faral (1)

वजनवाढीचा ताण, मग कसा खाऊ फराळ?

वर्षातून एकदा येणा-या दिवाळीच्या लज्जतदार फराळावर ताव मारण्याचा मोह आवरणं केवळ अशक्य? इतक कठीण काम करण्याच्या फंदात पडाच कशाला. दिवाळीचे दहा बारा दिवस फराळाचा साग्रसंगीत आस्वाद घ्यावा, अगदी न लाजता. पण एकदा खायला सुरुवात केल्यावर, मात्र तोंडावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते, असे होत असेल तर पुढील सवयींशी मैत्री कराच! म्हणजे, वजन वाढण्याच्या भितीने स्वत:तील खवय्यावर अन्याय व्हायला नको.

  • खिळलेली नजर

अन्नाचे घास पोटात जात असतात, मात्र नजर मोबाईल किंवा टिव्हीवर खिळलेली असते. जेवताना ताटात न पाहाण्याची सवय जडल्याने, आपण किती खाल्लयं किंवा आपलं पोट आता भरत आलंय याची जाणीव होत नाही. “बस्स, आता पुरे झाले” असे पोटाचे म्हणणे ऐकू येईस्तोवर अती खाणे झालेले असते. त्याला रोखण्यासाठी प्रथम कुठेही मन गुंतवून न ठेवता जेवणावर लक्ष केंद्रित करण्याची सवय स्वत:ला लावायला हवी.

  • जेवण थोडीच पळून जाणारये?

जेवणाची वेळ सोडून, सगळं वेळापत्रक अगदी काटेकोरपणे पाळतो. नाश्ता व दोन वेळेचे जेवण योग्य वेळी पोटात जाणे जेवढं गरजेचं आहे. तितकचं महत्त्वाचं आहे शांतचित्ताने जेवणे. एक घास ३२ वेळा चावून खाण्याचे फायदे शाळेत शिकलोत, ते मोठं झाल्यावर विसरुन कसं चालेलं. पटपट जेवल्याने पोट भरल्याचा अंदाज येत नाही आणि पुन्हा मन भरेपर्यंत खाणे होते.

  • पदार्थाच्या नोंदी

मोजून खाऊ नये, अस म्हणतात. पण अती खाण्याची सवय मोडायची असेल; तर आपण कधी काय खाल्ले याची नोदं ठेवायला हवी. मुख्यत्वे तो पदार्थ खाल्ल्यानंतर कसं वाटलं, तेही त्या त्या पदार्थापुढे लिहायला हवं. कारण, बरेचदा पोट भरलेलं असतं; मात्र मन भरलेलं नसतं. अशावेळी एखादा पदार्थ खाऊन झाल्यावर तो आपण उगाच खाल्ला असं वाटू लागतं. असे सतत घडतेय की नाही, हे ठेवलेल्या नोंदींवरुन समजेल. ज्यामुळे आपण ती सवय मोडण्याचा प्रयत्न करु.

  • चिंतेला जेवणाच्या ताटात स्थान नको

धकाधकीचे जीवन आणि कामाच्या व्याप डोक्यात ठेवूनच बरेचदा जेवण पोटात जाते. आवडता पदार्थ असला तरी त्याचा आनंद घेत खाणे होतच नाही. अशा चिंतातूर अवस्थेत पोटाशी संवाद न घडल्याने समोर असेल तितके अन्नपदार्थ संपवत बसतो. ताटात पदार्थ टाकणे बरे दिसत नाही म्हणून, शिस्तप्रिय आपण पोट पुरेपर भरेपर्यंत खातो.

घेतानाच ताटात कमी घ्यावं किंवा नको असल्यास लाजत मुरडत न बसता सरळ नाही म्हणावं. म्हणजे अन्नाची नासाडीही होणार नाही.

सगळे पदार्थ खावेत, पण प्रमाणात! वरील सवयी दिवाळी पलिकडे वर्षभर तुम्हाला अतिरिक्त खाण्यापासून दूर ठेवतील. त्यामुळे, यापुढे जेवणाबाबत फक्त आणि फक्त पोटाचेच ऐकायचे. काय? पटतंय ना?

More Articles
Designed and Developed by SocioSquares