bappaa

‘सेलिब्रेशन’ गणेशोत्सवाचे…

दरवर्षी प्रमाणे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. घरोघरी, मंडपात बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तमंडळींची गर्दी होते आहे. दीड दिवस मुक्कामी असलेले बाप्पा घरी परतले देखील! हा बाप्पा दरवर्षी भक्तांसाठी अगदी न चुकता येतो आणि भक्तजन देखील तितक्याचं दणक्यात त्याचं स्वागत करतो, सोबत देतात त्याला सरप्राईज ‘सेलिब्रेशन’चं! ह्या सरप्राईजमध्ये असतात आकर्षक देखावे, डेकोरेशन, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि सोबत असतो लहान थोरांच्या मनामनातला जोश व हे सारे कौतुकाने पाहात असते आसनारूढ गणेश मुर्ती. मात्र, बदलत्या सेलिब्रेशनच्या स्वरुपासोबत मागे पडलेला एक ‘विचार’ आपण सोबत घेऊया. तो म्हणजे टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यामागील उद्देश – ‘लोकांनी एकत्र येण्याचा!’ तत्कालीन परिस्थितीत स्वराज्याच्या लढ्यासाठी विचारांची देवाणघेवाण होऊन जनतेमध्ये एकजुट निर्माण व्हावी हा लोकमान्यांचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यामागील मुख्य विचार होता. आजही संस्कृतीचे जतन करण्यासाठी व्यक्तिंची समूह शक्ती आवश्यक आहे. आज बाप्पाच्या मिरवणूकीत ढोल, ताशे, लेझीम असं अस्सल सांस्कृतिक रुप दिसून येतं, देखाव्यांद्वारे पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश दिला जातो, इको फ्रेंडली गणेश मूर्तींची वाढती मागणी याच बदलत्या सेलिब्रेशनचं द्योतक आहेत. ही सेलिब्रेशनची बदलती रुपं बाप्पासाठी सरप्राईज पॅकेजच आहेत!

कदाचित, लहानपणी शिकलेले पर्यावरणाचे धडे भक्तगण ख-या अर्थाने अमलात आणू लागलायं. बाप्पा न चुकता येतो आणि आपण बाप्पाला बदलत्या सेलिब्रेशनचे असे सुखद धक्के देतो, जे पाहून तो मनोमनी समाधानी होत असेल. अशा भक्तजनांची संख्या असंख्य नसली तरी, सकारात्मकतेच्या दिशेने झालेली सुरुवात स्वागतार्ह आहे. सुजाण भक्तगण कटाक्षाने वाढत्या प्रदुषणाचा विचार करतोय, शाडू व लगदा यांपासून तयार केलेल्या मूर्तींना प्राधान्य देतोय, टाकाऊतून टिकाऊ असे देखावे, घरातच टबमध्ये किंवा सार्वजनिक इको कुंडात मूर्तीचे विसर्जन करतात ज्यामुळे समुद्राचे होणारे प्रदुषण कमी होण्यास हातभार लागतो, आवारातील लहान थोरांना आवाजाचा त्रास होईल या हेतूने मोठ्याने गाणी लावणे टाळतात उत्सवाच्या जल्लोषापलीकडे समाजभान राखतात. असा गणेशोत्सव सेलिब्रेशनसोबतचा पर्यावरण रक्षणाचा पायंडा सर्वत्र रुजतोय. ज्यामुळे नव्या पिढीसमोर उत्सव साजरा करण्याचा आदर्श नमुना उभा राहाण्यास मदत होतेय. ज्याचा परिणाम सुदैवाने भविष्यकाळात याचेच अनुकरण करणारी पिढी तयार होईल व बाप्पाला दरवर्षी मिळणारं ‘सेलिब्रेशनचं सरप्राईज’ आनंददायी असेल यात शंका नाही.

कारण, भगवंत भावाचा भुकेला| भावार्थ देखोन भुलाला||

More Articles
Designed and Developed by SocioSquares