MOnthly (1)

सणासुदीला छळते मासिक पाळीची चिंता!

वयानुरुप शरीर ज्या महत्त्वाच्या बदलांना सामोरं जातं, त्यात स्त्रीचा शालेय वयात सुरु झालेल्या मासिक पाळीपासून पुढे कित्येक वर्षे पिच्छा सुटत नाही. स्त्री शरीराची रचनाच अशी आहे, की मासिक पाळीचे येणे आई होण्यासाठी व महिलांच्या एकूणच शारीरिक स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक असते. त्यामुळे, ती गरजेचीच आहे. निसर्ग नियमानुसार जशी मासिक पाळी चुकली नाही, तशा पिढीजात चालत आलेल्या चालीरिती, रुढी, परंपरा यांचीही नियमावली बाईला चुकली नाही. पाळीच्या दिवसांत त्या स्त्रीने देवपूजा करायची नाही, देवघरात स्वयंपाकघरात जायचे नाही. शुभकार्यात सहभागी व्हायचे नाही, चारचौघांत मिसळायचे नाही, घरातील खाण्यापिण्याच्या वस्तूंना स्पर्श करायचा नाही. फार पुढेपुढे न करता, एकाजागी शांत बसावं. पूर्वीच्या काळी तर बाईचं अंधरुणही वेगळं असायचं. जेवणाची भांडी देखील वेगळी.

बापरे! इतक्या प्रखर नियमांच्या कचाट्यात वावरताना, त्या बाईला एखादा भयंकर पाच दिवसीय आजार आपल्याला झालाय असं वाटणंच बाकी असतं, हल्ली किमान हे संकट टाळण्याचा उपाय तरी आपल्या जवळ आहे. लग्न, पूजाआर्चेत बिनदिक्कत सहभागी व्हायचं असेल, तर गोळ्या घ्यायच्या आणि लांबवायची मासिक पाळीची तारीख. हा पर्याय पुन:पुन्हा आजमावल्याने शरीराला त्याचे दुष्पपरिणाम भोगावे लागतात, पण काय करणार? रुढ नियमांशी प्रतारणा करणं कुणाला जमलंय? तरुण मुली या प्रथांचा विरोध करण्याचा प्रयत्न करतायत. कारण, तसं केल नाही, तर सोहळ्यात सहभागी होता येत नाही. मग नातेवाईक चौकशी करतात, उत्तरादाखल खोट कारण द्यावं लागतं किंवा “तिला नाही यायचं” सांगून आणखी चार लोकांत चर्चा घडते.

एक साधी नैसर्गिक प्रक्रिया मासिक पाळी. ती नाही आली तरी मनाला घोर लागतो आणि ऐनवेळी येऊन सणसुदीचा खोळंबा केला तरी मन कुरकुरते.  कराव काय हिचं? सांगितलंच नाही, तर कुणाला? म्हणजे खोटं बोलून शुभकार्यात सहभागी व्हायचं..!! असं कधी आलंय तुमच्या मनात? आलं तरी, आपल्या मनावर नियमांचा पगडा इतका जड झालाय की थेट देवाशी खोटेपणानं वागणं मनाला रुचत नाही. निमुटपणे नियम पाळण्याशिवाय आपल्यासमोरही पर्याय उरत नाही. हो ना?

सख्यांनो, तुम्हालाही असे अनुभव नक्कीच आले असतील. सणसुदीच्या दिवसांत नेमकी मासिक पाळी येते आणि आनंदावर जणू विरजण पडतं. अशावेळी, या प्रथांविरुद्ध तुमच मन बंड करुन उठतं का? नक्की लिहा खालील comment box मध्ये तुमचं मत!

More Articles
Designed and Developed by SocioSquares