iceland banner

स्त्री पुरुष समान वेतन आईसलॅंडमध्ये!

स्त्री पुरुष समानतेचा लढा आजही अखंड सुरु आहे. आजची स्त्री शालेय शिक्षण असो किंवा स्पर्धा परीक्षा प्रत्येक ठिकाणी अव्वल ठरुन नवनव्या अवघड क्षेत्रात पहिले पाऊल ठेवतेय. मोठ्या तत्परतेने घर व नोकरीचे संतुलन साधून एकनिष्ठेने यशाचा डोलारा उभारतेय. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी, तिने आणि कुठले पुरावे द्यावेत? अट्टहास पुरुषांपेक्षा श्रेष्ठ ठरण्याचा नाही, तर स्त्री पुरुष दोघांनाही एकाच चष्म्यातून पाहाण्याचा आहे.

घराघरातील असमानतेचा कणा मोडेलही कदाचित, पण भांडवलशाहीसारख्या उच्चशिक्षित, उच्चभ्रू, शुभ्र जगातली असमानता कशी संपवायची? इथे समान काम करणा-या स्त्री व पुरुषांच्या पगाराच्या आकड्यांत मात्र फारकत केली जातेय. जगभरातील महिलांचा या प्रश्नाशी झगडा सुरु असताना, एक सुखावह बातमी कानी येते. किमान आईसलॅंडमधील स्त्रियांना तरी या समस्येवर न्यायपूर्ण उत्तर मिळाल्याची!

आईसलॅंड सरकारेने लागू केलेल्या समान वेतन कायद्यानुसार एकाच पदावर काम करणा-या स्त्री व पुरुष कर्मचा-यांना समसमान वेतन देण्यास कंपनी बांधील असेल. कंपनीला नियमानुसार वागल्याचा पुरावाही सरकार दरबारी द्यावा लागेल. २५ हून अधिक कर्मचारी कार्यरत असणा-या कंपन्यांना हा कायदा लागू झाला आहे. तसेच, या कायद्याचे उल्लंघन करणा-या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. अशाप्रकारे, स्त्रियांच्या मेहनतीला कमी न लेखता, नोकरदार वर्गातील लिंगभेदाची समस्या दूर करण्यासाठी आईसलॅंड देशाने घेतलेला पुढाकार नक्कीच स्वागतार्ह आहे.

तिने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या ध्यासापायी कुटुंब, घर, नाती याकडेही दुर्लक्ष केलेले नाही. तिचे नोकरी व घरकाम अशा दोन्ही जबाबदा-या यशस्वीरित्या पार पाडण्याचे कौशल्य पाहाता, तिला कामाचा दुप्पट दाम मिळायला हवा, हे तसे स्वप्नवतच! पण, निदान समान कामाचे, समान वेतन घेण्यावर तिचा पूर्ण हक्क आहे. असमानतेची इडा पिडा टळो आणि जगभरातील विविध देशांत सुरु असणा-या समान वेतन लढ्यास लवकर यश मिळो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना!

More Articles
Designed and Developed by SocioSquares