटलावर या ना त्या प्रकाराने भळभळणा-या स्त्री अत्याचाराच्या जखमांना आता फक्त फुंकर घालायची नाही, तर त्यावर रामबाण औषध करण्यासाठी सज्ज व्हायचयं प्रत्येकीनं! स्वत:ला स्वत:ची साथ देत निर्भयपणे जगण्यासाठी बेडरपणे कायद्यांची मदत घेणं गरचेजं आहेच.. हो ना?

तुम्हाला काय वाटतं? प्रत्येकीनं आपलं मत मांडायला हवं. चर्चा व्हायला हवी. म्हणूनच, मनमोकळपणे लिहा तुमचं म्हणणं, खालील कमेन्टबॉक्समध्ये!

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares