saree banner

सध्याचे ट्रेंडी साडी प्रकार!

जिन्स टॉपची फॅशन दिसायला सुंदर व त्यात वावरणे कितीही सोयीस्कर असले, तरी भारतीय संस्कृतीत साडीसारख्या पारंपारिक पेहरावाचे स्थान कायम अढळ राहील. प्रांतानुरुप साडी नेसण्याच्या जे वेगवेगळे प्रकार रुढ आहेत, त्याचंही छान फ्युजन घडवून आणलयं आजच्या तरुणाईनं!  काष्टापदर सावरणारी आजी ते मि-या शिवून घेत रेडीमेड साडी नेसणारी नाती, अशा समस्त स्त्रियांच्या मनात विसावलेली हळवी सखी म्हणजे साडी. तिच्यातील नाविण्य पुन:पुन्हा प्रेमात पाडते. कपाट साड्यांनी ओतप्रोत भरलं, तरी नवा पोत, नवं डिझाईन, रंगांच अनोख कॉम्बिनेशन दिसताच ती घेण्याचा मोह आवरत नाही. साड्यांबाबत जरा मनावर आवर घालायचा, असं ठरवूनही पुन्हा एखादी साडी विकत घेतो आणि संकल्प मोडल्याच्या दु:खापुढे, स्वत:च्या साडी कलेक्शनमध्ये नव्याको-या साडीचा समावेश झाल्याचा आनंद सरस ठरतो. तुम्ही साडीप्रेमी असाल, तर हा अनुभव तुम्ही नक्कीच घेतला असणार. आजच्या लग्नसराई स्पेशल फॅशनेबल लेखाद्वारे तुमच्या साडी कलेक्शनमध्ये नव्या साड्यांची भर पडणार इतकं नक्की!

बाकी पारंपारिक संमारंभांसाठी आपण सराईतपणे अचूक साडी निवडतो, नेसतो आणि चारचौघांत उठूनही दिसतो. मात्र लग्नासारख्या बड्या सोहळ्यासाठी कुठली साडी नेसावी, हे निवडताना पुरा गोंधळ उडतो. नाही म्हटलं तरी “बाकीच्या जणी कुठल्या साड्या नेसतील?”, “साडी फंक्शनल वाटतेय का?”, “त्यांनी माझी ही साडी पाहिलीय का?”, असे अनेक प्रश्न मनात फेर धरतात. हल्ली घागरा चोळी, लेहंगा फॅशनविश्वात वरचढ ठरतोय. पण, त्यांस सोज्वळ साडीची सर बिलकूल येत नाही. तिचा थाट निराळाच! अशावेळी, जर्दोसी नक्षीकाम असणा-या साडीची हमखास निवड करावी. मग, ती साडी पैठणी, महेश्वरी किंवा नारायणपेठ असली, तरी सोहळ्यास साजेशी ठरेल.

नेटेड फॅब्रिक्सवर एम्ब्रॉडरी किंवा टिकली वर्क असणा-या साड्या वजनाला हलक्या असल्याने, साडीत वावरण्याची सवय नसणा-यांसाठी अशा साड्या छान पर्याय ठरतात. यामध्ये भरपूर प्रकार उपलब्ध आहेत. फक्त पदराला वा काठाला खड्याचे नक्षीकाम असणारी साडीही निवडता येईल.

साडीचे अंग लहान मोठ्या बुट्यांनी भरलेले असले, की त्या साडीस सहजच एक ऊंची लूक प्राप्त होतो. मात्र, हल्ली या बुट्ट्यांच्या प्रकारातच विविधता आलीय. फक्त कुयरी, गोलाकार नक्षीकाम असण्याऐवजी काही वस्तू निवडून त्याचे सर्वत्र बुट्टे दिले जातात. उदा. एखादं वाद्यं, चारचाकी गाडी इ.! लठ्ठ शरीरयष्टीच्या स्त्रियांनी पदराच्या व साडीच्या प्लेट्स एकमेकांवर चांगल्या बसतील अशी मऊसूत साडी निवडावी. तर, बारीक अंगयष्टी असणा-यांनी नेटची, एम्रॉडरी असणारी किंवा फुलणा-या कापडाला पंसती दिली चालेल. नेटच्या साडीस काठाला व पदराला आतील बाजूने कापड लावून घेतल्यास दागिन्यांमध्ये साडी अडकून त्याचे धागे खेचले जात नाहीत.

या सगळ्या व्यतिरिक्त ‘साडी आवडते, पण नेसायचा कंटाळा येतो”, अशा प्रकारात तुम्ही मोडत असाल; तर साडी शिवून घेण्याचा पर्याय आहेच. हल्ली नऊवारी पाचवारीशिवाय इतरही अनेक त-हेने साड्या शिवून घेता येतात. ज्यात वावरणं सोयीचं जातं आणि साडीप्रेमी म्हणून बिनधास्त मिरवताही येतं.

More Articles
Designed and Developed by SocioSquares