STORY

आई ‘गोष्ट’ सांग ना…!

प्रांतानुरुप बदलणारी संस्कृती, भाषा कुठलीही असो, प्रत्येकीच्या मूळाशी कथांचा ठेवा असतोच. अनंत पिढ्यांना अंगाखांद्यावर खेळवणा-या या कथांचा प्रपंच समाजाशी आपली नाळ आजही जोडून आहे. त्यात लोककथा, दंतकथा, पौराणिक कथा, पंचतंत्र, इसापनिती अशा एक ना अनेक कथांचा समुच्चय आपल्याला पाहायला मिळतो.

यांत्रिकतेचा वरदहस्त आपल्यावर नसताना, घराघरातून या कथांचे गुंजन नियमित व्हायचे. गप्पा, वाचन, थोडेफार बैठे खेळ हीच त्यावेळी विरंगुळ्याची साधनं होती. त्यामुळे, कथांचा खजिना एका पिढीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे सहज पोहोचला. छान रंगवून गोष्टी सांगणारे आजी आजोबाच हल्ली विरळा झालेत, त्यात आई बाबा दोघंही ऑफिसवेळांत व्यस्त आहेत आणि मुलांसमोर मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झालेत, त्यामुळे त्यांचा अभ्यासाव्यतिरिक्तचा वेळ सहज जातो. या नव्या जीवनपद्धतीत मुलांना गोष्टी ऐकण्याची, वाचनाची आवड लावणे, ही कल्पनाच अशक्य वाटते. कारण याची सुरुवात त्यांच्या नकळत्या वयात झालेली नसते.

मुल तान्हं असतानाच त्याला गोष्टी सांगाव्यात, त्यांना त्या वाचून दाखवाव्यात ही सवय पालकांनी आपल्या पाल्यास जाणीवपूर्वक लावायला हवी. तान्ह्या मुलांना अक्षर ज्ञान नसतं, पण बडबड गीत, इंग्रजी पोयम्स किंवा चित्रपटाच्या गाण्यांवरही किती लहान वयात आवडीनं ताल धरतात ते, किंवा एक घास काऊचा चिऊचा करताना, सांगितलेल्या अनेक अघळ पघळ गोष्टी किती कान देऊन ऐकतात आणि पोटभर जेवतात सुद्धा! बस याच सवयीला आणखी थोडं खतपाणी घालायचंय. त्यांना छान छान गोष्टी ऐकवण्याचा जणू सपाटाच लावायचा. त्या गोष्टी विविध हावभाव करत, आवाज बदलत खुलवून सांगितल्या, की ते केव्हाही गोष्ट ऐकण्यास तयार असतात, यात शंकाच नाही.

खास लहानमुलांसाठीच्या चित्रकथांची परंपरा फार जुनी आहे, हल्ली या चित्रकथा आणखी आकर्षकरित्या चितारल्या जातायेत. त्यामुळे, अशा चित्रांद्वारे उलगडत जाणा-या गोष्टी त्यांना जवळ बसवून सांगाव्यात, पुस्तकातील चित्रे दाखवावीत. एका जागी बराचवेळ शांत बसण्याचं तंत्र त्यांच्यात इथूनच रुजेल. ज्याचा फायदा त्यांना पुढे शालेय वर्षांत होईल. चंचल मनोवृत्तीच्या बाळांसाठी खरतर हा व्यायाम आहे, मन एकाग्र करण्यासाठी त्यांना जास्तीतजास्त वेळ गुंतवून ठेवतील असे बैठे खेळ दिले जातात. कथा देखील नेमकं हेच करतात. गोष्ट पुढेपुढे सरकत जाते, तसा गोष्टीचा मागचा भाग विसरुन चालत नाही. तोही लक्षात ठेवावा लागतो, यातूनच मन लावून ऐकण्याची, सांगितलेलं डोक्यात पक्क बसवण्याची सवय लागते.

पालक आणि पाल्याने जास्तीतजास्त वेळ एकत्र घालवणं मुलांच्या निकोप वाढीसाठी व जागृत पालकत्वाच्या दृष्टीने महत्त्वाच आहेच. हे इस्पित बळबळं साध्य करुन घेता येत नाही. छान छान रंजक गोष्टी मुलांसोबत भरपूर मौलिक वेळ घालवण्याची संधी देतात.

भरपूर गोष्टी ऐकल्यावर बालमनात कल्पनाशक्ती देखील हळूहळू आकार घेते. कथेत पुढे काय होणार याचा ते स्वत:च अंदाज बांधू लागतात. कदाचित दोन चार कथेचा संदर्भ घेत, ते स्वत:ही कथा बांधण्याचा प्रयत्न करतील. कारण, कुठलीही गोष्ट ऐकताना मनात त्याचं पुसटसं चित्र उभ राहत असतं. परी, राजवाडा, जादूगार, चेटकीण अशा एक ना अनेक व्यक्तिरेखा कल्पनेतून उभ्या राहतात. त्या वर्णनानूसार बदलतात किंवा निराळा आकार घेतात. भाषेचंही तसंच आहे, तिचाही संचय होत जातो. लहान वयातच भरपूर शब्दसाठा जमा झाल्याने भाषाज्ञान वृद्धिंगत होतं. पुढे शाळेत निबंध लिहिताना, प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहिताना, वक्तृत्त्व सादर करताना शब्दांची कमतरता भासत नाही, हीच शब्दसंपदा कामी येते व एकदा का गोष्टींच्या माध्यमातून बाळवयात वाचनाची सवय लागली की वयानुरुप त्याचं सकारात्मक अशा वाचनरुपी व्यसनात रुपांतर होणार यात शंकाच नाही.

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares