SHILA BHAT (1)

शिळ्या भाताच्या चवदार रेसिपीज!

सर्वसाधारण खाणारी तोंडे किती, याचा अंदाज घेऊनच तितका भात शिजवला जातो. मात्र, कधी अंदाज चुकतो किंवा कुणी भात जेवले नाही, की भात उरतो. अशा आदल्या दिवशीचा उरलेला भात कसा संपवावा हा मोठा प्रश्नच! कारण असा शिळा भात ऑफिसला जाणा-यांना डब्यात देता येत नाही, तसेच दुपारपर्यंत तो आणखी शिळा होऊन पांबण्याचीही शक्यता असते.  पण, या सर्व समस्यांवर चविष्ट उपाय ठरणा-या खालील रेसिपीज् पाहा तरी एकदा करुन!!

शिळ्या भाताचे थालीपीठ –

साहित्य – १ वाटी शिळा भात, १ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेले टॉमेटो, तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, चणा डाळीचे पीठ (तिनही समप्रमाणात एकणू २ वाट्या), लाल तिखट, मीठ, धणे-जिरे पावडर, कोथिंबीर, आंबट ताक, तेल

पाककृती –

 • वरील सर्व साहित्य भातामध्ये एकत्र करुन घ्यावे. त्यामध्ये २ ते ३ चमचे आंबट ताक मिसळावे.
 • हे मिश्रण जाडसर होईल इतके पाणी त्यामध्ये मिसळावे.
 • त्यानंतर तव्यावर थोडे तेल गरम करुन, त्यावर थालीपीठ थापावे व वरुन झाकण देऊन थोड्यावेळाने थालीपीठ उलटावे.
 • थालीपीठ दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्यावेत व तसेच गरमागरम चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करावेत.

 

शिळ्या भाताचे कटलेट्स –

साहित्य – १ कप शिळा भात, १ टि.धणे पावडर, १ टि. जिरे पावडर, १ टि.गरम मसाला, १/४ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, मीठ, हिंग, ७ ते ८ लसूण पाकळ्या, १ इंच आले, कोथिंबीर बारीक चिरुन, १/२ वाटी बेसन, २ टे.स्पू.कॉर्न फ्लॉवर, १ वाटी रवा, तेल

पाककृती –

 • भातामध्ये धणे-जिरे पावडर, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ, हिंग, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर मिक्स करावी.
 • त्यामध्ये बेसन मिसळावा व मिश्रण नीट मळून घ्यावे. आता, त्यात कॉर्न फ्लॉवर मिसळून पुन्हा मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे.
 • भाताचे लहान गोळे करुन घ्यावेत. त्यावर थोडा दाब देऊन, त्यास चपट आकार द्यावा.
 • कढईत तेल तापत ठेवावे. आता, कटलेट्स दोन्ही बाजूंनी रव्यात घोळवून, तापलेल्या तेलात सोडावेत.
 • साधारण तपकिरी रंगाचे होईस्तोवर खरपूस तळून घ्यावेत व गरमगरम सॉस सोबत सर्व्ह करावेत.

 

दही भात –

साहित्य – २ वाटी शिळा भात, २ चमचे तेल, १/२ चमचा मोहरी व जिरे, ३ ते ४ कडीपत्त्याची पाने, २ हिरव्या मिरच्या, १/२ चमचा साखर, कोथिंबीर बारीक चिरुन, १ वाटी घट्ट दही, १/४ वाटी दूध, मीठ.

पाककृती –

 • भात, दही, दूध व मीठ एकत्र करुन घ्यावे. फोडणीसाठी लहान कढईत तेल तापवून त्यामध्ये मोहरी व जिरे घालावे. नंतर त्यात कडीपत्ता, मिरच्या(चिरुन) घालाव्यात.
 • लगेचच फोडणी भाताच्या मिश्रणामध्ये घालून सगळं मिश्रण नीट एकत्र करुन घ्यावे. वरुन कोथिंबीर घालावी.
 • कैरी किंवा लिंबाच्या लोणच्यासोबत तयार दही भात सर्व्ह करावा.

उरलेल्या शिळ्या भाताचा दुस-या दिवशी फोडणीचा भात, हे ठरलेले समीकरण थोडे बाजूला सारुन, वरील रेसिपीज् नक्की करुन बघा! यामुळे, शिळा भात फुकट जाणार नाहीच, उलट या चविष्ट रेसिपीजमुळे आणखी चवीने फस्त होईल!

 

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares