breastfeeding (1)

सार्वजनिक ठिकाणी स्तनपान देताना…

भूकेला काय कळतयं, ती लागते केव्हाही! वेळीअवेळी पोटात कावळ्यांची सभा भरते आणि त्याक्षणाला काहितरी खाण्याची तीव्र इच्छा होते. भूकेवर नियंत्रण रहात नाही, कुठे आहोत याचे तारतम्य संपते. मग, काहितरी ऑर्डर करायचे, कॅटिंगमध्ये गाठून पोटभर खायचे, सुरु तासाला चोरुन डब्यावर ताव मारायचे प्रकार सहजी घडतात.

सुजाणांचे हे हाल, तर नवजात तान्हे बाळ कधीही टाहो फोडून आईकडे दूधाचा हट्ट करणे साहाजिकच, मग आईलाही कोवळ्या जीवाची भूक स्तनपानाद्वारे भागवावी लागते. ही परिस्थिती घराबाहेर असताना उद्भवल्यावर जाऊ तिथे स्तनपान कक्षे असतीलच, असे नाही. त्यामुळे, बसमध्ये, ट्रेनमध्ये, अगदी प्लॅटफॉर्मवर किंवा बागेत असताना बाळ अचानक दूधाचा हट्ट धरते व बाळाला दूध पाजण्यासाठी नवमाताही आडोसा शोधू लागते.

सार्वजनिक ठिकाणी आई बाळातील या नैसर्गिक क्रियेकडे गर्दीने तितक्याच नैसर्गिकपणे दुर्लक्ष करणे अपेक्षित आहे. गर्दी तसे करतेही, पण काही अपवादात्मक पुरुषांच्या नजरा सोडल्या तर! नेमक्या याच नजरा बाळाला स्तनपान देणा-या स्त्रीस अवघडल्यासारखे करतात. या नजरांपासून वाचायचे, तर बाळ रडत रहाते आणि बाळाची भूक भागवायची, तर पुन्हा लोकांचे बघणे आहेच. आई नेहमीच आपल्या बाळाचा विचारु करुन मिळेल तितक्या आडोशाचा आधार घेत बाळाला दूध पाजते. या पेचावर पर्याय म्हणून स्त्रियांना सार्वजनिक स्वच्छतागृहांचा आधार घेण्याचे सुचविले जाते. दूध हे बाळाचे अन्न आहे व बाळाला ते अशा अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त ठिकाणी देणे नक्कीच योग्य नाही.

हल्लीच एका कॅनेडीयन हॉकीपटू ‘सेराह स्मॉल’ ही नवमाता गेम दरम्यान मिळणा-या ब्रेक टाईममध्ये बाळाला दूध पाजून, पुन्हा खेळाडू म्हणून मैदानावर हजर झाली. जबाबदारी निभावताना, कर्तव्य न विसरणा-या या आईचे कौतुक होणे सहाजिक आहे. सार्वजनिक ठिकाणी बाळाला स्तनपान देणारी प्रत्येक आई नेमकं हेच कर्तव्य निभावते. कुठल्याही नजरांना न भिता स्तनपानाद्वारे आपल्या बाळाची भूक भागवणा-या प्रत्येक आईचे तितकेच कौतुक, फक्त तिला तिचे कर्तव्य निभावताना तिच्याकडे विचित्र नजरेने न पहाण्याचे सहकार्य मिळावे, बस इतकेच!

More Articles
Designed and Developed by SocioSquares