Inspiration > शकुंतला देवी – चालते बोलते कॅल्क्युलेटर
Neerja

शकुंतला देवी – चालते बोलते कॅल्क्युलेटर

तान्ह्याचं आगमन झालं, की त्या बाळाच्या प्रत्येक लहान सहान हालचालींचं केवढं कौतुक वाटतं घरातल्यांना! त्याच्या सुरात रडण्यापासून, संगीतावर ठेका धरणं, त्यानं ओढलेल्या रेघोट्यांतही आकर्षक चित्र दिसू लागतं, खेळण्यात चतूर, बडबडगीते तोंडपाठ, अशा एक ना अनेक निरीक्षणांवरुन, ही प्रेमाची माणसं, बाळ मोठेपणी काय बनणार याचे ठोसं अंदाज बांधूनही मोकळे होतात. ही कोडकौतुकं वाटत असली, तरी खरंच काही लहान मुलांमध्ये उमजत गुणकौशल्ये असतात. म्हणूनच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.

क्वचित ही कौशल्ये दैवी देणगी वाटावी इतक्या प्रखरतेने जाणवतात. त्याचेच एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, मानवी संगणक म्हणून ओळखल्या जाणा-या शकुंतला देवी. १९२९ साली त्यांचा कानडी कुटुंबात जन्म झाला. घर ब्राम्हणी पण वडील सर्कशीत उंच झुल्यांवर कसरती, जोडीला जादुचे प्रयोग करत. नकळत्या वयापासूनच शकुंतला यांची आकड्यांशी निराळीच जवळीक होती. वयाच्या अवघ्या तिस-या वर्षी पत्त्यांवरील आकडे लक्षात ठेवून त्यांचा अचूक क्रम त्यांनी वडीलांना लावून दाखवलेला. आपल्या मुलीची अफाट स्मरणशक्ती, अविश्वसनीय सांख्यिकी ज्ञान वडीलांच्या नजरेतून कसे सुटेल? जणू शाळेत जाण्यापूर्वीच तिला तिचा आवडता विषय गवसलेला. त्यांच्या गणिती कौशल्याची वाहवा होण्यास सुरुवात झालेलीच. पण, घरची परिस्थिती बेताची असल्यानं काही वर्षांतच शकुंतला यांचे शालेय शिक्षण सुटले. मग त्या वडीलांसोबत जादुच्या प्रयोगातं आपली आकडेमोडीतील चतुराई दाखवीत प्रेक्षकांना आचंबित करु लागल्या.

मोठमोठ्या संख्यांचे गुणाकार, भागाकार कुठलीही प्रक्रिया त्यांना विचारा, अवघ्या सेकंदात त्या उत्तर देत. हळुहळू या सांख्यिकी प्रतिभेच्या जोरावर त्यांना प्रसिद्धी मिळू लागली. गणिती कार्यक्रमांद्वारे शिक्षक-विद्यार्थ्यांशी त्या मार्गदर्शनपर संवाद साधू लागल्या. गणिती विषयावर अनेक उपयुक्त पुस्तके त्यांनी लिहीली. मुलांना गणित विषयाची गोडी लागावी, या विषयात अधिकाधिक संशोधन व्हावे, यासाठी त्यांनी झोकून देऊन कार्य केले.

एकदा लंडन येथे इम्पिरिअल कॉलेजमधील कार्यक्रमात त्यांना दोन १३ आकडी संख्या गुणाकारासाठी दिल्या गेल्या. शकुंतला यांनी केवळ २८ सेकंदात याचे उत्तर दिले व वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. आणखी एका कार्यक्रमात त्यांना तब्बल २०१ अंकी भलीमोठी संख्या देऊन त्याचे २३वे मूळ काढण्यास सांगितले, त्याचे उत्तर शकुंतला यांनी अवघ्या ५० सेकंदात सांगितले. याचीही गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. संगणकापेक्षा शकुंतला यांच्या आकडेमोडीचा वेग अधिक भरत असे. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनीही शुकंतलांच्या बुद्धिमत्तेस गौरवले आहे.

बालपणी शालेय़ शिक्षण अर्धवट राहिले, घरची परिस्थिती बिकट होती, मात्र प्रतिकूल परिस्थितीतही समाजपयोगी कार्य करण्याच्या निश्चयातून स्वत:जवळील ज्ञान पुढच्या पिढ्यांसाठी पुस्तकरुपाने शुकंतला यांनी जतन केले. त्यांच्याजवळील गणिती ज्ञान दैवी होते, तसे इतके बुद्धिमान रत्न भारताला लाभले, हाही जणू दैवी योगच होता.

 

Designed and Developed by SocioSquares