bond (1)

वयात येणा-या मुलीशी आईचा ‘संवाद’!

मुलामुलींना लहानवयातच शाळांमधून लैगिंक शिक्षणाचे धडे दिले जातात. वाढत्यावयानुरुप होणा-या शारीरिक बदलांविषयी त्यांना अशी पूर्वकल्पना दिल्याने अर्धवट ज्ञानाने तयार होणा-या गैरसमजुती वेळीच दूर होतात. आकर्षणाची भावना नैसर्गिक असली, तरी योग्य वयात प्रश्नांची उकल झाल्याने काही प्रमाणात विकृतीला आळा बसू शकतो.

मुलगा किंवा मुलगी शारीरिक बदलांना सामोरे जात असले, तरी मासिक पाळीमुळे मुलींना हे बदल अधिक प्रकर्षाने जाणवतात. लहानवयात मुलींशी अशा अवघड विषयावर बोलण्याचे काम शाळेने हलके केले, याविचारात पालकांनी निश्चिंत न रहाता, उलट अधिक जबाबदारीने वागायला हवे. कारण, या नव्या विषयावर तिला पडलेले प्रश्न थेट शिक्षकांना विचारणे लाजीरवाणे वाटते, मनातील शंका मग कुणाकडे बालोवी या संभ्रमात मूल भरकटू नये. एकलकोंडे होऊ नये म्हणून, आई मुलीत सुरुवातीपासून मैत्रीपुर्ण संवाद असणे आवश्यक आहे. ज्याचा परिणाम मासिक पाळी, लैंगिकता या विषयावरही दोघींमध्ये दडपण विरहित गप्पा घडू शकतात. अशा विषयांवर बोलण्यासाठी आईनेही मानसिकरित्या तयार असावे. तिच्या वेड्यावाकड्या प्रश्नांना, आडपडदा न ठेवता सरळसोट उत्तरे द्यावीत. जेणेकरुन तिच्यामनात कुठलाही संभ्रम रहाणार नाही व आई मुलीचे नाते अधिक जवळ येईल.

पूर्वी साधारण वयाच्या ९ – १० वर्षापर्यंत मुलींना ‘मोठं होणं’, ‘वयात येणं’ याविषयी फारस माहीत नसायचं. मुलांइतकीच दंगा मस्ती करताना उठण्या बसण्यात थोडी शिस्त पाळली, की झालं! पण सध्या, विकृतींना बळी पडणा-या कोवळ्या वयाच्या मुलींचा वाढता आकडा पाहाता, लहानग्या मुलींना स्वसंरक्षणार्थ मानसिकदृष्ट्या लवकर मोठे व्हावे लागतेय. यासाठी, ‘चांगला स्पर्श, वाईट स्पर्श’ यातील फरक त्यांना लहान वयातच नीट समजावून सांगा. त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांनी कुणाविषयी तक्रार केल्यास, लगेच डावलून न देता सावधरित्या त्यांचे म्हणणे पडताळून पाहा.

हल्लीची मुलं इंटरनेटचा सराईतपणे वापर करतात. प्रत्येक छोटा मोठा प्रश्न गुगल करतात. पण, त्यांच्यापर्यंत पोहोचणारी माहिती अचूक आहे किंवा नाही हे तपासून पाहाणे, पालक म्हणून पुन्हा तुम्हालाच करायचे आहे. कारण, इंटरनेटने दिलेल्या जगभरच्या माहितीला, मनभर साधलेल्या संवादाची सर नक्कीच येणार नाही.

किशोर वयातील शारीरिक – मानसिक बदलांमुळे होणा-या चिडचिड्या, हट्टी, हेखेखोर स्वभावावर संवादातून उपाय शोधाता येईल. मुलीच्या मनात सुरु असणा-या दु:ख, राग, प्रेमासारख्या भावभावनांचा खेळ समजून घेण्यासाठी हातधुवून मागे न लागता, वेळ पाहून विश्वासपूर्ण संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तुमच्यामधील समजूतदार व संयमी आईचा इथे कस लागेल हे नक्की!

More Articles
Designed and Developed by SocioSquares