Dvdv (1)

शिळं-पाकं खाण्याचे भयंकर दुष्परिणाम….

शिजवलेले अन्न पदार्थ साठवून ठेवण्यासाठी वापरल्या जाणा-या फ्रिजमध्ये हमखास कालची आमटी, परवाची भाजी असते, कधी भात असतो. मोजून वापून जेवण शिजवणं प्रत्येकाला जमत नाही किंवा बरंही वाटतं नाही. अचानक कुणी पै पाहुणं आल्यास ते उपाशी राहून नये, या उद्देशाने थोडं जास्तीच बनवलं जातं आणि मग उरतं. दुस-या दिवशी असे पदार्थ घरातील महिला मंडळींच्या पानात दिसतात. फुकट जाऊ नये म्हणून उरलेलं शिळ पाकं खाणा-या मैत्रिणींनो, स्वत:च्या तब्येतीकडे तुम्ही दुर्लक्ष करताय हे प्रथम ध्यानात घ्या बरं!

वाढत्या वयानुसार आहारही सकस हवा. नाहितर, हाडे ठिसूळ होणे, सांधे दुखी, पोटाचे विकार असे वयानुरुप जाणवू लागलेले आजार बळावतात. मुख्यत्वे स्त्रियांमध्ये कॅल्शियम, आर्यन, हिमोग्लोबिनची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळते. अशावेळी, शिळं अन्न खाऊन तात्पुरतं पोट भरत असलं, तरी नियमितपणे शरीराला पौष्टिकतेचा पुरवठा होत नाही. अन्न शाकाहारी असो किंवा मांसाहारी ते जितकं शिळं तितकं त्यातील पोषक घटक कमी कमी होत जातात. ज्यामुळे, अन्नविषबाधेसारखा विकार जडण्याची दाट शक्यता असते.

विविध जिन्नसांच्या एकत्रीकरणातून चविष्ट पदार्थ तयार करताना त्यातील जीवनसत्त्वे काही प्रमणात कमी झालेली असतात. पुन्हा ती साठवून ठेवल्याने ती अधिकच कमी होतात आणि असे पदार्थ खाण्याचा शरीराला काही फायदा नसतोच, उलट घातकच ठरते.

पदार्थाला पांबट वास येणे, ते चिकट होणे, त्याला तार सुटणे, त्यांची चव बदलणे, असे काही संकेत देत, ते पदार्थच आपल्याला, “आम्ही खराब झालोय, आम्हाला खाऊ नका!”, असं सांगत असतात. आपण कधी त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा पदार्थ खराब झाल्याचे आपल्या लक्षातच येत नाही. आपण ते खातो, अगदी दोन तीन दिवस पुरवून पुरवून खातो आणि अन्न फुकट घालवलं नाही म्हणत समाधानानं ढेकर देतो.

असे होऊ नये, म्हणून उरलेलं जेवण वेळीच आवारातील मुक्या जनावराला द्यावं आणि सोहळ्या समारंभातलं मोठ्या प्रमाणात जेवण उरलं असेल, तर त्याच दिवशी गरजूंना देणे योग्य ठरेल. होय ना? पटतंय ना तुम्हालाही? कळवा तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेन्टबॉक्समध्ये!

 

More Articles
Designed and Developed by SocioSquares