sUMMER (1)

तब्येत सांभाळ, आता उकडतयं फार!

उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, दिवसेंदिवस उकाडा चांगलाचा जाणवू लागलाय. साधारण ३० सेल्सियसवरुन हळूहळू चढणारा उन्हाचा पारा, आता आरंभीच ४२ सेल्सियस पर्यंत पोहोचलाय. थंडीनंतर शरीराला उन्हाची आवश्यकता असली, तरी सतत कडक ऊन्हात वावरल्यास त्वचेचा कर्करोग उद्भवू शकतो. सकाळच्या कोवळ्या उन्हानंतर झपाट्याने वाढणा-या उकाड्यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी खालील उपाय तुमची नक्की मदत करतील.
१. तुमच्या त्वचेसाठी योग्य असणा-या सनस्क्रीनची निवड करावी व हात, पाय तसेच चेह-यावर हलक्या हाताने लावावे. घरातून बाहेर पडण्याच्या तीस मिनिटे आधी सनस्क्रीन लावल्यास ते त्वेचेमध्ये नीट शोषले जाईल व अधिक प्रभावी ठरेल.

२. गॉगल, टोपी, स्कार्फ तसेच सन कोटचा वापर करावा किंवा अधिकाधिक पूर्ण बाहीचे कपडे घालण्यावर भर द्यावा.

३. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, कारण यादरम्यान सूर्याची किरणे अधिक प्रखर असतात.

४. लहान मुलांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी, शक्यतो त्यांना सावलीत खेळण्यास सांगावे, तसेच पूर्ण बाहीचे कपडे व टोपीचा वापर करणे त्यांच्यासाठी फार आवश्यक आहे.

५. घाम पुसण्यासाठी सुती हातरुमाल किंवा नॅपकीनचा वापर करावा, त्वचेवर घाम जास्त काळ राहू देऊ नये यामुळे त्वचेला खाज येणे, घामोळे, पुरळ अशा समस्या उद्भवू शकतात.

६. बाह्य शरीराची काळजी घेण्यासोबत, शरीर आतूनही तंदुरुस्त असायला हवे. ज्यावर आपले मानसिक संतुलन अधिक अवलंबून असते. यासाठी पहिला उपाय म्हणजे, भरपूर पाणी प्यावे.

७. उन्हाळी फळे खावीत, उदा. कलिंगड, टरबूज, द्राक्ष, संत्री, काकडी. तसेच, पाण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पावडर मिसळून प्यावी.
८. नैसर्गिक आंबट पदार्थ खावेत किंवा त्यांची सरबते प्यावीत उदा. चिंच, लिंबू, आमसूल, कैरी इत्यादी

९. उन्हाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करावी. अंघोळीच्या पाण्यामध्ये चंदन, कमळाच्या फुलांचे चुर्ण किंवा गुलाबाची पाकळी मिसळावी.

१०. अतिउष्णतेमुळे डोके दुखत असेल तर, जेवणात नियमित कांदा खावा. उन्हाळ्यात लसूण खाणे शक्यतो टाळावे.

वरील उपाय त्रासदायक वाटणा-या उन्हाळ्यावर मात करण्याची ताकद देतील. ज्यामुळे, मानसिक व शारीरिकरित्या निरोगी राहून अशक्तपणा, डोकेदुखी, भोवळ अशा समस्यांना दूर ठेवता येईल.

More Articles
Designed and Developed by SocioSquares