Inspiration > सालुमरद थिम्माक्का: आजची सावित्री!
Thimakka (2)

सालुमरद थिम्माक्का: आजची सावित्री!

आज, वटपौर्णिमा! यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण हट्टाने व मोठ्या युक्तीने परत आणणा-या सावित्रीचा पायंडा जपणा-या लेकींनो प्रत्येकीने आजच्या सावित्रीची, म्हणजेच १०५ वर्षीय थिम्माक्काची कथा ऐकायलाच हवी!

कर्नाटक राज्यातील बेंगळुर शहरापासून साधारण ८०किमी. अंतरावरील खेड्यात राहणारी थिम्माक्का. घरची परिस्थिती हलाखीचीच. पैशाअभावी शिक्षण राहीले व बालवय मजूरी करण्यात गेले. लग्नांनंतरही पैशाची कमी कायम होती, मात्र थिम्माक्का व तिच्या पतीजवळ निसर्ग प्रेमाची श्रीमंती अफाट होती. त्यांच्या राहत्या खेड्यात पुष्कळ वडाची रोपे उगवत. ती रोपं घरापासून ४ किमी. अंतरावर असणा-या महामार्गाच्या दुतर्फा लावण्यास त्यांनी सुरुवात केली. हे सारं फक्त निसर्ग प्रेमाखातर, यातून मिळणारा आर्थिक फायदा शून्य. उलट घरापासून दूर, दररोज चार पाच बालद्या पाणी, त्या झाडांना घालण्याचा दिनक्रम  सुरु झाला. मोठी झालेली झाडे गुरांनी खाऊ नयेत, म्हणून त्याभोवती काटेरी कुंपण बांधत, या वडाच्या झाडांना थिम्माक्काने पोटच्या पोरासारखे जपले. आजतागायत त्यांनी एकूण ३८४ वडाची झाडे त्या महामार्गाच्या दुतर्फा लावलीत. ती जपली, ती वाढवली.

त्या व्यतिरिक्त विविध प्रकारची सुमारे ८०००पेक्षा जास्त झाडे थिम्माक्कांनी लावली असून, बी.बी.सी.ने जगातील १०० पर्यावरणप्रेमी महिलांच्या यादीत थिम्माक्कांना स्थान दिले आहे. १९९६ साली राष्ट्रीय नागरी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. तसेच, नादोजा पुरस्कार, कर्नाटक कल्पवल्ली पुरस्कार, विश्वथ्थामा पुरस्कार, गॉडफ्रे फिलिप पुरस्काराने त्यांच्या कार्यास सन्मानित केले आहे. देशासोबत परदेशातही त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. अमेरीकेतील पर्यावरण संस्थांनी थिम्माक्कांच्या कार्यपद्धतीवर आधारित त्यांच्याच नावाने ओळखला जाणारा अभ्यासक्रम देखील सुरु केलाय.

थिम्माक्कांनी पतीच्या निधनानंतरही मोलमजुरीसोबत वृक्षलागवडीचे कार्यही खंड पडू न देता, अविरत सुरु ठेवले. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची किंवा वडाच्या फांदीची पूजा करणा-या सामान्यांपेक्षा वडाची ३८४ झाडे लावत, जणू जन्मभर वडाची, वृक्षवल्लींची पूजा करण्याचे व्रत घेतलेल्या थिम्माक्का व त्यांच्या जोडीदाराला देव सात जन्म काय, तर जन्मोजन्मी एकत्र ठेवेल यात शंकाच नाही. या दांपत्याचा आदर्श मनी धरुन, आजच्या वटपौर्णिमेला किमान एकतरी वडाचं किंवा जमेल ते झाड लावू. झाड लावणं जमलं नाही, तर किमान वडाची फांदी तोडून त्याची पूजा करण्याच्या सवयीवर तरी कायमचं पाणी सोडू. “बोल सावित्री, तूला पटतंय ना?”

Designed and Developed by SocioSquares