sweet

सणांचे क्षण करा आणखी गोड!

सणवार म्हणजे सुगरणींच्या हक्काचे दिवस. घरात पाहूण्यांची रेलचेल, पूजेची तयारी सुरु असताना नैवेद्याकडेही लक्ष द्यावे लागते. आधीच पंचपक्वानांचा बेत त्यात गोडाधोडाचे करणे आलेच, अशावेळी झटपट होणा-या पदार्थांचा शोध सुरु होतो. काहीतरी नवे व थोड्याच वेळात तयार होईल अशी रेसिपी हवी असते. मैत्रिणींनो तुमचे हे काम थोडे हलके व्हावे यासाठी काही गोड पदार्थांच्या रेसिपीज् तुमच्यासाठी,

तळलेले मोदक

साहित्य: १/२ कप खिरापत, १/२ कप मैदा, १/२ कप बारीक रवा, २ टेस्पून तेल, चिमूटभर मिठ, तळण्यासाठी तेल/ तूप, १ टीस्पून दूध

कृती:

मैदा व रवा एकत्र करून घ्यावा. दोन चमचे तेल गरम करून मोहन घालावे. किंचित मीठ घालावे. थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. साधारण अर्धा तास झाकून ठेवावे. अर्ध्या तासाने पीठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्यावे व मळलेल्या पिठाचे साधारण दिड इंचाचे समान गोळे करून घ्यावे. तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावे. प्रत्येक गोळ्याची पुरी लाटून घ्यावी. पुरी एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्‍या हानाने मुखर्‍या पाडाव्यात. मध्यभागी जो खळगा झाला असेल त्यात एक चमचा सारण भरावे. सर्व मुखर्‍या एकत्र करून कळी बनवावी आणि एक थेंब दुधाचं बोट घेवून कळी नीट बंद करावी. सर्व मोदक मंद आचेवर तळून घ्यावेत व तयार झालेले चविष्ट मोदक सर्व्ह करावेत.

संत्र्याची खीर

साहित्य: १ लिटर दूध, ४ टेस्पून साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त), २ छोटी संत्री १ टीस्पून वेलचीपूड, १/२ टीस्पून केशर , सजावटीसाठी बदाव-पिस्त्याचे काप

कृती:

प्रथम दूध एका भांड्यात तापवायला ठेवावे. दुधाला एक उकळी आली की गॅस मंद आचेवर ठेवून दूध आटू द्यावे. मधे मधे थोडे ढवळत राहावे. दूध जरा घट्ट झाले की त्यात वेलचीपूड, केशर व साखर घालावी व ढवळावे. साखर विरघळली असता थोडे बदाम-पिस्त्याचे काप घालावे व गॅस बंद करावा. संत्रे सोलून त्यामधील गर घ्यावा. दूध पूर्ण गार झाले, की त्यामध्ये संत्र्याचा गर घालावा व खीर फ्रिजमध्ये ३-४ तास थंड होण्यासाठी ठेवावी. आदल्या रात्री खीर करुन ठेवली असता संत्र्याचा स्वाद आणखीन खीरीत उतरतो ज्यामुळे ती अधिक चविष्ट लागते.
(टीप- गरम दूधात संत्र्याचा गर घातल्यास दूध नासते.)

मुगाची खीर

साहित्य: १ वाटी कोरडी, हलकी भाजलेली मुगाची डाळ, १ वाटी पाणी, २ वाट्या दूध, १ वाटी चिरलेला गूळ, २ टीस्पून साखर, २ टेस्पून ओला नारळ, १ टीस्पून वेलचीपूड, १/४ टीस्पून जायफळपूड, सुकामेवा सजावटीसाठी

कृती:

मुगाची डाळ, दूध व पाणी एकत्र करुन शिजवून घ्यावे. शिजलेल्या डाळीच्या मिश्रणात गूळ, ओला नारळ, साखर घालून मिश्रण एकजीव करावे. हे मिश्रण शिजायला ठेवावे व थोडे घट्ट होईपर्यंत ढवळत रहावे. मुगाची खीर तयार झाली असता वेलचीपूड किंवा सुकामेवा घालून खीर सर्व्ह करावी.

दलियाची खीर

साहित्य: १ वाटी तयार दलिया, १ लिटर दूध, १ वाटी गूळ, १ वाटी ओलं खोबरं, सजावटीसाठी काजू

कृती:

दलिया तीन-चार तास भिजवून ठेवा. नंतर त्यात एक वाटी गूळ आणि वाटीभर ओलं खोबरं घालून कुकरला चांगलं मऊ शिजवून घ्यावे. मिश्रण घट्ट होऊ नये यासाठी शिजवतावना पुरेसे पाणी घालावे. हे मिश्रण जरासे कोमट असताना त्यामध्ये जायफळ पूड घालून एकजीव करुन घ्यावे. मिश्रण थंड झाल्यावर त्यात दूध घालावे. त्यामध्ये काजूचे तुकडे घालावे व तयार दलियाची खीर सर्व्ह करावी.

नक्की करुन पाहा आणि आपल्या मैत्रिणींनाही सांगा, या झटपट होणा-या गोड पदार्थांच्या साहाय्याने सणवारांचा सोहळा करा आणखी गोड!!

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares