pads (1)

सॅनिटरी नॅपकिन्सचा वाढता कचरा

मासिक पाळी दरम्यान कपडा वापरणं आता दुर्मिळ झालंय. कारण, या कपड्यांच्या स्वच्छता व निर्जंतूकीकरणासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो, व्यस्त जीवनशैलीमुळे वेळेचीच मुख्यत्वे कमतरता भासते, त्यामुळे युज ऍण्ड थ्रो पर्याय सोयीचा ठरतोय आणि सॅनिटरी नॅपकिन्सचा कचरा दिवसागणिक वाढतोय. या नॅपकिन्सचे विघटन व्हायला सुमारे ५०० ते ८०० वर्ष लागतात. म्हणजेच, वापरलेल्या पहिल्या नॅपकिनचे अजूनही पूर्णपणे विघटन झाले नसणार. रोगरायी पसरवण्यात, हवा दूषित करण्यात या कच-याचा महत्तम हात आहे, असे म्हणायला हरकत नाही. हा काळ प्रचंड आहेच आणि त्याचे दुष्परिणामही तितकेच भयंकर आहेत.

त्याला आवर घालायचा, तर मॅनस्ट्रिअल कपचा पर्याय आहे. कुठलेही साईड इफेक्ट किंवा संसर्ग होण्याची शक्यता नाही. पुनर्वापर करता येणा-या या कपचा योग्य वापर तितका शिकून घ्यावा. मात्र, हा कप वापरण्याची भिती वाटत असेल; तर किमान सॅनिटरी नॅपकिन्सची योग्यरित्या व्हिलेव्हाट लावण्यावर तरी भर द्यावा. दर महिन्याला वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स कच-याच्या डब्यात टाकण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

  1. वापरलेला नॅपकिन कचरापेटीत टाकण्याआधी पाण्याखाली थोडा स्वच्छ करावा. यामुळे, त्या नॅपकिनचे अस्वच्छ असण्याचे प्रमाण कमी होईल. यानंतर, स्वत:चे हातही जंतूनाशक द्रव्याने स्वच्छ करण्यास विसरु नये.
  2. मग हे नॅपकिन वर्तमानपत्रात किंवा कागदी पिशवीत गुंडाळावेत आणि लाल स्केचपेनने त्यावर मोठा भरीव गोल रंगवावा. या खूणेमुळे कच-याचे वर्गीकरण करणा-या कर्मचा-यांचे काम सोप्पे होईल. खुणेवरुन त्यांना कचरा कुठला आहे, हे कळल्याने त्यांच्या आरोग्यासही धोका उरणार नाही.
  3. तसेच, सहज विघटन होऊ शकतील असे जैविक सॅनिटरी नॅपकिन्सही बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करण्यावर भर द्यावा. जेणेकरुन वाढणा-या अविघटनशील कच-यावर थोडा आळा बसेल.

सोयीस्कर पर्याय निवडणं गरजेचं आहे, मात्र आरोग्यासोबत पर्यावरणाच्या चिंतेपोटी काही सवयींना आपलसं करणं त्याहून आवश्यक आहे. सामाजिक भान ठेवत सॅनिटरी नॅपकीनच्या विघटनाची समस्या लक्षात घेत, योग्य ती खबरदारी जागृती मैत्रिणी घेतील याची खात्री आहे.

More Articles
Designed and Developed by SocioSquares