BREACK (1)

वाचा, ब्रेकफास्ट न करण्याचे धोके!

संपूर्ण दिवस सतत कामांची रेलचेल असते. न थांबता कार्यरत रहायचे असेल, तर शरीरात पुरेशी ऊर्जा हवी. नाहितर येणारी मरगळ, थकवा यामुळे कामात लक्ष लागत नाही. मुख्यत्वे नोकरी करणा-या स्त्रियांनी तर आवर्जून ब्रेकफास्ट करुनच घराबाहेर पडायला हवे. सकाळी लवकर उठून सगळ्यांचे डबे तयार करायचे, मुलांना शाळेसाठी तयार करायचं, स्वत:चं आवारायचं, वर ऑफिस पर्यंतचा प्रवास तिथे पुन्हा दिवसभर काम करुन, घरी पोहोचल्यावरही उसंत नाही. रात्रीच्या जेवणाची कामगिरी पार पाडायची आहेच. हुश्श्श्….! पुरुषांच्या तुलनेत बाईच्या पदरी आलेली कामांची यादी नक्कीच मोठी आहे, नाही का?

तिने तर आहाराच्या वेळा अधिक कटाक्षाने पाळायला हव्यात. ब्रेकफास्टविना तिची सकाळ सरता कामा नये. राजासारखा ब्रेकफास्ट, गरिबासारखं दुपारचं जेवण त्याहून कमी रात्रीचं जेवण घ्यावं, असं म्हणतात ते सौ टक्के खरे आहे. फक्त ते प्रत्येकानं अमलात आणायला हवं. कारण, ७ ते ८ तासाच्या झोपेनंतर शरीराला मुबलक उर्जेची गरज असते. वेळीच इंधन मिळाल्यास ते दिवसभर सुरळीत कार्य करु शकतं. तुम्ही म्हणाल, ब्रेकफास्ट न करता, थेट पोटभर दुपारचं जेवणच जेवतो, तर ही सवय वेळीच बदलायला हवी.

सकाळी काहीही न खाता, थेट दुपारी जेवल्याने अतिरिक्त जेवले जाते. जास्तीचं खाल्ल्याने साहजिकच लठ्ठपणा वाढतो. मधुमेहाचा धोका संभवतो. त्यातून ह्र्दयासंबंधीच्या तक्रारी डोके वर काढतात. मेटॅबोलिझमची प्रक्रिया देखील बिघडते. मुळात, वेळेवर न खाल्ल्याने शरीराला गरजेच्यावेळी आवश्यक तितकी ऊर्जा मिळत नाही. यामुळे, हळूहळू शरीर कमकुवत होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढीस लागते. कमी झालेल्या ह्याच रोगप्रतिकारशक्तीमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

नाश्ता न करण्याचा एक सर्वसाधारण परिणाम तुम्हीही अनुभवला असेल, तो म्हणजे दिवसाच्या सुरुवातीलाच जाणवणारी डोकेदुखी. साखरेची पातळी कमी झाल्याने ही समस्या त्रास देते आणि दिवसाची सुरुवातच दुखण्याने झाल्यावर पुढचा संपूर्ण दिवस हसतमुख रहाणे कसे शक्या होईल?  मग, चिडचिड, डोळ्यांवर येणारा ताण, शरीराला येणारे जडत्व, थकवा, अशक्तपणा, निरुत्साही मन, या ना अशा अनेक जाणिवांनी आपण ग्रासले जातो. यातून, घरकामाचा कंटाळा, तर नोकरीचा वीट येण्यापर्यंतच्या भावना उफाळून येतात. यासा-या नकारात्मकतेला आपल्या आयुष्यात स्थान द्यायचे नसेल. तर, वेळीच दिवसाची प्रसन्न सुरुवात करण्यावर भर द्या. अगदी भरपेट बेदम नाश्ता करा. मैत्रिणींनो, मुख्यत्वे तुम्ही नव-याला आणि मुलांना आग्रहानं खाऊ घालताना स्वत:ही मनापासून खा, टाळाटाळ न करता. पटतंय ना? मग, उद्याच्या ब्रेकफास्टला काहितरी मस्त, चविष्ट, हेल्दी डिश बनवाच!

More Articles
Designed and Developed by SocioSquares