SOCIAL (1)

सोशल मिडीआद्वारे नोकरी शोधावी अशी!

नोकरी शोधताना प्रत्येकजण स्वत:चा संपूर्ण लेखाजोखा सांगणारा एक आदर्श बायडेटो बनवण्यावर भर देतो, जे गरजेचेच आहेच पण, सध्याच्या डिजिटल विश्वात लोकांवर आपले फर्स्ट इप्रेशन पडते, ते सोशल मिडीआद्वारे! त्यामुळे, बायोडेटा इतकीच तुमची सोशल मिडीआवरील प्रोफाईल्स देखील दमदार असायला हवीत. कारण, कंपनीला सोशल मिडीआवरुन कॅन्डीडेटबद्दल सविस्तर माहिती मिळते, जी कंपनीला अधिक विश्वासार्ह वाटते. यासाठी, लिंकडीनवरील प्रोफाईलला अधिक आकर्षक बनवा. तसेच, फेसबुक, ट्विटर, इनस्टाग्राम अशा कुठल्याही सोशल साईटवरील तुमचे अकाऊंट पाहाणा-यावर तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सकारात्मक प्रभाव पडेल, याची काळजी घ्या.

कारण, कंपनीतील एच.आर. आपल्याला रुजू करुन घेण्याआधी आपल्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपली सोशल मिडीआ अकाऊंट्स पाहतात. त्याप्रमाणे, आपणही कंपनीतले वातावरण जाणून घेण्यासाठी कंपनीचे पेज आवर्जून पाहावे. यामुळे, तेथील उपक्रम, कामाची पद्धत, कर्मचा-यांचे एकमेकांशी असलेले वागणे याविषयी माहिती मिळू शकते.

प्रत्येकाचा एखादा ड्रिम जॉब असतो किंवा एखादी आवडती कंपनी असते. अशा, कंपनीत भरती सुरु असल्यास त्याविषयीची माहिती आपल्याला त्या कंपनीच्या अधिकृत सोशल अकाऊंट्सद्वारे मिळू शकते. ब-याचशा कंपन्या आपल्या पेजेसवर भरती सुरु असल्याची माहिती देतात. अशा अपडेट्सवर बारीक लक्ष ठेवावे.

स्वत:चा वेब ब्लॉग सुरु करुन, त्यावर तुम्ही आजवर केलेल्या कामांपैकी उत्कृष्टशा निवडक कामांची नोंद करावी. जणू ते तुमची कामाची शैली, तुमच्या जवळील गुणकौशल्ये विशद करणारे शोकेस असेल. असा ब्लॉग तयार करुन त्याची लिंक तुमच्या इतर सोशल मिडिआ अकाऊंट्सवर अवश्य द्यावी.

विविध पदांवर काम करणा-या व्यक्तिंना फेसबुक, ट्विटर, लिंकडीन सारख्या सोशल मिडीआमुळे एक व्यासपीठ मिळाले आहे. जिथे व्यावसायिक विषयांवर चर्चा घडतात. अशा चर्चांमध्ये वेळोवेळी सहभागी व्हावे, जेणेकरुन आपल्या क्षेत्रातील चालू घडामोडींची माहिती आपल्याला मिळते, तसेच इतर कंपन्यांत खुल्या झालेल्या नव्या जागांविषयी समजते.

विविध कंपनीतील उच्चपदस्थ व्यक्तिंची सोशल मिडीआवर अकाऊंट्स असतात. त्याद्वारे, त्यांच्या कंपनीत रुजू होण्याची इच्छा आपण त्यांच्यापर्यंत थेट पोहोचवू शकतो. मात्र, आपला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवताना व्यावहारिकता जपली जाईल, ह्याची खबरदारी बाळगावी. असे थेट उच्चपदस्थ व्यक्तिशी संपर्क साधणे जोखमीचे असले, तरी मी त्या जागेसाठी कसा/कशी योग्य आहे, हे कमीतकमी व अचूक शब्दांत सांगणेही तितकेच आव्हानात्मक आहे.

सोशल मिडीआवर जितका फावला वेळ सहज घालवता येतो, तितकाच या साईट्सच्या वापरातून नोकरीच्या संधी शोधत स्वविकासही साधता येतो. प्रत्येक नाण्याला असणा-या दोन बाजू इथेही आहेत, त्या नीट समजून घेणे महत्त्वाचे!

More Articles
Designed and Developed by SocioSquares