corona 1

  लॉकडाऊन चांगलाही!

परदेशात झपाट्याने पसरणा-या कोरोनाचा शिरकाव भारतातही झाला आणि कधीही न अनुभवलेल्या लॉकडाऊन नामक नियमाला सगळ्यांनाच सामोरं जावं लागलं. या रोगापासून स्वतःचा बचाव करायचा, तर घरात असं स्वतःला कोंडून घेण्याला पर्याय नाही. कॉलेजला जाणा-या, नोकरीकरणाऱ्या मंडळींना इतके दिवस चार भिंतींत रहाण्याची बिलकूलच सवय नाही. मग या परिस्थितीचं नैराश्य येणं साहजिक आहे. पण आपण त्याचं गांभीर्य लक्षात घेऊ आणि लॉकडाऊनच्या अंती कुठल्या सकारात्मक गोष्टी हाती लागतील याचा विचार करूया. काय वाटतं?

पहिली महत्तम बाब, ती म्हणजे घरच्या मंडळींना नव्याने ओळखण्याची ही नामी संधी आहे. नाहीतर शाळेनंतर अशी उन्हाळी सुट्टी कोणाच्या नशिबी येते. धूळ खात पडलेले बोर्ड गेम्स पुन्हा खेळले जातायेत. पत्त्यांचे डाव रंगतायेत. मुख्य म्हणजे सर्व वयोगट या बैठ्या खेळात सहभागी होतोय. कित्येक वर्षात जमला नाही, तो लंच एकत्र बसून करतोय. नाहीतर, कुणी ऑफिसमध्ये, कुणी कॉलेजमध्ये तर बाकीचे घरी जेवतायेत अशी परिस्थिती होती. मोबाईल तरी किती पाहणार? कधीनव्हे ते, त्याचा ही कंटाळा आला, म्हणून आपसूकच मोबाईक बाजूला राहिलाय. सदानकदा मोबाईलच्या स्क्रीनवर झुकलेली मान आजुबाजूचा परिसर न्याहाळतेय. तितकाच मानेलाही व्यायाम. स्क्रीनवर धावणाऱ्या अंगठ्यालाही विश्रांती मिळून घरोघरी गप्पा, गाण्यांच्या मैफिली रंगतायेत. याचा परिणाम, संपत चाललेल्या घरातल्या संवादाला नवसंजीवनी मिळाली. माणसं पुन्हा बोलू लागलीत. एकमेकांच्या बदललेल्या आवडीनिवडी कळू लागल्यात. जुने छंद जोपासण्याची धडपड सुरू झाली. वर्क फ्रॉम होम असले तरी, प्रवासाचा वेळ वाचतोय. जास्तीची झोप मिळतेय.

घरात बसणं आलं म्हणजे, घरातील गाड्यांनाही सुट्टी. पेट्रोलचा जाळ कमी झालाय. प्रदूषणाची पातळी कमी झालीये. हवा स्वच्छ होतेय. माणसं किमान कमी अंतरावर चालत जातायेत. कित्येक वर्षानंतर पक्ष्यांचे आवाज कानी पडतायेत. कुणी नाही तरी, मुकी जनावर आणि झाडं त्यांच्या मनासारखं जगून घेतायेत. कारण, माणसांनीही स्वच्छतेच्या सवयींशी नव्याने दोस्ती केली आहे. हात धुवा हे काय सांगायला हवं, पण कोरोनाच्या भितीपोटी स्वतःपासून घरापर्यंत सगळंच कसं लखलखीत स्वच्छ झालंय. एकवीस दिवस एखादी गोष्ट सलग केल्यास त्या गोष्टीची सवय लागते असं म्हणतात. तेव्हा कॉरोंटाईनच्या दिवसात लागलेल्या चांगल्या सवयी प्रत्येकाच्या जगण्याचा भाग होतील असं वाटतंय. गेल्या महिनाभरात माणसं व पक्षी, प्राणी सगळ्यांचीच वयोमर्यादा कमीतकमी पाच वर्षांनी तरी वाढली असेल यात शंका नाही. सिस्टीम रीबूट केल्यासारखी वाटतेय. एकदम फ्रेश!

इतकं सगळं छान चाल्लेलं असताना, महिला मंडळींचा कामाचा व्याप मात्र वाढलाय. स्वयंपाकाची आवड असणाऱ्या खूष आहेत, पण जेवण बनवणं हा छंद नसणाऱ्या सख्यांची भारीच कोंडी झालीये. खवय्यांच्या फर्माईशी काही संपत नाहीयेत. मैत्रिणींनो, सतत किचनमध्ये राहून तुम्ही कंटाळला असाल ना? मग, किचनच्या कामाचीही वाटणी करा. शेवटी तुमच्या शब्दाबाहेर आहे का कुणी? कामं वाटून दिली असतील तर उत्तमच. शेवटी, वाट्याला आलेली ही कॉरोंटाईनची वेळ प्रत्येकाला आपापल्या मर्जीने घालवता यायला हवी. तरच, मन प्रसन्न राहील आणि मन ठणठणीत असेल तर, काय बिशाद कुठला आजार आपल्या आसपास फिरकेल? म्हणून आता लगेच, प्रसन्न मनाने घराबाहेर पडू नका. पण, कोरोनाचं दडपणही घेऊ नका, सरकारचे नियम पाळा, घरीच थांबा, काळजी घ्या. कारण, आपण राहिलो घरी, तरच कोरोना जाईल माघारी!

More Articles
Designed and Developed by SocioSquares