World Earth Day Banner

वसुंधरेचे संवर्धन – बदलत्या काळाची गरज

जागतिक वसुंधरा दिन नुकताच होऊन गेला. दरवर्षी या वसुंधरा दिनानिमित्त ठिकठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले पाहतो. त्यात अनेक जण येऊन वृक्षारोपण करतात. फोटो, सेल्फी काढतात, असेच वृक्षसंवर्धन व पृथ्वीचे संरक्षण करू अशा भाकड शपथा घेतल्या जातात आणि एकदा का हा दिवस पार पडला की मग लावलेल्या त्या झाडांना पाणी घालणे तर सोडाच त्यांच्याकडे कोणी ढुंकुनही पाहत नाही. मग परत एक वर्षानंतर बरोबर वसुंधरा दिनाच्या दिवशीच सगळे एकत्र जमतात आणि हे चक्र असंच चालू राहतं.

या पृथ्वीवर फक्त मनुष्यप्राणी सोडला तर इतर सगळे जीव, निसर्ग त्यांना घालून दिलेल्या नियमात काम करत आहेत. उदाहरणार्थ:- पृथ्वी बरोबर 24 तासांत स्वतःभोवती परिवलन आणि 365 दिवसांत सूर्याभोवती परिभ्रमण करते आणि ते सुद्धा एका ठराविक कक्षेत राहूनच, एक दिवस कमी नाही किंवा जास्तही नाही. विशिष्ट प्रकारच्या सर्व वृक्षांना चैत्र महिन्यातच नवीन पालवी फुटते. आपल्या ऋतुचक्राचेच बघा, फेब्रूवारी ते मे महिन्यात उन्हाळा, मग पावसाळा आणि त्यानंतर हिवाळा. ऋतुचक्र सुद्धा त्याला आखून दिलेल्या नियमानुसारच काम करत असते. माणूस हा पृथ्वीवरचा असा एकमेव प्राणी आहे जो आपल्या अनिर्बंध वागण्याने सृष्टीचे सगळे नियम धाब्यावर बसवतो.

अनियंत्रित वृक्षतोड, ज्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. नैसर्गिक स्रोतांचा वाटेल तसा वापर करणे. इंधनाचा तसेच पेट्रोल, डिझेलचा अतिप्रमाणात होणारा वापर ज्यामुळे हवेचे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होत आहे. औद्योगिकीकरणातून मोठमोठ्या कारखान्यांतून वाहणारे सांडपाणी जे नद्यांना जाऊन मिळते आणि ते जलप्रदूषणास कारणीभूत ठरते. तसेच प्लास्टिक व थर्माकोल यांसारख्या अविघटनशील पदार्थांच्या बेसुमार वापरामुळे तुंबलेल्या नद्यांचे नाल्यांमध्ये परिवर्तन होत आहे. वायुप्रदुषणामुळे क्लोरो फ्लोरो कार्बन (CFC) तसेच सल्फर डाइऑक्साइड (SO2) यांसारख्या ग्रीन हाऊस गॅसेस हवेतील प्रमाण वाढत आहे. वातावरणात वरच्या थराला ओझोन वायूचे एक आवरण असते. ओझोन हा वायू सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करतो. पण या ग्रीन हाऊस गॅसेस मुळे तसेच वाढत्या प्रदुषणामुळे ओझोनच्या थराला भगदाड पडले आहे. ज्यामुळे पाश्चिमात्य देशांत लोकांना होणा-या त्वचेच्या कँसरचे प्रमाण हे वाढले आहे. तसेच कॅनडा तसेच अमेरिका या देशांच्या काही भागात अधूनमधून आम्लवर्षा सुद्धा होते.

याच ग्रीन हाऊस गॅसेस मुळे पृथ्वीचे तापमान हळूहळू अधिकच वाढत चालले आहे जी ग्लोबल वार्मिंगची नांदी आहे. वाढत्या तापमानामुळे आर्टिक्ट महासागर तसेच अंटार्टिका खंडावरील बर्फ हा मोठ्या प्रमाणात वितळू लागला आहे. वितळणा-या बर्फाचे प्रमाण दरवर्षागणिक इतके वाढत आहे की ज्यामुळे समुद्राची पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. हा फक्त संकेत नव्हे, तर ही सुरुवात आहे ग्लोबल वार्मिंगची. या ग्लोबल वार्मिंग मुळे जलचक्रही बिघड़ले आहे. दरवर्षीच्या उन्हाळ्यात अधिकाधिक वाढच होत आहे. जून महिना संपत आला तरी पाऊस पड़त नाही पण एकदा पडायला लागला की अतिवृष्टीच होते. हिवाळ्यात सुद्धा कधी गर्मी तर कधी अतिथंडी. परत जरा कुठे उन्हाळा सुरु होत नाही तर लगेच जमिनीखालील पाण्याचा साठा (बोअरवेल) आटू लागतात. माणसानेच वागण्याचे ताळतंत्र सोडल्याने निसर्गही त्याचा समतोल हळूहळू सोडत आहे. नुकतेच दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन हे शून्य पाण्याचे शहर म्हणून घोषित झाले आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण आत्तापासूनच सतर्क राहणे गरजेचे आहे.

या सगळ्याला उपाय असा की, जंगल आणि वृक्षतोड़ीचे प्रमाण कमी झाले पाहिजे. वाहनांऐवजी सायकलचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर झाला पाहिजे. म्हणजे हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. अपारंपारिक उर्जास्रोत म्हणजे सूर्य, वारा आणि समुद्राच्या लाटा यांपासून चालणारी उपकरणें जसे की सोलर वॉटर हिटर, पवनचक्की यांचा अधिकाधिक वापर, जास्तीत जास्त वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करणे. जेणेकरून जमिनीची धूप होणार नाही. पावसाळ्यात वाहणारे पाणी वाहू न देता ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून अडवून धरणे. तसेच प्लास्टिकचा शक्य तितका वापर टाळणे. यामुळे आपण ग्लोबल वार्मिंगचे वाढते प्रमाण कमी करू शकतो. कारण हे फक्त ग्लोबल वार्मिंग नसून निसर्गाने आपल्याला दिलेली ग्लोबल वार्निंग आहे. यातून आपल्या वसुंधरेचे संरक्षण व संवर्धन करणे हीच या बदलत्या काळाची गरज आहे.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares