Zumba (2)

वजन कमी करणारा ‘झुंबा’!

फिटनेसला महत्त्व देणा-या स्त्रियांची संख्या दिवसागणिक वाढतेय. घर किंवा नोकरी सांभाळत वेळातवेळ काढून जागृतीच्या कित्येक मैत्रिणी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देऊ लागल्यात. अगदी रोजच्यारोज जीम, सायकलिंग, योगा किंवा स्विमिंग सारखे फिटनेस फंडे आजमावणे जमले नाही, तरी किमान सुट्टीच्या दिवशी जरा अर्धा पाऊण तास चालणं, घरच्याघरीच सूर्यनमस्कार किंवा थोड्या स्ट्रेचिंग एक्सरसाईज करण्यावर तिचा भर असतो. कॉलेज गोईंग तरुणी फिगरमध्ये राहून स्लिम ऍण्ड ट्रिम दिसण्यासाठी फार झटतात. डाएट करतात, एक्सरसाईज करतात. पण, गृहिणी किंवा नोकरी करणा-या महिलांना आरोग्याकडे लक्ष द्यायला तितकासा वेळ मिळत नाही, तरी त्यासुद्धा जमेल तसे फिगरमध्ये रहाण्याचा किंवा बिघडलेली फिगर पुन्हा कमविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. एकूण काय, सर्व वयोगटाच्या मैत्रिणी कंबर कसून फॅट बर्न करण्याच्या कामाला लागल्यात.

या उत्साहाला अजिबात वेळखाऊ नसणा-या झुंबाची जोड देता येईल. यात मस्त संगीताच्या ठेक्यावर तालबद्ध स्टेप्स करायच्या असतात, ज्या फार कठीण नसतात. संगीताचे बिट्स ऐकू येताच, ज्यांचे पाय आपसूक थिरकू लागतात, त्यांना तर झुंबा हा व्यायाम प्रकार हमखास आवडेल. ऍरोबिक्स व्यायामप्रकारात मोडणारा झुंबा करण्यावर वयाचे कुठलेही बंधन नाही. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत वयोगटानुरुप झुंबाचे प्रशिक्षण दिले जाते.

त्याचे काही प्रकारही आहेत, ज्याप्रमाणे

  1. टोनिंग झुंबा – टोनिंग स्टिक्सचा वापर करुन झुंबाच्या स्टेप्स केल्या जातात.
  2. अॅक्वा झुंबा – स्विमिंग पूलमध्ये झुंबाच्या स्टेप्स करण्याच्या प्रकारास अॅक्वा झुंबा असे म्हणतात.
  3. गोल्ड झुंबा – चाळीशीवरील व्यक्तिंसाठी गोल्ड झुंबा हा प्रकार विकसित केला आहे.
  4. झुंबाटोमिक- हा झुंबा प्रकार चार ते बारा वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी आहे.

हे झुंबाचे काही मुख्य प्रकार आहेत.

झुंबामुळे वजन कमी होते, तसेच शरीर लवचिक होण्यास मदत होते. हाडे मजबूत होतात, ह्दयाचे आरोग्य सुधारुन शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. हात, पात, पोट, कंबर शरीराच्या सर्व स्नायूंना एकत्रितरित्या व्यायाम देणा-या झुंबाला एक संपूर्ण व्यायाम प्रकार म्हणता येईल.

मात्र, अती स्थूल व्यक्तिंनी झुंबा करु नये. कारण, डान्स स्टेप्स करताना शरीराचा भार पायाच्या सांध्यांवर पडतो. ज्यामुळे, गुडघेदुखीचा त्रास उद्भवतो. म्हणून, इतर व्यायाम प्रकारांच्या मदतीने प्रथम थोडे वजन कमी करुन मग झुंबा करणे उत्तम. कंबरदुखीचा त्रास असणा-यांनी देखील झुंबा करणे टाळावे. हे अपवाद सोडल्यास डान्स व व्यायाम असा दुहेरी आनंद देणारा झुंबा सध्या सर्व वयोगटाच्या पसंतीचा ठरतोय. कारण, हा बिलकूल वेळखाऊ नाही. आठवड्यातून फक्त तीन दिवस झुंबा करणे अपेक्षित आहे. अट एकच अधिकृत कार्यशाळेतूनच झुंबाचा सराव करावा. वर्क आऊटसाठी झुंबासारखा धम्माल पर्याय शोधून सापडायचा नाही बरं!

More Articles
Designed and Developed by SocioSquares