vat-purnima

सण वटपौर्णिमेचा, आनंद पतीप्रेमाचा आणि निसर्गाच्या जागृतीचा!

प्रत्येक सणाला स्त्रियांची भूमिका नेहमीच अधोरेखित होत असते. सगळ्याच सणाला आपला भक्तिभाव, आपुलकीची भावना नेहमी अव्वल ठरते कारण त्यातल्या प्रत्येक गोष्टी आपण खुप निर्मळ मनाने करतो.

जेष्ठ पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. पावसाळ्याची चाहूल लागली की येणारा हा पहिलाच सण असतो. आपल्या जोडीदाराच्या उदंड आयुष्यासाठी आणि सात जन्माची सोबत मिळावी म्हणून केल्या जाणाऱ्या या पुजेबद्दल सर्व विवाहित स्त्रियांच्या मनात एक हळवं स्थान आहे. यादिवशी स्त्रीया वडाच्या झाडाभोवती धागा बांधून सात फेरे मारतात. झाडाची पूजा करून आपल्या पतीसाठी प्रार्थना करतात. सांस्कृतिक महत्त्वाने सर्वचजणी आपल्या परंपरेची जपणुक करतात. वडाच्या झाडाखाली सवित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते अशी देखील आख्यायिका आहे त्यामुळे या पुजेसाठी वडाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे तसेच त्याची नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणे देखील आहेत. ती देखील आपण जाणून घेतली पाहिजेत.

वडाचे झाड खुप विस्तारत जाते आणि बरेच वर्ष टिकून राहते त्याप्रमाणे आपल्या पतीला देखील आयुष्य मिळावं ही यामागची निरागस भावना आहे. तसेच इतर वृक्ष फक्त दिवसाच ऑक्सीजन म्हणजे प्राणवायू देतात;पण वडाचे झाड मात्र २४ तास ऑक्सीजनचा पुरवठा करते. पावसाळ्याच्या सुरुवातीला या झाडाच्या सालींमधून ‘थॉरिअस’ नावाचा द्रव पाझरतो ज्यामुळे स्त्रियांच्या गर्भाशयासबंधी विकार बरे होऊ शकतात.

एकंदरीतच स्त्रियांच्या भावभावनांच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने वटपौर्णिमेचे स्थान अगदीच महत्त्वाचे आहे. मैत्रिणींनो! वटपौर्णिमेचे सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व तर आपण माहित करून घेतले पण या वटपौर्णिमेला जागृत पाऊल उचलुया. झाडाची पुजा म्हणजेच खऱ्या अर्थाने निसर्गाचीच पूजा आपण करतो त्यामुळे पतीच्या दीर्घायुषासाठी भावनिक प्रार्थना करताना निसर्गाच्या संरक्षणासाठी देखील हात जोडूया,झाडं लावून खऱ्या अर्थाने निसर्गाच्या पूजेसाठी सक्रिय पुढाकार घेऊया!

More Articles
Designed and Developed by SocioSquares