Bhasha (1)

विदेशी भाषा – महिलांसाठी करिअर संधी!

मातृभाषेवर जिवापाड प्रेम करताना इतर भाषांना दुजाभाव देण्याचे दिवस सरले असून, स्वभाषेचा अभिमान बाळगताना थेट परदेशी भाषेच्या अंतरंगात डोकावण्याचे वेड भाषाप्रेमींना खुणावतेय. मुख्यत्वे, जागतिकिकरणानंतर विविध देशांच्या परस्परांतील व्यवहरांना चालना मिळाली. हल्ली अर्थाजनापलिकडे बरीच मंडळी भंटकतीच्या इच्छेने जगभ्रमंतीवर निघतात. तर काही संशोधनाच्या दृष्टीने तेथील रुढी, परंपरां, कला, जीवनशैली, खाद्यसंस्कृतीचा साग्रसंगीत अभ्यास करतात.

उद्दीष्ट्य कुठलीही असो, जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी संवाद थांबत नाही. विचारांची देवाणघेवाण अविरत सुरु असते. येणारा भाषेचा अडथळाही दूर करण्याचा चंग मानवाने बांधलाय. टेक्नोलॉजी क्षणार्धात कित्येक भाषांचा अनुवाद एका क्लिकवर देत असली तरी, भाषेचा खोलवर मागोवा घ्यायचा तर ती नीट अभ्यासायला हवी. नवनव्या भाषा शिकण्याची आवड असणा-यांची हटके करिअर क्षेत्रे आतुरतेने वाट पाहातायत.

मातृभाषेपलिकडे इंग्रजी भाषाही अभ्यासक्रमातून आपसूकच शिकली जाते. त्याजोडीला परदेशी भाषा अवगत असल्यास खुल्या होणा-या अगणिक पर्यायांविषयी जाणून घेऊया.

कोर्सअंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम, डिप्लोमा किंवा पदवीच्या माध्यमातून परदेशी भाषा शिकता येईल.  फ्रेंच, जर्मन, रशियन, चायनिज, जॅपनिज यापैकी एखादी भाषा अस्खलित बोलता, वाचता व लिहीता येत असेल, तर प्राध्यापक, अनुवादक, टुरिस्ट गाईड, समुपदेशक, प्रकाशक म्हणून काम परभार स्विकारता येईल. तसेच, परदेशी बॅंक, एअरलाईन्स विविध संस्थांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते.

जागतिक बाजारपेठेत जॅपनिज टेक्नोलॉजीला मोठी मागणी असल्याने, विविध क्षेत्रांत व देशांत जपानी भाषा तन्ज्ञांची आवश्यकता असते.

परदेशी भाषेच्या जोरावर जशा देशाबाहेर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तशाच, आपल्या देशात, राज्यात, घरापासून दूर न जाताही नोकरी करणं शक्य आहे. उदाहरणार्थ, हल्ली शालेय अभ्यासक्रमात परेदशी भाषांचा समावेश केला जातो. तेव्हा शिक्षकाची भूमिका स्विकारता येईल. महाविद्यालयांत तर भाषानुरुप विभागही असतात, तिथेही संधी आहेत. तसेच, घरच्याघरी ट्युशन्सही घेऊ शकता. ज्यातून, तुम्हाला अवगत असलेली परदेशी भाषा अनेकांना शिकवू शकाल.

मैत्रिणींनो, तुम्हालाही परदेशी भाषा अभ्यासण्याची आवड असेल. तर लक्षात घ्या, आजही त्यात करिअर घडू शकतं. विवाहीत असाल किंवा वयाची चाळीणी ओलांडली असेल, तरी बिनधास्तपणे वरीलपैकी वयाचं बंधन नसणा-या क्षेत्रांचा विचार करता येईल. कारण, व्यक्ती कायम विद्यार्थीदशेत असतो, फक्त त्याने स्वत:चं विद्यार्थी असणं मनोमन स्विकारायला हवं आणि जर तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये असाल तर वेळीच परदेशी भाषांशी निगडीत वेगवेगळे कोर्स, वयाचे बंधन असणा-या शासकीय नोक-या व त्यासाठीच्या पात्रपरिक्षा, स्पर्धापरिक्षांसाठी तयारी करता येईल.

चांगल्या पगाराची नोकरी किंवा व्यवसाय करुन अर्थिक उत्पन्न मिळवणं, हे अंतिम ध्येय असतं. पण  करत असलेलं काम भाषेसारख्या कलात्मक बाबीशी निगडीत असेल, तर कामाअंती फक्त पैसे हाती येणार नाहीत, तर आनंद व समाधानही पुरेपूर मिळेल.

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares