Tray (2)

‘सर्व्हिंग ट्रे’ असावेत जरा हटके!

‘सर्व्हिंग ट्रे’ असावेत जरा हटके!

घर प्रशस्त असो किंवा खोटेखानी, त्याला घरपण लाभतं ते घरातील सदस्यांमुळे आणि विविध गरजेच्या तसेच सजावटीच्या वस्तू घराला लोभस रुपडं बहाल करतात. म्हणूनच, कुठल्याही प्रवासाअंती एकदा घरी पोहोचलं की हायसं वाटतं, येणा-या पाहुण्यांनाही प्रसन्न वाटावं याची तंतोतंत काळजी घेतोच आपण! अगदी नावाची पाटी, डोअरबेल, मॅट, सोफा, डायनिंग टेबल, किचन सेट या ना अशा घरातील प्रत्येक वस्तूत काही निराळं व आकर्षक असेल याची खात्री आपण बाळगतो. तेव्हा पुढील देखण्या सर्व्हिंग ट्रेवर तुमची नजर खिळली नाही तरच नवल. देत आहोत ट्रेजचे काही अनोखे अंदाज, यापैकी एखादा तरी संग्रही हवाच!

सिरॅमिक ट्रे

Tray (3)

क्रॉकरी व सिरॅमिकच समीकरणच कधी जुनं न होणारं आहे. सिरॅमिकला हवा तसा आकार देत, त्यावर वळणदार नक्षीकाम करत, तितकेच शोभनीय रंग वापरत तयार केलेली भांडी, शोभेच्या वस्तूंमध्ये सर्व्हिंग ट्रेचा नंबरही लागतो. वापरायला नाजूक पण दिसायला शाही अशा सिरॅमिकच्या सर्व्हिंग ट्रेची चकाकी अधिक आकर्षित करते.

टाईल ट्रे

Tray (5)

रंगीबेरंगी टाईल्सचा वापर करुन तयार केलेले ट्रेज वजनाला थोडे जड वाटले, तरी दिसायला छान दिसतात यात शंकाच नाही. यामध्ये काही प्रकारही उपलब्ध आहेत. जसे, लाकडी फळीवर विशिष्ट अंतरावर बसवलेल्या तीन टाईल्स. तसेच, नक्षीदार लाकडी फ्रेममध्ये बसवलेल्या सहा लहान टाईल्स बसवलेल्या असतात. या प्रकाराला ‘फोल्क आर्ट टाईल ट्रे’ असेही म्हटले जाते. काही डिझाईन्स टाईल्सचे वेडेवाकडे तुकडे वापरुन तयार केल्या जातात. वरील चित्रात त्याचे काही नमुने दिले आहेत.

वुडन ट्रे

Tray (6)

संपूर्णत: लाकडापासून बनवलेला सर्व्हिंग ट्रेच्या डिझाईन्समध्ये दरवेळी काही नवखं पाहायला मिळतं. मुख्यत्वे आयात, चौकोन, त्रिकोण, अष्टकोन तर कधी गोलाकार अशा आकारांचे पर्याय, त्यावर हाताने केलेले मधुराई पेटिंगही आकर्षक दिसते. या वूडन ट्रेमध्ये आणखी एक ब्लॅक बोर्डची थीम असणारा प्रकारही आजमावता येईल. त्यावर चहा, कॉफी किंवा बिस्किटं सर्व्ह करताना छानसा मेसेजही लिहीता येतो.

विंटेज ट्रे

Tray (4)

सर्व्हिंग ट्रेजमध्येही विंटेज लूक डोकावू लागतो तेव्हा पुन्हा एकदा ‘जुनं ते सोनं’ ही उक्ती कृतीत उतरवण्याची संधी मिळते. जुनी स्टाईल नव्यानं विविध वस्तूंमधून दिसू लागलीय. विंटेज लूक मधील ट्रेज दिसण्याबाबत जरासे उजवेच ठरतात, असं म्हणायला हरकत नाही. लाकडावरील कोरीव काम, धातू व आरशाचा साधलेला मेळ, शितल रंग, त्यावर नाजुकशी फुलंपानं. खरंच, जुन्या डिझाईन्स आजही वरचढ ठरतात हेच खरे!

पाहुण्यांचा पाहुणचार देखील कसा दिमाखात व्हायला हवा. उत्कृष्ठ चह, पेश करणारा ट्रे देखील नजर खिळवून ठेवणारा हवा ना. वरीलपैकी एखादा सर्व्हिंग ट्रे तुमच्या वापरात असला, तर पाहायलाच नको. चहासोबत तुमच्या पसंतीचेही तोंडभर कौतुक होईल, यात दुमत नाहीच!

Image Source-Pinterest

Popular Posts
‘दही-वडे’
February 20, 2017
Designed and Developed by SocioSquares