SLEEP WELL DEAR (1)

शांत झोपेसाठी इतकं कराच!

मोबाईलची बॅटरी ठराविक वेळेनंतर चार्जिंगला लावावी लागते, तसेच माणसाचेही आहे. दिवसभराचा मानसिक व शारीरिक थकवा दूर करण्यासाठी गाढ झोप गरजेची आहे. जितकी छान झोप, तितकेच पुढील दिवसाचे हसतमुखाने स्वागत! बरेचदा अशी झोप घेण्याची इच्छा असूनही, झोप मात्र येत नाही, कधीतरी अपरात्री डोळा लागतो, नशीबाने निद्रादेवी लवकर प्रसन्न झालीच, तर मध्यरात्री अचानक जाग येते. मग मनावरची मरगळ दिवसभराच्या कामांमध्ये उतरते. झोपेच्या अशा विचित्र वागण्याला शिस्त लावायची, तर पुढील टिप्स उपयोगी ठरतील.

1. झोपण्याआधी ग्लासभर दूध प्यावे. दूधामध्ये एक चमचा मध मिसळावे किंवा दूधासोबत बदाम अथवा केळ्याचे सेवन करणेही फायदेशीर ठरते.

2. कोमट तेल हलक्या हाताने केसांच्या मूळांशी लावावे, तसेच रात्री हाता पायांना कोमट पाण्याने मसाज करावा.

3. रात्रीच्या जेवणात तेलकट, तिखट पदार्थ खाणे टाळावे. जेवणानंतर लगेच झोपू नये, शतपावली करावी. घरासमोरील अंगणे नाहिशी झाल्याने, घरातल्या घरात थोडावेळ चालावे. रात्री झोपताना सैल कपड्यांचा वापर करावा, शक्यतो सुती व मऊसर कपडे घालावेत.

4. ब-याचदा झोप येईपर्यंत मोबाईल किंवा लॅपटॉपवर वेळ घालविण्याचा पर्याय निवडला जातो. काळोखात स्क्रिनचा थेट प्रकाश डोळ्यांसाठी त्रासदायक असतो.

5. थोडावेळ पुरेशा प्रकाशात पुस्तक वाचन करावे. वाचनाने मन एकाग्र होते. शरीरातील थकवा डोळ्यांनाही जाणवतो व लवकर झोप येण्यास मदत होते.

6. झोप येत नसतानाही, डोळे मिटून पडून रहाणे केव्हाही उत्तम. शवासन हा योग प्रकारही सहाय्यक ठरतो. झोपलेल्या स्थितीत दिर्घ श्वासोश्वास करावा, हात, पाय, खांदे सैल सोडावेत. यामुळे स्नायूंमधील ताण कमी होऊन, शांत झोप लागेल.

निर्दानाशासारख्या समस्यांवर वेळीच डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा. सध्याच्या धावपळीच्या जीवनक्रमात शरीराला पुरेशी विश्रांती न मिळाल्याने अनेक आजार बळावतात. मनातील अस्वस्थता, ऑफिसमधील कामे, घरातील जबाबदा-या या सा-या विचारांचा कल्लोळ जरा बाजूला सारुन किमान ८ तासांची झोप निरोगी आरोग्यासाठी गरजेची आहे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares